पोटगीचा दावा दाखल केल्याने महिलेस जात पंचायतीने केले बहिष्कृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 05:15 PM2019-02-06T17:15:45+5:302019-02-06T17:18:23+5:30

समाजाच्या प्रमुख म्होरक्यांनी संगनमत करून लग्नात अपमानित केले

Jat Panchayat deprived women for filing a case for divorce | पोटगीचा दावा दाखल केल्याने महिलेस जात पंचायतीने केले बहिष्कृत

पोटगीचा दावा दाखल केल्याने महिलेस जात पंचायतीने केले बहिष्कृत

Next

राजूर (जालना ) : कौटूंबिक वाद व पोटगीचा दावा न्यायालयात दाखल का केला, म्हणून जातपंचायत भरवून महिला व तिच्या माहेरच्या कुटूंबास समाजातून बहिष्कृत करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी हा फतवा काढणाऱ्या सात म्होरक्या विरूध्द महाराष्ट्र जात पंचायत कायदा कलमान्वये राजूर पोलिसांत आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजूर येथील सोनाली पंढरीनाथ शिवरकर या तरूणीचा २००९ मध्ये सिंदखेड राजा येथील ज्ञानेश्वर अण्णा राजे यांच्या सोबत वैद्य समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे विवाह झाला होता. तिला सासरच्या मंडळींनी त्रास देवून चांगले नांदवले नाही. त्यामुळे सोनालीने सासरच्या मंडळीविरूध्द ४९८, ४९४ कलमान्वये गुन्हा दाखल करून पोटगीचा दावा न्यायालयात दाखल केलेला आहे. सदर समाजाच्या मंडळींनी न्यायालयात दावा दाखल केल्याच्या कारणावरून जेजूरी (जि.पुणे) येथे जातपंचायत भरवून सोनालीच्या कुटूंबियांना जातीबाहेर काढले. 

वैदू समाज राज्यात विखूरलेला असून समाजाची मोजकीच घरे आहेत. दरम्यान, २५ जानेवारी रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथे सोनाली आई, वडील, भावासह एका नातेवाईकाच्या विवाहाला गेले असता, समाजाच्या प्रमुख म्होरक्यांनी संगनमत करून तुम्हाला आम्ही जातीच्या बाहेर काढलेले आहे. त्यांना अक्षदा देवू नका, असे म्हणून अपमानीत केले. तसेच जेवणाच्या पंगतीत बसू देण्यास विरोध केला. लग्न मंडपाच्या बाहेर काढून दिले. त्यामुळे शिवरकर कुटूंबियांना अपमान सहन करावा लागला. 

या प्रकरणी सोनालीच्या तक्रारीवरून तात्या रामा शिवरकर (रा.देऊळगांवराजा), आण्णा मल्लू गोडवे (रा.बेराळा ता.चिखली), मोतीराम चव्हाण, शामराव शिंदे, बाळासाहेब लोखंडे  तिघे (रा.वैदूवाडी जामखेड), नामा शिंदे (रा.सेलगांव वखारी), दाजीराम रा.इंदापूर या सात  जणाविरुध्द महाराष्ट्र जातपंचायत अधिनियम कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Jat Panchayat deprived women for filing a case for divorce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.