दृष्टी मिळाल्याने पाहू शकलो पुन्हा सृष्टी, जळगावात रुग्णांचे भावनिक उद्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 12:26 PM2017-11-26T12:26:17+5:302017-11-26T12:26:57+5:30

मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना आनंद

After seeing the vision, we were able to see again | दृष्टी मिळाल्याने पाहू शकलो पुन्हा सृष्टी, जळगावात रुग्णांचे भावनिक उद्गार

दृष्टी मिळाल्याने पाहू शकलो पुन्हा सृष्टी, जळगावात रुग्णांचे भावनिक उद्गार

Next
ठळक मुद्देशब्दात न सांगता येणारा आनंद230 रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 26 - घरात केवळ मुलगा कमविता, रोजंदारी करून आई-वडिलांचा सांभाळ करीत असताना अचानक दृष्टी गेली. कसेबसे घरगाडा हाकत असताना डोळ्य़ांचा इलाज करणे अशक्य असल्याने तीन वर्षापासून दिसत नव्हते. मात्र आता हे मोतीबिंदूमुक्तीचे शिबिर वरदान ठरून मला  दृष्टी मिळाली व मी पुन्हा सृष्टी पाहण्याचा आनंद शब्दात सांगता येणे अशक्य आहे. हे उद्गार आहेत मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र मोहिमेमध्ये शस्त्रक्रिया झालेल्या 66 वर्षीय रमेश नीळकंठ चौधरी यांचे. 
पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामीण महाआरोग्य शिबिरातंर्गत मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियानाची सुरुवात जिल्हा रुग्णालयात झाल्यानंतर या अभियानातंर्गत पहिल्या दिवशी  रुग्णांची तपासणी करण्यात येऊन 24 रोजी 210 रुग्णांवर ज्येष्ठ नेत्रशल्य चिकित्सक डॉ. तात्याराव लहाने व डॉ. रागिणी पारेख यांच्या पथकाने शस्त्रक्रिया केली. या रुग्णांची 25 रोजी सुट्टी  करण्यात आली. त्या वेळी ‘लोकमत’ने रुग्णांशी संवाद साधला असता अनेकांनी आनंद व्यक्त केला. काहींनी घरची परिस्थिती चांगली असताना केवळ डॉ. तात्याराव लहाने शस्त्रक्रिया करणार असल्याने त्यांचे नाव ऐकून येथे शस्त्रक्रिया केल्याचे सांगितले. 
 शस्त्रक्रियेमुळे या रुग्णांना आता नवी दृष्टी मिळाली असून यामुळे त्यांच्या चेह:यावर आनंद ओसंडून वाहत होता.  या आनंदाबद्दल दृष्टी मिळालेल्या वृध्दांनी आयोजक, डॉक्टर तसेच परिचारिका, कर्मचारी यांचे टाळ्यांचा कडकडाट करीत आभार मानले. 
  यावेळी आमदार चंदूलाल पटेल, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, नेत्रशल्य चिकित्सक डॉ. तात्याराव लहाने, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांच्यासह शस्त्रक्रिया शिबिरासाठी मुंबई येथून आलेले वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. 

शस्त्रक्रियेनंतर काळजी महत्त्वाची 
डॉ. लहाने यांनी शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांशी संवाद साधताना शस्त्रक्रियेनंतर रुग्णांनी घ्यावयाची काळजी, आहार, औषधोपचार याबाबत मार्गदर्शन केले. तर जिल्हाधिकारी यांनी आपले जीवन आपल्याच हातात असल्याने डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन करुन स्वत:ची काळजी घेण्याचा सल्ला दिला.
तपासणी झालेल्या रुग्णांवर 3 डिसेंबर र्पयत टप्प्याटप्याने शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तर 24 रोजी शस्त्रक्रिया झालेल्यांना तपासणीसाठी 2 डिसेंबर रोजी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.  आवश्यकता भासल्यास या रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात येणार असल्याचेही डॉ. लहाने यांनी सांगितले.

230 रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया
मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र महिमेंतर्गत 25 रोजी 230 रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. जिल्हा रुग्णालयात सुरू असलेल्या या मोहिमेंतर्गत 26 रोजी पुन्हा उर्वरित रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. 

शस्त्रक्रिया झाल्यानंतर 25 रोजी सकाळी आपापल्या घरी परतत असताना गगणात न मावणारा आनंद झाल्याचे रुग्णांचे म्हणणे होते. तोच आनंद त्यांच्या चेह:यावरही स्पष्ट दिसून येत होता. 
या रुग्णांचे म्हणणे त्यांच्याच शब्दात..

आनंद न व्यक्त करता येणारा
जळगावातील तुळसाईनगरमध्ये राहतो. मुलगा कंपनीत रोजंदारीने काम करतो, जेमतेम पगार.  डाव्या डोळ्य़ात मोतीबिंदू झाला व काहीच दिसत नव्हते. त्यात उजव्या डोळ्य़ाचीही दृष्टी धुसर झाली. असे असले तरी  डोळ्य़ासाठी एक हजार रुपयेही खर्च करणे शक्य नव्हते. मात्र या शिबिरामुळे मला पुन्हा दिसू लागले असून याचा आनंद शब्दात सागंता येणार नसल्याचे रमेश नीळकंठ चौधरी यांनी सांगितले. 

मुलाला दृष्टी मिळाल्याने सर्व कमावले
जामनेर तालुक्यातील गोंदेगाव येथील रहिवासी व इयत्ता चौथीमध्ये शिक्षण घेत असलेल्या श्रवण संजय कुलकर्णी या मुलाला जन्मापासून दोन्ही डोळ्य़ांमध्ये मोतीबिंदू. त्याची जालना येथेही तपासणी केली. त्यांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. या शिबिराची माहिती मिळाली व येथे शस्त्रक्रिया केली आणि माङया मुलाला दिसू लागले यातच सर्व कमावले, असे श्रवणचे वडील संजय कुलकर्णी यांनी सांगितले. 

काळजी मिटली
या शिबिरामध्ये अत्यंत काळजी घेण्यात आली. दिसत नव्हते. मात्र या शिबिरात डाव्या डोळ्य़ावर शस्त्रक्रिया झाली आणि मला दिसू लागले. डॉक्टर, कर्मचारी घरच्यांसारखी काळजी घेतात. आता काळजी मिटली, असे भुसावळ येथील शशिकलाबाई भालचंद्र भोळे यांनी सांगितले. 

आनंद गगणात मावेना
डोळ्य़ाने दिसत नसल्याने मोठा त्रास होत असे. यामुळे सतत चिंता असायची. मात्र येथील शस्त्रक्रियेमुळे मला नवदृष्टी मिळाल्याने आनंद गगणात मावेनासा झाला आहे, अशा भावना थेरोळे ता. रावेर येथील शोभा भास्कर अटकळे यांनी व्यक्त केल्या. 

आणखी सुधारणा होईल
शस्त्रक्रिया झाल्यानंतर आज लगेच दिसू लागले आहे. सध्या कमी दिसत असले तरी औषधी दिल्याने दृष्टीमध्ये आणखी सुधारणा होईल, असा विश्वास रावेर तालुक्यातील जिन्शी येथील शांताबाई प्रताप पवार यांनी व्यक्त केला. 

चांगल्या सेवेने भारावलो
डोळ्य़ांमुळे मोठा चिंतीत होतो, मात्र येथे शस्त्रक्रिया झाल्याने दिसू लागले व चिंता मिटली. येथील चांगल्या सेवेने सर्व भारावून गेले आहेत. डोळ्य़ातून सध्या थोडे पाणी येते, मात्र तेही थांबेल, असे रामेश्वर कॉलनीतील मुरलीधर अहिरराव यांनी सांगितले. 

न होणारे काम झाले
खाजगी रुग्णालयामध्ये विचारणा केली असता पाच हजार खर्च येणार होता. मात्र या अभियानामुळे मोफत शस्त्रक्रिया झाली व मला पुन्हा दिसू लागले. याचा आनंद वेगळाच आहे. या अभियानामुळे न होणारे काम झाले, अशा भावना रावेर तालुक्यातील इच्छापूर येथील माधव तुकाराम वानखेडे यांनी व्यक्त केल्या. 

शब्दात न सांगता येणारा आनंद
अभियानामुळे दृष्टी मिळाल्याने मोठा आनंद झाला आहे. हा आनंद शब्दात सांगता येणार नाही, असे कासोदा येथील रोहिदास हरचंद साळी यांनी सांगितले. 

डॉ. लहाने यांचे नाव ऐकून येथे शस्त्रक्रिया 
दोंडाईचा येथील रहिवासी दरुबाई श्रीराम पाटील यांनी सांगितले की, माझा मुलगा पुणे येथे डॉक्टर आहे. घरची स्थिती चांगली आहे. मात्र येथे डॉ. तात्याराव लहाने हे शस्त्रक्रिया करणार असल्याचे माहिती पडले त्यामुळे मी येथे शस्त्रक्रिया केली. 

Web Title: After seeing the vision, we were able to see again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.