गुरुत्वाकर्षणाच्या लहरींचा शोध लावणाऱ्या तिघा संशोधकांना नोबेल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2017 03:49 PM2017-10-03T15:49:29+5:302017-10-03T21:33:53+5:30

गुरुत्वाकर्षणाच्या लहरींचा शोध लावणाऱ्या तीन संशोधकांना पदार्थविज्ञानाचे नोबेल आज जाहीर करण्यात आले. रेनर वाईस, बेरी बॅरिश, किप थॉर्न या तीन संशोधकांना हा पुरस्कार देण्याचे नोबेल समितीने जाहीर केले. पदार्थविज्ञानाचे हे 111 वे नोबेल आहे.

Nobel to three researchers who invented gravitational waves | गुरुत्वाकर्षणाच्या लहरींचा शोध लावणाऱ्या तिघा संशोधकांना नोबेल

गुरुत्वाकर्षणाच्या लहरींचा शोध लावणाऱ्या तिघा संशोधकांना नोबेल

Next
ठळक मुद्देलायगोच्या ज्या उपकरणाद्वारे या लहरींचा शोध लावण्यात आला ती उपकरणे अमेरिकेमध्ये लिविंगस्टन, लुझियाना आणि हॅनफोर्ड, वॉशिंग्टन या ठिकाणी उभी करण्यात आली आहेत. १९८० साली विख्यात संशोधक रायनेर वाएस, रिचर्ड फेइन्मन, किप थॉर्न यांनी लायगोची कल्पना मांडली होती. या कल्पनेतून विकसीत झालेल्या एल आकाराच्या उपकरणाने गुरुत्वाकर्षणाच्या लहरींचे अस्तित्व शोधले. 

स्टॉकहोम, दि.3- गुरुत्वाकर्षणाच्या लहरींचा शोध लावणाऱ्या तीन संशोधकांना पदार्थविज्ञानाचे नोबेल आज जाहीर करण्यात आले. रेनर वाईस, बेरी बॅरिश, किप थॉर्न या तीन संशोधकांना हा पुरस्कार देण्याचे नोबेल समितीने जाहीर केले. पदार्थविज्ञानाचे हे 111 वे नोबेल आहे.
गुरुत्वाकर्षणाच्याही लहरी असतात, या आइनस्टाइनने वर्तवलेल्या शक्यतेवर गेल्या वर्षी शिक्कामोर्तब झाले. गेली अनेक वर्षे सर्व जगभरामध्ये गुरुत्वीय लहरींच्या शोधाच्या दिशेने प्रयत्न चालविले होते त्याला गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात अमेरिकेत लायगो (लेसर इंटरफेरोमिटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह आॅब्झर्व्हेटरी) प्रकल्पामध्ये यश मिळाले. विश्वाची निर्मिती आणि सुरुवात तसेच इतर अनेक शोधांची वाट या यशामुळे मोकळी झाली व जगभर विज्ञानप्रेमींमध्ये आनंदाची लाट पसरली. आता नोबेल मिळाल्यामुळे या आनंदामध्ये भरच पडली आहे.
        गुरुत्वीय लहरींच्या शोधानंतर लायगो या नावाची चर्चा आपल्या कानावर पडू लागली आहे. लायगोच्या ज्या उपकरणाद्वारे या लहरींचा शोध लावण्यात आला ती उपकरणे अमेरिकेमध्ये लिविंगस्टन, लुझियाना आणि हॅनफोर्ड, वॉशिंग्टन या ठिकाणी उभी करण्यात आली आहेत. लायगोच्या लायगो सायंटिफिक कोलॅबोरेशन या संशोधनप्रकल्पामध्ये १४ देशांमधील हजाराहून अधिक संशोधक काम करत आहेत. १९८० साली विख्यात संशोधक रायनेर वाएस, रिचर्ड फेइन्मन, किप थॉर्न यांनी लायगोची कल्पना मांडली होती. या कल्पनेतून विकसीत झालेल्या एल आकाराच्या उपकरणाने गुरुत्वाकर्षणाच्या लहरींचे अस्तित्व शोधले. 
     भारतासारख्या देशासाठी या शोधाचे महत्व म्हणूनच अनन्यसाधारण आहे. इंडिगो (इंडियन इनिशिएटिव्ह इन ग्रॅव्हिटेशनल वेव्ह आॅब्झर्व्हेशन्स) या शास्त्रज्ञांच्या समुहाद्वारे लायगो-इंडिया हा प्रकल्प हाती घेण्यात आला असून भारतातही अमेरिकेप्रमाणे एक प्रयोगशाळा उभारण्याचा विचार सुरु आहे, त्यासाठी योग्य जागा शोधली जात आहे. अमेरिकेतील दोन आणि भारतामध्ये एक अशा या प्रयोगशाळा कार्यरत झाल्या तर गुरुत्वीय लहरींच्या बाबतीत आणखी सखोल संशोधन शक्य होणार आहे. गुरुत्वीय तरंगांचे उगमस्त्रोत अचूक सांगण्यापर्यंत हा टप्पा यामुळे गाठला जाणार आहे. या प्रयोगामध्ये विविध शास्त्रशाखांचा समावेश असल्यामुळे प्रकाशशास्त्र, लेसर तंत्रज्ञान, गुरुत्वाकर्षण विषयक शाखा, खगोलशास्त्र, संगणकशास्त्र, गणित आणि अभियांत्रिकीच्या तज्ज्ञांना एकत्र येऊन काम करण्याची भारतात संधी उपलब्ध होत आहे. यामध्ये एकमेकांच्या शाखांमध्ये पूरक ज्ञानाचे-माहितीचे आदानप्रदानही होईल. त्याचप्रमाणे अशा प्रकल्पांसाठी लागणाऱ्या उपकरणांमुळे तंत्रउद्योगांनाही चालना मिळणार आहे
टीआयएफआरचे विशेष प्रयत्न
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च आणि आयसीटीएस यांनीही कृष्णविवर आणि गुरुत्वाकर्षण लहरींवर भरपूर संशोधन केलेले आहे. संस्थेच्या डॉ. पी. अजित यांनी दोन कृष्णविवरे एकत्र येऊन झालेल्या कृष्णविवराच्या वस्तूमानाचा अंदाज तसेच त्यातून बाहेर पडलेल़्या उर्जेबद्दलही त्यांनी अंदाज व्यक्त करण्याचे महत्वाचे काम केले. त्याचप्रमाणे प्रा. ए. गोपालकुमार आणि प्रा. सी. एस. उन्नीकृष्णन हेदेखिल कृष्णविवरांवर संशोधन करत आहेत. लायगोने लावलेल्या शोधानंतर टीआयएफआरचे संदीप त्रिवेदी यांनी आनंद व्यक्त करताना म्हणाले, हा शोध म्हणजे अत्यंत महत्वाची घटना आहे, आपण इतकी वर्षे अखिल विश्वाचे निरिक्षण करण्यासाठी प्रकाशलहरींचा वापर करत होतो, त्याची जागा गुरुत्वाकर्षण लहरींनी घेतली तर विश्वनिर्मितीमधील अनेक रहस्ये उलगडतील.

संजीव धुरंधर यांचे तीन दशकांचे प्रयत्न
गुरुत्वीय लहरींच्या भारतात सुरु असणाºया संशोधनामध्ये आणि निरिक्षणामध्ये आयुकाच्या संजीव धुरंधर यांचा वाटा मोठा आहे. धुरंधर हे १९८७ पासून यावर काम करत आहेत, १९८९ मध्ये त्यांनी आयुकामध्ये काम सुरु केले. गोंगाटासारख्या आवजामधून त्यांनी गुरुत्वाकर्षणाच्या तरंगांचे संकेत शोधणे हे त्यांचे मुख्य कार्य होते.  गुरुत्वीय लहरींच्या अस्तित्वाबाबत शंका घेतली जाई अशा काळामध्ये त्यांनी आपल्या संशोधनास सुरुवात केली. त्याचप्रमाणे सर्व संशोधक केवळ विद्युतचुंबकीय लहरींचा विचार करत असताना धुरंधर यांनी मात्र गुरुत्वाकर्षण़ाच्या लहरींच्या संशोधनासाठी प्रयत्न केले. त्यामुळे त्यांच्या या जवळजवळ तीन दशकांच्या प्रयत्नांचे महत्व अनन्यसाधारण असेच आहे. धुरंधर यांनी आपल्या दीर्घ अनुभवाचा फायदा विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी केला, त्यांचे विद्यार्थी आज जगभरामध्ये खगोलशास्त्राच्या शाखेत संशोधनाचे काम करत आहेत. १९१६ साली आइनस्टाइनने वतर्विलेल्या शक्यतेवर काम करणे आणि अपुऱ्या साधनांच्या मदतीने काम करणे अत्यंत आव्हानात्मक होते, परंतु संजीव धुरंधर यांच्या निरिक्षणांमुळे जागतीक विज्ञानक्षेत्रास कायमस्वरुपी आणि तितकीच मोलाची मदत झाली आहे.

Web Title: Nobel to three researchers who invented gravitational waves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.