"10 नवीन ओलिसांना सोडल्यास 1 दिवसाचा युद्धविराम"; नेतन्याहू यांची हमासला नवी ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 12:49 PM2023-11-23T12:49:45+5:302023-11-23T12:50:30+5:30

Israel Hamas War : इस्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे संचालक तजाची हानेग्बी यांनी बुधवारी सांगितलं की, "आम्ही ओलीस ठेवलेल्या लोकांच्या सुटकेसाठी पुढे जात आहोत." 

netanyahu new offer to hamas release of every additional ten hostages one additional day pause | "10 नवीन ओलिसांना सोडल्यास 1 दिवसाचा युद्धविराम"; नेतन्याहू यांची हमासला नवी ऑफर

"10 नवीन ओलिसांना सोडल्यास 1 दिवसाचा युद्धविराम"; नेतन्याहू यांची हमासला नवी ऑफर

इस्रायल आणि गाझा यांच्यात युद्धविरामावर चर्चा झाली आहे. या युद्धविरामाच्या बदल्यात हमास ओलीस ठेवलेल्या सुमारे 50 लोकांना सोडणार आहे. तर इस्रायल आपल्या तुरुंगात बंद असलेल्या सुमारे 150 पॅलेस्टिनींची सुटका करणार आहे. इस्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे संचालक तजाची हानेग्बी यांनी बुधवारी सांगितलं की, "आम्ही ओलीस ठेवलेल्या लोकांच्या सुटकेसाठी पुढे जात आहोत." 

करारानुसार, हमास चार दिवसांत मुलं आणि महिलांसह 50 ओलिसांची सुटका करेल. त्याच वेळी, प्रत्येक इस्रायली ओलिसाच्या बदल्यात, इस्रायल आपल्या तुरुंगात असलेल्या 3 पॅलेस्टिनींची सुटका करेल. म्हणजे एकूण 150 पॅलेस्टिनींना सोडण्यात येणार आहे. हमासने सोडलेल्या ओलिसांमध्ये तीन अमेरिकनही असतील. दोन्ही बाजूंनी आणखी ओलीस सोडले जाण्याची शक्यता आहे.

याच दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमाससमोर नवी अट ठेवली आहे. नेतन्याहू यांनी मंगळवारी सांगितलं की, दहा ओलिसांना सोडण्याच्या बदल्यात एक अतिरिक्त दिवस युद्धविराम असेल. ओलिसांच्या सुटकेचा पहिला टप्पा नियोजित प्रमाणे पार पडल्यास, हमासकडून आणखी 20 ओलिसांची सुटका केली जाईल आणि युद्धविराम देखील वाढविला जाईल.

हमासने सात ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये 1400 लोक मारले गेले. तर हमासने इस्रायलमधील 240 लोकांना ओलीस ठेवले होते. त्यांना गाझामध्ये ठेवण्यात आले आहे. हमासने आतापर्यंत 4 ओलिसांची सुटका केली आहे. तर एका इस्रायली सैनिकाला आयडीएफने वाचवले आहे. अल शिफा हॉस्पिटलजवळ दोन ओलिसांचे मृतदेह सापडल्याचा इस्रायलचा दावा आहे. ओलिसांच्या देवाणघेवाणीवर लक्ष ठेवण्यासाठी दोहामध्ये ऑपरेशन सेंटर सुरू केले जाऊ शकते. हमास गाझामधील ओलिसांना इंटरनॅशनल कमिटी ऑफ रेड क्रॉसकडे सोपवणार आहे. 
 

Web Title: netanyahu new offer to hamas release of every additional ten hostages one additional day pause

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.