Action taken to suspend Area officers from Shahagad about illegal sand case | शहागड येथील अवैध वाळू तस्करीला खतपाणी घालणाऱ्या मंडळ अधिका-यावर होणार निलंबनाची कारवाई

जालना : शहागड महसूलच्या मंडळाअंतर्गत साष्टपिंपळगाव, डोमलगाव, गोरी-गंधारी, शहागड, वाळकेश्वर, कुरण, गोंदी व कोठाळा पर्यंत प्रचंड प्रमाणात अवैध वाळू तस्करी होते. याच पट्ट्यात आज तहसीलदार दत्ता भारस्कर यांच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणा-या वाहनावर कारवाई केली. कारवाईची माहिती देताना भारस्कर यांनी या भागातील मंडळ अधिकारी कृष्णा एडके यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून लवकरच त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हाधिका-यांकडे पाठवणार असल्याची माहिती दिली. 

शहागड येथे अवैध वाळू तस्करी बंद झाल्याचे चित्र वरून दिसते. मात्र ,आतून वाळू तस्कर कायद्याला न जुमानता या भागात धुमाकूळ घालत आहेत. यावर महसूल व पोलीस प्रशासना यांचे काही प्रमाणात दुर्लक्ष होते. याबाबत लोकमत मध्ये वृत्त प्रकाशित होताच आज तहसीलदार दत्ता भारस्कर, राजेश साबळे, अशोक काशीद यांच्या पथकाने वाळूची अवैध वाहतूक करणा-या ट्रकवर (एम.एच.20.डीई. 3017 ) कारवाई केली. याप्रकरणी ट्रक मालक गुड्डू बिहारी (रा.अंबड) चालक विष्णू दगडूजी लांडे,(रा.पांगरखेडा) यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. 

मंडळ अधिका-यावर होणार कारवाई 
या कारवाई बाबत माहिती देताना तहसीलदार दत्ता भारस्कर यांनी सांगितले कि, या भागातील मंडळ अधिकारी कृष्णा एडके यांच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून याची गंभीर दखल घेत प्रशासन त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवणार आहे.

ग्रामस्थांनी लक्ष घालावे 
आपेगाव, बेळगाव, साडेगाव या गावात ग्रामस्थ अवैध वाळू वाहतुकीवर लक्ष देऊन असतात यामुळे येथे वाळू तस्करी होत नाही. अशाच प्रकारे वाळू पट्ट्यातील सर्व गावांनी यात लक्ष घालून अवैध वाळू तस्करीला विरोध करावा असे आवाहन भारस्कर यांनी केले आहे.