मनोज जरांगेंच्या जालन्यातील सभेत चोरट्यांचा सुळसुळाट; ५० चैन, ९० मोबाइल, वाहनांची चोरी

By दिपक ढोले  | Published: December 5, 2023 06:49 PM2023-12-05T18:49:22+5:302023-12-05T18:50:04+5:30

१ डिसेंबरला झाली होती जालना येथे सभा; जरांगे पाटलांच्या सभेतून एक कोटींचा मुद्देमाल लंपास

1 Crore worth of material robbed from Manoj Jarange Patal's sabha from Jalana | मनोज जरांगेंच्या जालन्यातील सभेत चोरट्यांचा सुळसुळाट; ५० चैन, ९० मोबाइल, वाहनांची चोरी

मनोज जरांगेंच्या जालन्यातील सभेत चोरट्यांचा सुळसुळाट; ५० चैन, ९० मोबाइल, वाहनांची चोरी

जालना : शहरात १ डिसेंबर रोजी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची सभा व रॅली झाली. या रॅलीसह सभेला समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थित होती. या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात चैन, मोबाइलसह पॉकेट, पर्स, रोख रक्कम लंपास केली आहे. चोरट्यांनी ५० सोन्याच्या चैन, रोख रक्कम, ९० मोबाइल, दुचाकी वाहने असा एकूण एक कोटी रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. यातील बहुतांश चोरटे व्हिडीओमध्येही दिसत असून, त्यांचा शोध घेण्यात यावा, अशी मागणी मराठा समाजबांधवांच्या वतीने पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील हे राज्यात ठिकठिकाणी सभा घेत आहेत. या अनुषंगानेच १ डिसेंबर रोजी जालना शहरात रॅली व सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेसह रॅलीला समाजबांधवांची मोठी गर्दी झाली होती. या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी अनेकांची गळ्यातील सोन्याची चैन, रोख रक्कम, खिशातील पॉकीट, मोबाइल, पर्स चोरून नेले आहे. काही ठिकाणी चोरटे व्हिडीओमध्ये कैद झाले आहे. त्याचे व्हिडीओही पोलिसांकडे देण्यात आले आहे. याबाबतच्या तक्रारी आयोजकांकडे आल्या आहेत. यातील आरोपींचा शोध लावण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर मराठा समाज बांधवांची उपस्थिती होती.

यांनी केल्या तक्रारी
रॅलीसह सभेतून वैभव गाजरे, गणेश शिंदे, निवृत्ती शिंदे, रवी राऊत, आकाश राऊत, अजय अग्रवाल, शुभम खडके, विकास दानवे, दिनेश पुंड, महेश भालेकर, गोरख थोरात, अर्जुन वाघ आदींनी आयोजकांकडे तक्रारी केल्या आहेत. त्यानंतर आयोजिकांनी पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले आहे.

गर्दीचा फायदा घेऊन चोरी
मनोज जरांगे पाटील यांची १ डिसेंबर रोजी शहरात रॅली व सभा झाली. चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन चैन, मोबाइल, पॉकीट, पर्स चोरून नेल्याची तक्रार माझ्याकडे आली आहे. याबाबत गुन्हे दाखल केले जाणार आहे. पोलिस ठाण्याला पथक नेमवून चोरट्यांचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले.
-शैलेश बलकवडे, पोलिस अधीक्षक

Web Title: 1 Crore worth of material robbed from Manoj Jarange Patal's sabha from Jalana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.