४०० वर्षांची परंपरा, जाबंसमर्थ येथील राममंदिरात नवदाम्पत्य पतीला घ्यावे लागते पत्नीचे दर्शन!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 05:05 PM2024-04-17T17:05:13+5:302024-04-17T17:08:43+5:30

सर्वप्रथम दर्शनाला आल्यावर वराला वधूचे दर्शन घ्यावे लागते. ही परंपरा चारशे वर्षांपासून अंखड चालू आहे.

Shree Ram Navami Special: 400 Years Old Tradition, At Jabansamarth Even Today Husbands Have to Take Darshan of Wife! | ४०० वर्षांची परंपरा, जाबंसमर्थ येथील राममंदिरात नवदाम्पत्य पतीला घ्यावे लागते पत्नीचे दर्शन!

४०० वर्षांची परंपरा, जाबंसमर्थ येथील राममंदिरात नवदाम्पत्य पतीला घ्यावे लागते पत्नीचे दर्शन!

कुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील श्री क्षेत्र जाबंसमर्थ येथील श्रीराम मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या नवीन लग्न झालेल्या वराला वधूचे दर्शन घ्यावे लागते. ही परंपरा आजही जांब समर्थाच्या राम मंदिरात पाहायला मिळते. सुमारे ४०० वर्षांपूर्वींचे म्हणजेच समर्थ रामदास स्वामींच्या जन्माअगोदरचे हे मंदिर आहे. या मंदिरात सीता मातेची मूर्ती ही रामाच्या उजव्या बाजूला आहे, या ठिकाणी स्त्रीला आदिमाया शक्तीचा मान दिला आहे. सर्वप्रथम दर्शनाला आल्यावर वराला वधूचे दर्शन घ्यावे लागते. ही परंपरा चारशे वर्षांपासून अंखड चालू आहे. ती आजही पाहायला मिळत आहे. 

राम मंदिरातील दुर्मीळ वस्तू आजही पाहायला मिळत आहे. यात १) श्रीरामाच्या पायापाशी श्री समर्थ जो दंडावर बांधत असत तो मारोती, २) समर्थांचे वडील सूर्याजीपंत यांना शके १५२५ माघ शुद्ध सप्तमीला प्रत्यक्ष सूर्यनारायणाने दिलेले श्रीराम पंचायतन, ३) भिक्षेच्या वेळी समर्थ झोळीत ठेवीत असत, त्या मारुतीची मूर्ती, ४) रामनवमी उत्सवात पंगतीला तूप कमी पडले होते. त्यावेळी समर्थ रामदासांनी राम मंदिरातील समोरील आडातील पाणी काढून खापराच्या घागरीतून वाढले ती घागर आजही पाहायला मिळते. 

घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथे समर्थ रामदास स्वामी समर्थांचा जन्म शके १५३० चैत्र शुद्ध नवमी, म्हणजेच १६०८ ला रामनवमीच्या दिवशी रामाच्या जन्माच्या वेळी झाला. श्रीराम प्रभू व समर्थ रामदास या दोघांच्या जन्मतिथी व जन्म वेळ एकच असण्याचा विहंगम योग इतरत्र कोठेही आढळून येत नाही. रामदास स्वामींच्या जन्माने पावन झालेले जांब आज महाराष्ट्राचेच नव्हे, तर देशाचे प्रेरणास्थान, यात्रास्थान बनले आहे. समर्थांच्या पूर्वजांनीच ते वसविल्याचा इतिहास आहे. या गावाच्या कुळकर्णीपणाचे वतनही पिढ्यान्पिढ्या समर्थांच्या घराण्यात चालत आले आहे. 

दरवर्षी रामनवमीनिमित्त नऊ दिवस जन्मोत्सव
ज्या ठिकाणी श्री समर्थांचा जन्म झाला, ज्या ठिकाणी श्री समर्थांनी विश्वाची चिंता केली व मातोश्री राणूबाईंना, म्हणजेच त्यांच्या आईला त्यांनी डोळे दिले ती ही पवित्र भूमी. या ठिकाणी समर्थांच्या जागेचा शोध घेतला व नेमका ज्या खोलीमध्ये श्रीसमर्थांचा देह धरणी मातेने झेलला ती जागा शोधून काढून तेथे समर्थ भक्त धुळ्याचे श्रीकृण देव यांनी भव्य असे मंदिर बांधले. दरवर्षी येथे रामनवमी उत्सवानिमित्त नऊ दिवस जन्मोत्सव साजरा केला जातो, तसेच वर्षातून अनेकदा धार्मिक कार्यक्रम होतात, त्याला महाराष्ट्रभरातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात.

Web Title: Shree Ram Navami Special: 400 Years Old Tradition, At Jabansamarth Even Today Husbands Have to Take Darshan of Wife!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.