पाकिस्तानचे 'मिशन काश्मीर'; धुमसता प्रश्न सोडवण्यासाठी चक्क इम्रान खान सरकारचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 01:12 PM2018-08-28T13:12:40+5:302018-08-28T13:14:58+5:30

काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी प्रस्ताव तयार केला जात असल्याची पाकिस्तानच्या मंत्र्यांची माहिती

Imran Khans Pakistan Government To Come Out With Kashmir Conflict Resolution Proposal | पाकिस्तानचे 'मिशन काश्मीर'; धुमसता प्रश्न सोडवण्यासाठी चक्क इम्रान खान सरकारचा पुढाकार

पाकिस्तानचे 'मिशन काश्मीर'; धुमसता प्रश्न सोडवण्यासाठी चक्क इम्रान खान सरकारचा पुढाकार

इस्लामाबाद: पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी विराजमान होताच इम्रान खान यांनी काश्मीर प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी प्रस्ताव तयार केला जात असल्याची माहिती इम्रान खान सरकारमधील मंत्री शिरीन मजारी यांनी दिली आहे. हा प्रस्ताव तयार करण्याचं काम सुरू असून तो लवकरच कॅबिनेटमध्ये मांडला जाईल, असंही मजारी यांनी सांगितलं. 

पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाला काश्मीर प्रश्न सोडवायचा आहे. काश्मीरचा तिढा सुटावा, ही पक्षाची इच्छा असल्याचं मानवाधिकार मंत्री शिरीन मजारी यांनी पाकिस्तानमधील एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं. यासाठी प्रस्ताव तयार केला जात असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली. 'हा प्रस्ताव जवळपास तयार झाला असून आणखी आठवड्याभरात त्याचं काम पूर्ण होईल. यानंतर हा प्रस्ताव कॅबिनेटसमोर ठेवण्यात येईल. मात्र या प्रस्तावात नेमकं काय आहे, याची माहिती माझ्याकडे नाही,' असं मजारी म्हणाल्या. 

इम्रान खान यांनी निवडणुकीआधी आणि निवडणुकीनंतर भारतासोबत चांगले संबंध राखण्याची भाषा केली आहे. मात्र सत्तेत आल्यानंतर त्यांनी याबद्दल कोणतेही स्पष्ट संकेत दिले नव्हते. सीमारेषेवर शांतता राखण्याची भाषा करणाऱ्या इम्रान यांनी दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी कोणतंही पाऊल उचललेलं नाही. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पेओ यांनी इम्रान खान यांचं अभिनंदन करण्यासाठी त्यांना दूरध्वनी केला होता. यावेळी त्यांनी दहशतवादी संघटनांना आळा घालण्याचा मुद्दा उपस्थित केला. याबद्दल इम्रान खान यांनी नाराजीदेखील व्यक्त केली होती. 

Web Title: Imran Khans Pakistan Government To Come Out With Kashmir Conflict Resolution Proposal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.