रास्तारोकोमुळे वाहतूक ठप्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 12:13 AM2018-10-15T00:13:26+5:302018-10-15T00:13:46+5:30

बाळापूर ठाण्यातील पोलीस अधिकारी असभ्य भाषा वापरत अरेरावी करत असल्याच्या निषेधार्थ आखाडा बाळापूर येथील व्यापारी, ग्रामस्थ व सर्वपक्षीय नेते, पदाधिकाऱ्यांनी नांदेड-हिंगोली महामार्गावर दीड तास रास्तारोको आंदोलन केले.

 Traffic jam due to roadblock! | रास्तारोकोमुळे वाहतूक ठप्प!

रास्तारोकोमुळे वाहतूक ठप्प!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
आखाडा बाळापूर : बाळापूर ठाण्यातील पोलीस अधिकारी असभ्य भाषा वापरत अरेरावी करत असल्याच्या निषेधार्थ आखाडा बाळापूर येथील व्यापारी, ग्रामस्थ व सर्वपक्षीय नेते, पदाधिकाऱ्यांनी नांदेड-हिंगोली महामार्गावर दीड तास रास्तारोको आंदोलन केले. बाळापुरची व्यापारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. ‘त्या’ अधिकाºयाची तातडीने बदली करून पोलिसाची दहशत संपवावी, या मागणीचे निवेदनही आंदोलकांनी दिले.
या प्रकरणी पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आखाडा बाळापूर येथील मराठवाडा चौकात दुर्गादेवीची प्रतिष्ठापणा करण्यात आली आहे. या सार्वजनिक दुर्गा देवीच्या लगत काहीजण जुगार खेळत असल्याची तक्रार फोनद्वारे पोलिसांना मिळाली. १३ आॅक्टोबर रोजी रात्री १०.२० वाजता त्यानुसार पोनि व्यंकटेश केंद्रे यांच्या आदेशावरून सपोनि ओमकांत चिंचोलकर व कर्मचारी तेथे पोहोचले. त्यावेळी तेथे १५ ते १६ जण जुगार खेळत असल्याचे आढळले. पण पोलिसांना पाहताच काहीजण पळाले तर त्यातले आठजण पोलिसांना सापडले. त्यांना पकडून ठाण्यात आणण्यात आले. जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त केली. तोपर्यंत ठाण्यात काही व्यापारी व ग्रामस्थ आले. हे अट्टल जुगारी नाहीत तर मंडळ पदाधिकारी असून मनोरंजन म्हणूत ते खेळत असल्याचे सांगत होते. त्यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे तेथे आले. त्यावेळी सपोनि ओमकांत चिंचोलकर व बोंढारे यांच्यात शाब्दीक बाचाबाची झाली. या शाब्दीक खडाजंंगीनंतर ठाण्यात वातावरण तापले. पोनि केंद्रे, उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकिरण काशीद यांनी व्यापारी, ग्रामस्थ यांच्याशी उत्तररात्रीपर्यंत चर्चा केली. यावेळी सपोनि ओमकांत चिंचोलकर यांनी आरेरावीची, असभ्य भाषा वापरून दबंगिरी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. त्यानंतर पोलीस अधिकाºयांच्या दडपशाहीविरोधात १४ आॅक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजता बाळापूर येथील जुने बसस्थानकजवळ नांदेड-हिंगोली रोडवर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी व्यापारी, ग्रामस्थ व सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते. संतप्त आंदोलकांनी चिंचोलकर मुर्दाबाद, चिंचोलकर हटाव, अशा घोषणा दिल्या. चिंचोलकर यांची बदली करा, अशा मागणीचे निवेदनही दिले. यावेळी आंदोलकांच्या भावना वरिष्ठांना कळविणार असल्याचे सांगून रास्तारोको आंदोलन संपविले. सपोनि ओमकांत चिंचोलकर यांच्या अरेरावीविरूद्ध व त्यांची तात्कार बदली करावी, या मागणीसाठी दिवसभर बाळापूरची व्यापारपेठ कडकडीत बंद होती. वाहतूक ठप्पमुळे वाहनांच्या लांबलचक रांगाच रांगा महामार्गावर लागल्या होत्या. यावेळी अनेकांची गैरसोय झाली.
अशा आहेत प्रतिक्रीया...
४बाळापूर येथील पोलीस अधिकारी चिंचोलकर हे असभ्य, ऊर्मट भाषा वापरून सर्वसामान्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या हुकुमशाही वर्तनापुढे आम्ही झुकणार नाही. लोकशाही पद्धतीने न्याय मागू, पोलिसांची हुकुमशाही चालू देणार नाही, त्यांनी जनतेचे सेवक म्हणून काम करावे मालक होण्याचा प्रयत्न करू नये अशी प्रतिक्रिया संजय बोंढारे यांनी दिली.
४पोलीस ठाण्यात येऊन गोंधळ घातल्याप्रकरणी ११० जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाली. याबाबत पोनि केंद्रे यांनी थेट माहिती देण्याचे टाळत कायदेशीर कारवाई होणारच, अशी सूचक प्रतिक्रिया दिली.
आठजणांविरूद्ध गुन्हा दाखल
४ आखाडा बाळापूर येथील मराठवाडा चौकातील दुकानाचे बाजूस झन्ना-मन्ना जुगार खेळत असताना रंगेहात पकडले. जुगाराचे साहित्य व रोख ३३५८० रुपये जप्त केले. सपोनि ओमकांत चिंचोलकर यांच्या फिर्यादीवरून गजानन शंकरराव जाधव, राजू दयानंद गिरी, मंगेश भगवानराव दुर्गे, उत्तम भोजाजी धांडे, लक्ष्मण कोंडबाराव बोंढारे, शिवचरण विजयकुमार गोयंका, अजय सखाराम अग्रवाल, शाम मदन व्यवहारे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title:  Traffic jam due to roadblock!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.