जाणून घ्या स्टीफन हॉकिंग यांच्याबद्दलच्या 7 दुर्मिळ गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2018 11:04 AM2018-03-14T11:04:16+5:302018-03-14T11:04:16+5:30

स्टीफन हॉकिंग हे खूप आळशी असल्यामुळे अभ्यासाचा कंटाळा करायचे.

10 Amazing Facts About Stephen Hawking That You Must Know | जाणून घ्या स्टीफन हॉकिंग यांच्याबद्दलच्या 7 दुर्मिळ गोष्टी

जाणून घ्या स्टीफन हॉकिंग यांच्याबद्दलच्या 7 दुर्मिळ गोष्टी

googlenewsNext

प्रख्यात भौतिकशास्त्रज्ञ आणि विश्वशास्त्रज्ञ आणि लेखक स्टीफन हॉकिंग यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी केंब्रिज येथे निधन झाले. विश्वशास्त्र (कॉस्मॉलॉजी) आणि क्वांटम ग्रॅव्हिटी या दोन शाखांमध्ये कृष्णविवरांच्या संदर्भात त्यांचे योगदान मोठे होते. २००९ मध्ये त्यांना प्रेसिडेन्शिअल मेडल फॉर फ्रीडम या अमेरिकेतील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले होते. कमांडर ऑफ दी ब्रिटिश एम्पायर या पुरस्काराने त्यांना गौरवले होते. याशिवाय, त्यांनी भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र हे क्लिष्ट विषय सामान्यांनाही समाजावेत, यादृष्टीने लिखाण केले. त्यांचे 'ब्रिफ हिस्टरी ऑफ टाईम' हे पुस्तक विशेष गाजले. या पुस्तकात त्यांनी बिग बँग आणि कृष्णविवरासंदर्भात सविस्तर विवेचन केले होते.

शाळेत स्टीफन हॉकिंग हुशार विद्यार्थी नव्हते
ब्रह्मांडाच्या उत्त्पतीविषयी अनेक महत्वपूर्ण सिद्धांत मांडणारे स्टीफन हॉकिंग हे शाळेत असताना मात्र फारसे हुशार नव्हते. नववीत असताना त्यांना वर्गात सर्वात कमी गुण मिळाले होते. त्यानंतर प्रयत्न करुनही स्टीफन हॉकिंग शाळेत सामान्य विद्यार्थीच राहिले. त्यांच्या शिक्षकांच्या माहितीनुसार स्टीफन हॉकिंग हे खूप आळशी असल्यामुळे अभ्यासाचा कंटाळा करायचे. मात्र, त्या वयातही त्यांना विश्वातील अनेक गोष्टींविषयी कुतूहल होते. 

हॉकिंग ऑक्सफर्डच्या रोईंग टीमचे सदस्य होते
स्टीफन हॉकिंग्ज यांनी भौतिकशास्त्राच्या अभ्यासासाठी ऑक्सफर्डमध्ये प्रवेश घेतला तेव्हा त्यांचा स्वभाव खूपच बुजरा होता. त्यामुळे एकटेपणा आणि कंटाळा घालवण्यासाठी ते विद्यापीठाच्या रोईंग टीममध्ये सामील झाले. मात्र, जोरात वल्ही मारण्याएवढी ताकद त्यांच्या अंगात नसल्यामुळे स्टीफन यांना दिशादर्शकाचे काम देण्यात आले. 

लहान मुलांसाठीही हॉकिंग यांचे लेखन
स्टीफन हॉकिंग यांची विज्ञानाविषयीची अनेक पुस्तकं लोकप्रिय आहेत. मात्र, हेच स्टीफन हॉकिंग लहान मुलांसाठीही कथा लिहायचे हे वाचून अनेकांना आश्चर्य वाटेल. हॉकिंग यांनी त्यांची मुलगी ल्युसी हॉकिंग हिच्यासोबत लहान मुलांसाठी अनेक कथा लिहल्या होत्या. यापैकी 'जॉर्जस सिक्रेट की टू युनिव्हर्स' , 'जॉर्जस कॉस्मिक ट्रेझर हंट' ही पुस्तके लोकप्रिय ठरली. 

हॉकिंग यांची झिरो ग्रॅव्हिटी फ्लाईट
2007मध्ये हॉकिंग यांनी झिरो ग्रॅव्हिटी फ्लाईटचा अनुभव घेतला होता. या फ्लाईटमध्ये शुन्य गुरुत्वाकर्षण स्थितीत माणसाला तरंगात येते. यानिमित्ताने हॉकिंग अनेक वर्षांना आपल्या व्हीलचेअरवरून उठून हवेत तरंगण्याचा अनुभव घेतला होता. भविष्यात ग्लोबल वॉर्मिंगमुळे माणसांना दुसऱ्या ग्रहावर स्थलांतर करावे लागू शकते. त्यामुळे माणसाने शून्य गुरूत्वाकर्षण असलेल्या स्थितीत वावरायला शिकले पाहिजे, असे मत त्यावेळी हॉकिंग यांनी मांडले होते. 

हॉकिंग यांनी कार्टूनमधील स्वत:च्याच पात्राला दिला होता आवाज
हॉकिंग विश्वाची उत्त्पत्ती, कृष्णविवर यासारख्या गंभीर गोष्टींवर भाष्य करत असले तरी त्यांच्या जगण्याची आणखी एक मजेशीर बाजू होती. त्यांच्याकडे उत्तम विनोदबुद्धी होती. त्यांनी एका अॅनिमेटेड मालिकेतील द सिम्पसन्स ( The Simpsons ) या पात्राला आवाज दिला होता. 

हॉकिंग यांनी कृष्णविवरांच्या अस्तित्त्वाबद्दल लावली होती पैज
स्टीफन हॉकिंग यांनी 1997 साली अमेरिकन शास्त्रज्ञ जॉन प्रीस्कील यांच्यासोबत पैज लावली होती. कृष्णविवरांतून कोणतीच गोष्ट सुटू शकत नाही, अगदी माहितीदेखील, असा हॉकिंग यांचा दावा होता. मात्र, त्यांचा हा सिद्धांत पुढे चुकीचा ठरला. त्याबद्दल 2004 मध्ये हॉकिंग यांनी आपला पराभव मान्यही केला होता. 

हॉकिंग यांचा वैशिष्ट्यपूर्ण आवाज
स्टीफन हॉकिंग यांना बोलण्यासाठी स्पीच सिंथेसायझरचा वापर करावा लागत होता. या सिंथेसायझरमधील त्यांचा आवाज अमेरिकन धाटणीचा होता, परंतु स्टीफन हॉकिंग्ज हे ब्रिटीश होते. कंपनीने हा आवाज अन्य कोणत्याही सिंथेसायझरमध्ये पुन्हा वापरला नाही. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे सिंथेसायझरसाठी अधिक सुस्पष्ट आवाज बाजारपेठेत उपलब्ध आहेत. मात्र, हॉकिंग यांनी नवा आवाज वापरायला नकार दिला. त्यामुळे त्यांचा वैशिष्टपूर्ण आवाज ही त्यांची ओळख झाली होती. 
 

Web Title: 10 Amazing Facts About Stephen Hawking That You Must Know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.