थायलंडमध्ये लष्करी बंड

By admin | Published: May 23, 2014 12:16 AM2014-05-23T00:16:18+5:302014-05-23T00:16:18+5:30

थायलंडमध्ये मार्शल लॉ जाहीर करून राजकीय पक्षांना वाटाघाटींचे आवाहन करणार्‍या लष्कराने गुरुवारी अनपेक्षितपणे बंडाची घोषणा करून सत्ता हाती घेतली आहे

Military rebellion in Thailand | थायलंडमध्ये लष्करी बंड

थायलंडमध्ये लष्करी बंड

Next

बँकॉक : थायलंडमध्ये मार्शल लॉ जाहीर करून राजकीय पक्षांना वाटाघाटींचे आवाहन करणार्‍या लष्कराने गुरुवारी अनपेक्षितपणे बंडाची घोषणा करून सत्ता हाती घेतली आहे. गेले सात महिने चाललेल्या आंदोलनामुळे अस्थिर व ठप्प झालेल्या देशात राजकीय सुधारणा व स्थैर्य आणण्याचा निर्धार लष्कराने जाहीर केला आहे. लष्करप्रमुख जनरल प्रयुत चान ओ चान यांनी टीव्हीवर ही घोषणा केली. सध्याच्या अस्थिर स्थितीत देशातील संघर्ष अधिक चिघळू नये म्हणून लष्कराला सत्ता हाती घेणे गरजेचे होते असे त्यांनी सांगितले. मंगळवारी प्रयुत यांनी मार्शल लॉ जाहीर केला होता व हे लष्कराचे बंड नव्हे असे म्हटले होते. देशात पुन्हा शांतता प्रस्थापित होण्यासाठी राष्टÑीय शांतता समितीने स्थानिक वेळेनुसार २२ मे रोजी दुपारी ४.३० वाजता सत्ता हाती घेतली आहे. या समितीत थाई लष्कर, रॉयल हवाई दल व पोलीस यांचे सदस्य आहेत. थाई नागरिकांनी शांत राहावे व सरकारी कर्मचार्‍यांनी नेहमीप्रमाणे काम करावे असे आवाहन प्रयुत यांनी केले आहे. लष्कराने राजकीय पक्षांची वाटाघाटींची दुसरी फेरी जिथे चालू होती, ते लष्करी कार्यालय सीलबंद केले आहे. गेले सात महिने सरकारविरोधी आंदोलन चालू होते. त्यानंतर लष्कराने पुढाकार घेऊन चालू केलेल्या वाटाघाटीतही विरोधकांचे एकमत झाले नाही. बुधवारी लष्करप्रमुखांनी मध्यस्थाची भूमिका निभावली. राजकीय हिंसाचारात २८ जणांचा बळी तसेच शेकडो लोक जखमी झाल्यानंतर लष्कराने हे बंड केले आहे. परदेशी नागरिकांना पूर्णपणे संरक्षण दिले जाईल असे लष्कराने सांगितले. या महिन्याच्या सुरुवातीस न्यायालयानेही यिंगलुक शिनवात्रा यांच्यावर सत्तेचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवत पंतप्रधान पदावरून त्यांची हकालपट्टी करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर काळजीवाहू पंतप्रधान निवत्तुमोरोंग बूनसोंगपासियन यांना सत्ता देण्यात आली. (वृत्तसंस्था)

Web Title: Military rebellion in Thailand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.