अमेरिकेतील कंपनीमध्ये आदिवासी युवकाची निवड; राष्ट्रपतींनी दिल्लीत बोलावून केले कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 09:28 AM2024-04-15T09:28:28+5:302024-04-15T09:30:05+5:30

आदिवासी पाड्यावरच्या या युवकाने घेतलेल्या गगनभरारीमुुळे जिल्हावासीयांचा उर अभिमानाने फुलून आला आहे.

Selection of tribal youth in company America President called him to Delhi and praised him | अमेरिकेतील कंपनीमध्ये आदिवासी युवकाची निवड; राष्ट्रपतींनी दिल्लीत बोलावून केले कौतुक

अमेरिकेतील कंपनीमध्ये आदिवासी युवकाची निवड; राष्ट्रपतींनी दिल्लीत बोलावून केले कौतुक

लोकमत न्यूज नेटवर्क, बोर्डी/कासा : डहाणू तालुक्यातील बांधघर येथील महेश सुरेश गोरात या आदिवासी युवकाची अमेरिकेतील मायक्रोसॉफ्ट कंपनीत उच्च पदावर नेमणूक झाली आहे. आदिवासी पाड्यावरच्या या युवकाने घेतलेल्या गगनभरारीमुुळे जिल्हावासीयांचा उर अभिमानाने फुलून आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्याला राष्ट्रपती भवनात बोलावून सन्मानित केले. त्याच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

महेश सुरेश गोरात हा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत यशस्वी होऊन त्याने समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद शाळा बांधघर येथे झाले असून माध्यमिक शिक्षण पूज्य आचार्य भिसे हायस्कूल कासा येथे झाले आहे. उच्च माध्यमिक शिक्षण एम. के. ज्यु. कॉलेज चिंचणी येथे झाले. शिक्षणाबद्दलची तळमळ व गणित विषयातील आवड बघून त्याला कॉलेजच्या प्राचार्य, प्राध्यापिका यांनी पुढील शिक्षण आय.टी. क्षेत्रात घेण्यासाठी मदत केली. प्रेरणादायी बाब म्हणजे त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्याच्या वडिलांनी स्वतःची किडनी विकण्याची तयारी दाखवली होती. दरम्यान गुरुजन आणि वडिलांचा हा विश्वास त्यांनी सार्थ ठरवत बीएस्सी आयटीत ९७ टक्के गुण मिळवले.

समाजाची मान उंचावली
शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजला पूर्ण केले, तेथे सुद्धा पहिल्या दहामध्ये येण्याचा मान मिळवला. जिद्द आणि चिकाटी असली की कोणत्याही परिस्थितीवर मात करून यश मिळते, हे महेशने दाखवून दिले आहे. आदिवासी शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष यशवंत गावित, जिल्हा चिटणीस बच्चू वाडू, मार्गदर्शक भारण्या जाधव, तालुका संघटक लक्ष्मण पवार, तालुका सचिव दिनेश चौधरी, मधुकर जाधव, किशोर शिवदे, शनवार बुंधे, हरेश गावित यांनी गोरात कुटुंबीयांची भेट घेतली. महेशच्या यशामुळे आदिवासी समाजाची व जिल्हावासीयांची मान उंचावली आहे.

Web Title: Selection of tribal youth in company America President called him to Delhi and praised him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.