डोक्यात गोळी घालून युवकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 12:54 AM2019-10-08T00:54:01+5:302019-10-08T00:54:53+5:30
बदनापूर तालुक्यातील शेलगाव येथील रहिवासी संजय किसनराव अंभोरे (४०) यांची मोटारसायकलवर आलेल्या अज्ञात दोन युवकांनी डोक्यात गोळी घालून हत्या केली.
जालना/शेलगांव (जि. जालना) : बदनापूर तालुक्यातील शेलगाव येथील रहिवासी संजय किसनराव अंभोरे (४०) यांची मोटारसायकलवर आलेल्या अज्ञात दोन युवकांनी डोक्यात गोळी घालून हत्या केली. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी रात्री उशिरा एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.
अंभोरे यांचा औद्योगिक वसाहतीत कामगार पुरविण्याचा व्यवसाय आहे. सोमवारी सायंकाळी अंभोरे हे शेलगाव येथील एका पानटपरीजवळ बसले असताना विनाक्रमांकाच्या दुचाकीवर आलेल्या दोघांनी अचानक त्यांच्यावर गोळीबार केला. यात एक गोळी डोक्यात लागून काही क्षणात अंभोरे हे रक्ताच्या थारोळ्यात पडले. इतरांना काही कळायच्या आत हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. अंभोरे यांना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. पोलीस अधिक्षक एस.चैतन्य यांनी घटनास्थळी भेट दिली. जिल्हा सामान्य रुग्णालयात मोठ्या संख्येने जमाव जमला होता. आरोपींना पकडल्याशिवाय शवविच्छेदन करू देणार नसल्याची भूमिका जमावाने घेतली होती. पोलिसांनी जमावाला शांत करीत घाटी रुग्णालयात इनकॅमेरा शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. अंभोरे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुली, भाऊ असा परिवार आहे.
पाठलाग करणाऱ्यावरही गोळीबार
संजय अंभोरे यांच्यावर गोळीबार करून पळून जाणा-या आरोपीचा एका युवकाने पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपींनी त्याच्यावरही गोळीबार केला. सुदैवाने त्याला गोळी लागली नाही. हल्लेखोरांनी एक गोळी हवेतही झाडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
एकजण ताब्यात
संजय अंभोरे खून नेमका कोणत्या कारणावरून झाला याचा पोलीस तपास करीत आहे. याप्रकरणी रात्री उशिरा एका संशयिताला अटक करण्यात आली. वर्षभरापूर्वी अंभोरे यांच्यासोबत झालेल्या भांडणातील हा संशयित असून त्याचा कसून तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती.