‘तो’ एक राजपुत्र... आणि ‘ती’?... लग्न समारंभ एकूण १० दिवस चालणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 12:56 PM2024-01-15T12:56:27+5:302024-01-15T12:57:01+5:30

३२ वर्षांचा हा राजपुत्र आत्तापर्यंत जगातील मोस्ट एलिजिबल बॅचलर्सपैकी एक होता.

Brunei's Prince Abdul Mateen formally marries in 10-day celebration | ‘तो’ एक राजपुत्र... आणि ‘ती’?... लग्न समारंभ एकूण १० दिवस चालणार

‘तो’ एक राजपुत्र... आणि ‘ती’?... लग्न समारंभ एकूण १० दिवस चालणार

जगभरात आज अनेक देशांमध्ये जरी लोकशाही असली  तरीही अजूनही अनेकांना राजघराण्याचं सुप्त आकर्षण असतंच. अनेक लोकांना त्यांच्या देशातील राजे, काही वेळा नामधारी राजे, काही वेळा अस्तंगत झालेली राजघराणी याबद्दल अतिशय उत्सुकता असते. इंग्लंडचं राजघराणं हे त्याचं सगळ्यात जागतिक उदाहरण आहे. मात्र, पौर्वात्य देशांमध्ये असलेले राजे, राजपुत्र यांचीही बरीच चर्चा माध्यमांमध्ये आणि समाजमाध्यमांमध्ये होत असते. त्यात आघाडीवर असलेलं नाव म्हणजे ब्रुनेई देशाचा राजपुत्र अब्दुल मतीन!

३२ वर्षांचा हा राजपुत्र आत्तापर्यंत जगातील मोस्ट एलिजिबल बॅचलर्सपैकी एक होता. अत्यंत देखणा आणि व्यायाम करून फिट असलेला हा राजपुत्र लाखो मुलींच्या हृदयाची धडकन आहे. अब्दुल मतीन हा प्रशिक्षित हेलिकॉप्टर पायलट आहे. तो ब्रुनेईच्या रॉयल एअर फोर्समध्ये मेजर या पदावर आहे. तो पोलो खेळतो आणि त्यात त्याने अनेक पदकं मिळवलेली आहेत.  अब्दुल राजपुत्र तर आहेच; पण, सोशल मीडिया स्टारही आहे. त्याला इन्स्टाग्रामवर २.५ मिलियन फॉलोअर्सदेखील आहेत. मात्र, नुकतीच त्याने त्याच्या या लाखो चाहत्यांना अशी बातमी दिली आहे ज्यामुळे त्यांना आनंद तर होईल; पण, त्याचवेळी अनेक मुलींच्या भावना धुळीस मिळणार आहेत. कारण, या हॉट आणि सेक्सी समजल्या जाणाऱ्या राजपुत्राने लग्न करायचं ठरवलं आहे.

प्रिन्स मतीन हा ब्रुनेईचे सुलतान हसनल बोलकिया यांचा मुलगा आहे. ब्रुनेई हा जरी लहानसा देश असला, तरी हे राजघराणं जगातील सगळ्यात श्रीमंत राजघराण्यांपैकी एक समजलं जातं. त्यांची एकूण संपत्ती ही जवळ जवळ २८ बिलियन डॉलर्स आहे. त्यांच्याकडे अनेक खाजगी जेट विमानं, शेकडो रोल्स रॉईस आणि फेरारीसारख्या महागड्या गाड्या, १७०० खोल्यांचा आलिशान महाल आहे. या राजघराण्यातील राजपुत्र असलेला प्रिन्स मतीन हा राजगादीचा सहावा दावेदार आहे. तो सुलतानाचा चौथा मुलगा आणि दहावं अपत्य आहे.

अब्दुल मतीनची  वधू, अनिशा रॉसना इसा-कॅलेबीक ही राजघराण्यातील नाही हे विशेष आहे. मात्र, तिच्या कुटुंबाचे राजघराण्याशी वेगळ्या प्रकारचे आणि अतिशय घनिष्ठ संबंध आहेत. इसा-कॅलेबिकचे आजोबा म्हणजे पेहीन दातो इसा. ते ब्रुनेईच्या सुलतानाच्या विशेष सल्लागारांपैकी एक आहेत. त्याचबरोबर ते रॉयल ब्रुनेई एअरलाइन्सचे फाउंडिंग चेअरमनही आहेत. २९ वर्षांच्या अनिशाचा स्वतःचा ‘सिल्क कलेक्टिव्ह’ नावाचा फॅशन ब्रँड आहे आणि ‘ऑथेन्टिनरी’ नावाच्या एका ट्रॅव्हल कंपनीमध्ये ती भागीदार आहे.

या दोघांनी ते लग्न करणार आहेत ही घोषणा लग्न २०२३ सालच्या ऑक्टोबर महिन्यात केली. मात्र, ते दोघं त्याच्या बऱ्याच पूर्वीपासून एकमेकांच्या प्रेमात होते आणि त्यांचं प्रेम प्रकरण होतंच, असंही अनेकजण म्हणतात. त्यांच्या या प्रेमाचे ठोस पुरावे जरी नसले तरी क्वचित ठिकाणी ते एकमेकांबरोबर दिसून आलेले आहेत.  २०२२ साली प्रिन्स मतीनच्या बहिणीचं, म्हणजे प्रिन्सेस अझेमा निमतुल बोलकिआ हिचं प्रिन्स फदझिला याच्याशी लग्न झालं. त्या लग्नातही प्रिन्स मतीन आणि इसा-कॅलेबिक हे एकत्र भाग घेताना दिसले होते. आता मात्र ते अधिकृतरीत्या लग्नगाठ बांधत आहेत. थोडा पारंपरिक आणि थोडा शाही असणारा हा लग्न समारंभ एकूण १० दिवस चालणार आहे.

या लग्नाची सुरुवात ७ जानेवारीलाच झालेली असून, १६ जानेवारीपर्यंत हे लग्न चालणार आहे. या राजघराण्यातील लग्नं कायमच अशी दिवसचे दिवस चालतात. ती परंपरा या लग्नातही पाळण्यात येणार आहे. या सगळ्या सेलिब्रेशनच्या आधी ११ जानेवारीला सोन्याचा घुमट असलेल्या सुलतान ओमार अली सैफुद्दीन मशिदीत जाऊन मुख्य लग्न पार पडलं. या लग्नाला फक्त पुरुष पाहुण्यांना उपस्थित राहण्याची परवानगी होती. इतकंच नाही, तर खुद्द नवरीलादेखील स्वतःच्या लग्नासाठी या मशिदीत जाण्याची परवानगी नव्हती.
पुढील सोहळ्यांना ब्रिटिश  राजघराण्याचे सदस्य या लग्नाला उपस्थित राहातील, असा अंदाज आहे. कारण, प्रिन्स मतीन आणि ब्रुनेईचे सुलतान हे ब्रिटिश राजघराण्यातील महत्त्वाच्या कार्यांमध्ये अनेकदा दिसलेले आहेत. त्याचप्रमाणे हे दोघं २०२३ साली जॉर्डनच्या राजघराण्यातील लग्नाला उपस्थित असल्यामुळे जॉर्डनच्या रॉयल फॅमिलीतील सदस्यदेखील या लग्नाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

लग्न... आणि मग वरातही!
दहा दिवसांचा हा लग्नसोहळा पार पडल्यानंतर  ब्रुनेई राजघराण्यातील या नवपरिणीत दाम्पत्याची वरात काढण्यात येणार आहे. ही वरात बंदर सेरी बगवान या ब्रुनेईच्या राजधानीच्या रस्त्यांवरून मिरवत जाईल. आणि या सगळ्या सोहळ्याची अखेर अर्थातच एका जंगी मेजवानीने होईल!

Web Title: Brunei's Prince Abdul Mateen formally marries in 10-day celebration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.