कुलभूषण जाधव खटल्यात नेमले तीन अ‍ॅमिकस क्युरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 01:56 AM2020-08-05T01:56:46+5:302020-08-05T01:57:24+5:30

पाकिस्तानचे अ‍ॅटर्नी जनरल खालीद जावेद खान यांनी पत्रकारांना सांगितले की, पाकिस्तानात वकिली करण्याचा परवाना असलेल्या कोणत्याही वकिलास भारत सरकार जाधव यांची बाजू मांडण्यासाठी नेमू शकते.

Kulbhushan Jadhav appointed three amicus curiae in the case | कुलभूषण जाधव खटल्यात नेमले तीन अ‍ॅमिकस क्युरी

कुलभूषण जाधव खटल्यात नेमले तीन अ‍ॅमिकस क्युरी

googlenewsNext

इस्लामाबाद : हेरगिरी व दहशतवादी कृत्ये केल्याच्या आरोपावरून देहदंडाची शिक्षा झालेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या खटल्यामध्ये तीन पाकिस्तानी ज्येष्ठ वकिलांची अ‍ॅमिकस क्युरी म्हणून इस्लामाबाद उच्च न्यायालयाने नेमणूक केली आहे. जाधव यांच्यासाठी वकील नियुक्त करण्याकरिता भारताला ‘आणखी एक संधी’ देण्यात यावी, असे आदेश इस्लामाबाद उच्च न्यायालयाने पाकिस्तान सरकारला दिले आहेत.
पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील अबीद हसन मंटो, हमीद खान व पाकिस्तानचे माजी अ‍ॅटर्नी जनरल मकदूम अली खान या तिघांची कुलभूषण जाधव खटल्यामध्ये अ‍ॅमिकस क्युरी म्हणून इस्लामाबाद उच्च न्यायालयाने नियुक्ती केली आहे. या याचिकेची पुढील सुनावणी ३ सप्टेंबर रोजी विस्तारित खंडपीठासमोर होणार आहे.

पाकिस्तानचे अ‍ॅटर्नी जनरल खालीद जावेद खान यांनी पत्रकारांना सांगितले की, पाकिस्तानात वकिली करण्याचा परवाना असलेल्या कोणत्याही वकिलास भारत सरकार जाधव यांची बाजू मांडण्यासाठी नेमू शकते. इस्लामाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अतार मिनल्ला यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे सध्या सुनावणी सुरू आहे. जाधव यांच्याकरिता वकील नियुक्त करण्यासाठी भारताला आणखी एक संधी दिली पाहिजे, असे न्या. मिनल्ला यांनी सांगितले. कुलभूषण जाधव यांची बाजू मांडण्यासाठी जर पाकिस्तानी वकील नेमला, तर त्याला साह्य करण्यासाठी भारतीय वकिलांचे पथक नेमण्यात येईल का, या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर अ‍ॅटर्नी जनरल खालीद जावेद खान म्हणाले की, असा कोणताही पर्याय विचारात नाही. 

कायदेशीर मदतीचा मार्ग रोखला; भारताची टीका
कुलभूषण जाधव यांना कायदेशीर मदत मिळण्याचे सर्व मार्ग पाकिस्तानने रोखून धरले आहेत, असा आरोप भारताने गेल्या महिन्यात केला होता. जाधव यांच्याकरिता वकील नेमण्यासाठी परवानगी द्यावी, अशी विनंती पाकिस्तान सरकारने २२ जुलै रोजी उच्च न्यायालयाला केली होती. त्या फेरविचार याचिकेची सुनावणी दोन न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे घेण्यात आली. कुलभूषण जाधवप्रकरणी पाकिस्तानने घेतलेल्या आडमुठ्या भूमिकेवर भारत सातत्याने टीकेची झोड उठवीत आहे.

Web Title: Kulbhushan Jadhav appointed three amicus curiae in the case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.