सत्तरीत भिजवली ७० एकर जमीन; स्वखर्चाने अडविले पाणी, संपूर्ण क्षेत्र आले ओलिताखाली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2018 06:56 AM2018-02-16T06:56:15+5:302018-02-16T06:56:30+5:30

उद्योग व्यवसाय सांभाळताना वयाच्या सत्तरीतही शेतीची आवड असल्याने व समाजोपयोगी काम करण्याची तळमळ असल्याने उतारवयातही खान्देश जिनिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप जैन यांनी पिंपळकोठा खुर्द (ता.एरंडोल जि.जळगाव) येथील आपल्या वडिलोपार्जित ७० एकर जमिनीतील १ कि.मी. नाल्यावर बांध करून ‘पाणी आडवा पाणी जिरवा’चा प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे. 

70 acres of land in seventy-seven; The water was blocked by the self-purchase, the entire area came under the spell | सत्तरीत भिजवली ७० एकर जमीन; स्वखर्चाने अडविले पाणी, संपूर्ण क्षेत्र आले ओलिताखाली

सत्तरीत भिजवली ७० एकर जमीन; स्वखर्चाने अडविले पाणी, संपूर्ण क्षेत्र आले ओलिताखाली

Next

- राम जाधव

जळगाव : उद्योग व्यवसाय सांभाळताना वयाच्या सत्तरीतही शेतीची आवड असल्याने व समाजोपयोगी काम करण्याची तळमळ असल्याने उतारवयातही खान्देश जिनिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप जैन यांनी पिंपळकोठा खुर्द (ता.एरंडोल जि.जळगाव) येथील आपल्या वडिलोपार्जित ७० एकर जमिनीतील १ कि.मी. नाल्यावर बांध करून ‘पाणी आडवा पाणी जिरवा’चा प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे. स्व:खर्चाने शेतातून गेलेला संपूर्ण नाला अडवून त्याचे खोलीकरण केले. स्वत:च्या शेतीसोबतच परिसरातील चार गावांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न यातून सुटला. यामुळे त्यांचे संपूर्ण क्षेत्र ओलिताखाली आले आहे.
२०१५-१६ मध्ये पिंपळकोठा खुर्द व बुद्रूक आणि पिंप्री खुर्द व बुद्रूक या गावांना पाणीटंचाईचा भीषण सामना करावा लागला. या समस्येने महिला व मुलांची पाण्यासाठीची होणारी भटकंती पाहून सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून, गावाला लागूनच असलेल्या आपल्या शेतातील दोन विहिरीतील पाणी प्रदीप जैन यांनी नागरिकांसाठी उपलब्ध करून दिले़ त्याचवेळी त्यांनी यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला.
२०१६ मध्येच शेतातून गेलेल्या सार्वजनिक नाल्याच्या खोलीकरणाचे व रुंदीकरणाचे काम स्व:खर्चातून केले. यासाठी शासकीय यंत्रणेचे वाट न पाहता, जेसीबी मशीनच्या साहाय्याने जवळपास १ किलोमीटर अंतराच्या नाल्याचे काम पूर्ण केले. या नाल्यात त्यांनी ठिकठिकाणी एका ठरावीक अंतरावर मातीचेच बांध ठेवून खोल खड्डेही केले. यामुळे या नाल्यात लाखो लीटर पाण्याचा सहजरित्या साठा होऊ लागला. हे पाणी जमिनीतून झिरपून परिसरातील विहिरींनाही याचा मोठा लाभ झाला आहे.
याच नाल्याच्या काठावर असलेल्या पिंपळकोठा व पिंप्री गावाच्या सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या विहिरीही तुडुंब भरल्या आहेत़ यामुळे बाराही महिने या विहिरींना पाणी राहू लागल्याने आता ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे़ गावातील सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या नळांना आता दररोज अर्धा तास पाणीपुरवठा होत आहे़ तसेच पाटचारीतून वाया जाणारे पाणी या नाल्यात साठवले जात आहे.

शेततळ्यालाच लागले पाणी
जैन यांनी त्यांच्याच शेताच्या वरच्या भागात असलेल्या जमिनीत नाल्याच्या काठावरच एक शेततळे तयार केले आहे़ या शेततळ्याला त्यांनी रुंदीकरणासह १८ फुटांपेक्षा अधिक खोलही केले़ यातच या तळ्याला पाझर फुटल्याने हा तलाव बारमाही जिवंत झºयाचा तलाव झाला आहे़ तसेच पाटचारी व नाल्याला येणारे पाणी या तलावात पाझरत असल्याने त्याचा मोठा जलसाठा तयार झाला आहे़ यातून खालच्या भागातील विहिरीत पाणी पाझरत आहे.

ऊस शेतीला प्राधान्य
जळगाव येथे राहून शेती सांभाळताना त्यांनी ठोक पिके घेण्याचा निर्णय घेतला़ त्यामुळे त्यांनी उसाची मोठ्या क्षेत्रावर लागवड केली आहे़
उसाचे पाचट जाळले नाही साधारणत: शेतकरी ऊस काढणीनंतर उसाचे पाचट त्याच शेतात जाळतात. मात्र जैन यांनी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार युरिया व पांढरा पोटॅश (म्युरेट आॅफ पोटॅश) यांचा शिडकावा करून त्याला पाणी सोडून ते पाचट सडविण्याचा प्रयत्न केला आहे़ तसेच यासाठी ते वेस्ट डिकंपोझर या जीवाणूंचाही विघटनासाठी वापर करीत आहेत.
निर्मल सीड्स या पाचोरा येथील कंपनीने जैन यांच्या शेतात चार एकर क्षेत्रावर बियाण्याचा गहू म्हणून प्रयोगात्मक वाणाची लागवड केली आहे.
तसेच निसर्गाचे देणे म्हणून प्रदीप जैन यांनी शेतातील रस्त्यांच्या दुतर्फा आंबा, आवळा, लिंबू, कडूलिंब, सीताफळ, जांभूळ, चिकू आदी फळ झाडांचीही लागवड केली आहे.


गेल्यावर्षी नाला खोलीकरणाच्या झालेल्या कामामुळे यावर्षी पाणीटंचाई भासणार नाही इतके पाणी आहे. जलयुक्त शिवार योजनेत गावाचा समावेश करण्यासाठी आमदारांना ठराव दिलेला आहे़ या योजनेतून काम झाल्यास मुबलक प्रमाणात गावात पाणी उपलब्ध होईल़
-मीनाबाई प्रभाकर हटकर, सरपंच पिंपळकोठा खुर्द.

२०१५-१६ मध्ये पिंपळकोठा व पिंप्री खुर्द आणि बुद्रूक या चारही गावात पिण्याच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणावर होती़ जलयुक्त शिवार योजना केवळ नावालाच चालली आहे. मात्र गेल्या वर्षी प्रदीप जैन यांनी नाला बांधचे आदर्श काम केले आहे़ याचा आदर्श ग्रामस्थांनी घेण्याची आवश्यकता आहे.
- आर. डी.  पाटील, माजी सरपंच, पिंपळकोठा बुद्रूक़

या गावात सतत पाण्याची टंचाई होती. मागील वर्षी संपूर्ण गावाला पाणी दिले. गेल्यावर्षीच नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण केले. याचा लाभ आम्हाला तर झालाच शिवाय परिसरातील विहिरीही तुडंूब भरल्या आहेत. त्यामुळे पिण्याचे पाणी भरपूर आहे. तसेच बागायत क्षेत्रातही वाढ झाली आहे. इतर गावातही असे प्रयोग मोठ्या प्रमाणावर राबविण्याची गरज आहे.
- प्रदीप जैन, अध्यक्ष़, खान्देश जिनिंग असोसिएशन

Web Title: 70 acres of land in seventy-seven; The water was blocked by the self-purchase, the entire area came under the spell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव