ठळक मुद्दे "हिजबोल्ला जोपर्यंत लेबनॉन सरकारमध्ये आहे तोवर लेबनॉनला सौदी अरेबिया विरोधी देशच मानेल. हिजबोल्लाचा सरकारमध्ये समावेश म्हणजे सौदी अरेबियाविरोधात युद्ध पुकारल्यासारखेच आहे" असे मत सौदीचे आदेल अल-जुबेर यांनी व्यक्त केले आहे.

बैरुत- सौदी अरेबियामध्ये असलेल्या आमच्या पंतप्रधानांना परत पाठवा अशी मागणी लेबनॉनने केली असून सौदीने आपल्या पंतप्रधानांना ताब्यात घेऊन सौदी अरेबियामध्येच ठेवल्याचा आरोप लेबनॉनने केला आहे. गेल्या आठवडाभरात सौदी अरेबिया आणि लेबऩनमधील तणाव वाढीस लागला आहे. मध्यपुर्वेतील वातावरण नव्याने चिघळण्याची शक्यता आहे. लेबनॉनचे पंतप्रधान साद अल हारिरी यांनी सहा दिवसांपुर्वी सौदी अरेबियातून आपल्या पदाचा राजीनामा दिला. "हिजबोल्लाच्या मार्फत इराण आपली लेबनॉनमधील शक्ती वाढवत असून सरकारचा ताबा हिजबोल्लाने घेतला घेतला आहे, आपल्याला ठार मारण्यासाठी कट आखला जात असल्याची जाणीव मला झाली " असे हारिरी यांनी स्पष्ट केले आहे. काही राजकीय नेत्यांच्या मतानुसार सौदीने हारिरी यांना नजरकैदेत ठेवले असून त्यांना राजीनामा देण्याचे आदेशही सौदी अरेबियानेच दिले होते.


सौदी नागरिकांनो लेबनॉनमध्ये राहू नका- सौदी अरेबियाचे आदेश
सौदी अरेबियाने आपल्या नागरिकांना लेबनॉन सोडण्याचे आदेश दिले आहेत. लेबनॉनमधील हिजबोल्ला संघटनेला इराणचे पाठबळ मिळत असल्याचा सौदी अरेबियाचा आरोप आहे. इराण सर्व प्रदेशात आपले बळ वाढवत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अमेरिका आणि इस्रायलने पाठबळ दिल्यावर सौदीने ही भूमिका घेतली आहे.
सौदीने आपल्या नागरिकांना लेबनॉन सोडण्याचे आदेश दिल्यानंतर बाहरिन आणि कुवेतनेही आपल्या नागरिकांना माघारी येण्याच्या सूचना केल्या आहेत. "हिजबोल्ला जोपर्यंत लेबनॉन सरकारमध्ये आहे तोवर लेबनॉनला सौदी अरेबिया विरोधी देशच मानेल. हिजबोल्लाचा सरकारमध्ये समावेश म्हणजे सौदी अरेबियाविरोधात युद्ध पुकारल्यासारखेच आहे" असे मत सौदीचे आदेल अल-जुबेर यांनी व्यक्त केले आहे.
 2006 सालच्या युद्धबंदी करारानुसार लेबनॉनने सीमेपासून हिजबोल्लाला दूर ठेवावे आणि हिजबोल्ला संघटना पूर्णपणे शक्तीहीन करण्याकडे लक्ष दिले पाहिजे असे मत इस्रायलचे गुप्तचर वार्ता मंत्री यिझराएल काट्झ यांनी व्यक्त केले आहे.