FB डेटा लीक प्रकरणी झुकरबर्गला चूक मान्य, कठोर पावलं उचलण्याचं आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2018 07:47 AM2018-03-22T07:47:25+5:302018-03-22T10:21:17+5:30

फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी डेटा चोरी प्रकरणासंबंधित फेसबुकवर एक पोस्ट लिहीत चुप्पी तोडली आहे.

mark zuckerberg accepts mistake in facebook data breach matter cambridge analytica | FB डेटा लीक प्रकरणी झुकरबर्गला चूक मान्य, कठोर पावलं उचलण्याचं आश्वासन

FB डेटा लीक प्रकरणी झुकरबर्गला चूक मान्य, कठोर पावलं उचलण्याचं आश्वासन

Next

न्यू-यॉर्क - अमेरिकेसह अनेक देशांच्या निवडणुकांमध्ये 5 कोटी लोकांचा डेटा चोरून मतदारांवर प्रभाव पाडण्याच्या आरोपामुळे फेसबुक सध्या चर्चेचा विषय बनला आहे. यादरम्यान फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी डेटा चोरी प्रकरणासंबंधित फेसबुकवर एक पोस्ट लिहीत चुप्पी तोडली आहे. डेटा चोरी प्रकरणात कंपनीकडून आतापर्यंत अनेक पाऊल उचलण्यात आली आहेत आणि यापुढेही कठोर पाऊल उचलले जाईल. पुन्हा असे प्रकार होणार नाहीत, असे आश्वासन देत झुकेरबर्ग यांनी केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका प्रकरणात झालेली आपली चूक मान्य केली आहे. 

झुकेरबर्ग यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'युजर्सचा डेटा सुरक्षित ठेवणं आमची जबाबदारी आहे. जर आम्ही यामध्ये अपयशी ठरत असू तर ही आमची चूक आहे. दरम्यान, याप्रकरणी आम्ही अनेक पाऊलं उचलली होती, आमच्याकडून अनेक चुकाही झाल्या आहेत. या चुका सुधारण्यासाठी योग्य त्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत. मी फेसबुकचा संस्थापक आहे, त्यामुळे फेसबुक संबंधित कोणतीही चुकीची गोष्ट होत असेल तर त्यास मी जबाबदार आहे. झालेल्या प्रकरणांतून आम्ही आमच्या चुका जाणून घेण्याचा प्रयत्न करत राहू आणि पुन्हा तुमचा विश्वास संपादीत करू'

आपल्या फेसबुक पोस्टमध्ये मार्क झुकेरबर्ग यांनी संपूर्ण प्रकरणातील घडामोडी समाजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. 2007मध्ये फेसबुकमधील अनेक गोष्टी अपडेट करण्यात आल्याचं यावेळी झुकेरबर्ग यांनी सांगितलं. यामध्ये वाढदिवस, अॅड्रेस बुक, नकाशा यांसारख्या कित्येत अॅप्सचा समावेश होता. यासाठी आम्ही फेसबुक युजर्सकडून काही माहिती घेतली, यामध्ये त्यांचे कोण-कोण मित्र आहेत यासारख्या माहितीचा समावेश होता. 

'2013 मध्ये केम्ब्रिज विद्यापीठामधील रिसर्चर अलेक्झांडर कोगनने पर्सनॅलिटी क्विझ अॅप तयार केला. या अॅपचा जवळपास 3 लाख लोकांनी वापर केला. त्यांनी स्वतःची तसेच मित्रांची खासगी माहिती या अॅपवर शेअर केली. 2014 मध्ये फेसबुकने धोरणात बदल केला. आता कोगनच्या अॅपवर मित्रांची माहिती शेअर करता येणार नव्हती. यासाठी मित्राकडेही ते अॅप असणे बंधनकारक झाले. 2015 मध्ये कोगनने या अॅपद्वारे मिळालेली माहिती 'केम्ब्रिज अॅनालिटिका'ला दिल्याचे समोर आले. हा प्रकार नियमांचं उल्लंघन करणारा होता यानंतर आम्ही तातडीने कोगनच्या अॅपवर बंदी आणण्यात आली. तसेच कोगन आणि केम्ब्रिज अॅनालिटिकानेही त्यांना मिळालेला डेटा डिलीट करावा, अशी सूचना केली. त्यांनी डेटा डिलीट केला नाही, हे गेल्या आठवड्यात समोर आल्यानंतर आम्ही केम्ब्रिज अॅनालिटिकावरही बंदी घातली, असे त्यांनी सांगितले.


मि. झुकरबर्ग आम्ही हे कदापि खपवून घेणार नाही- रविशंकर प्रसाद  
दुसरीकडे, फेसबुक सदस्यांचा डेटा चोरून मतदारांवर प्रभाव पाडण्याचा आरोप असणाऱ्या  कंपनीवरून आता भारतीय राजकारणात खडाजंगी सुरू झाली आहे. डेटा चोरीचा आरोप असणा-या कंपनीची सेवा काँग्रेस घेणार असल्याची टीका करून भाजपाने नव्या वादंगाला तोंड फोडले आहे. काँग्रेसने त्याचा स्पष्ट इन्कार करताना भाजपानेच 2014 साली या कंपनीची मदत घेतल्याचा आरोप केला. केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका या कंपनीची सेवा घेतल्याप्रकरणी माहिती आणि तंत्रज्ञानमंत्री रवी शंकर प्रसाद यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. हा प्रकार गंभीर आहे. या कंपनीशी काँग्रेसचा संबंध असल्याचा आरोपही त्यांनी केला.

अमेरिका, ब्रिटन, केनिया, ब्राझीलमधील निवडणुकांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा या कंपनीवर आरोप आहे. कंपनीने अनेक देशांत गुप्तहेर, आकर्षक महिलांच्या माध्यमातून जाळे टाकून तसेच खोट्या बातम्या पेरून निवडणुकांवर प्रभाव टाकला. आम्ही प्रसार माध्यमांचे स्वातंत्र्य आणि अभिव्यक्तीचे समर्थन करतो. तथापि, दुरुपयोग करून अनिष्ट पद्धतीने निवडणुका प्रभावित करणे अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा रवी शंकर प्रसाद यांनी दिला आहे. भारतात असला प्रकार कदापि खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही रवी शंकर प्रसाद यांनी दिला.

इशारा फेसबुकलाच
फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांना स्पष्ट इशारा देत रवी शंकर प्रसाद म्हणाले की, भारतात फेसबुकचे 20 कोटी सदस्य आहेत. त्यांच्या वैयक्तिक गोपनीय माहितीचा दुरुपयोग केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. कारवाईसाठी त्यांना भारतातही बोलावले जाऊ शकते. डेटा चोरीचाच नव्हे, तर लोकशाही मूल्ये व निष्पक्ष निवडणुकीचा प्रश्न आहे. या प्रकाराने फेसबुक आणि दस्तूरखुद्द मार्क झुकेरबर्ग यांची प्रतिष्ठा डागाळली असली तरी या प्रकरणी दोघे मौन बाळगून आहेत.

शेअर घसरला
अमेरिकेत फेसबुकवर डेटाचोरीचा आरोप झाल्यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार घसरण झाली. सोमवारी (19 मार्च) कंपनीचे बाजार भांडवल जवळपास साडेतीनशे अब्ज रुपयांनी घसरले होते.

Web Title: mark zuckerberg accepts mistake in facebook data breach matter cambridge analytica

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.