रस्ता बंद असल्याने चिखल तुडवत झोळीतून वृद्धाला उपचारासाठी नेताना वाटेतच मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 10:34 PM2022-07-18T22:34:20+5:302022-07-18T22:34:45+5:30

Hingoli : कळमनुरी तालुक्यातील पिंपरी खुर्द हे गाव नेहमीच  थोड्याशा पावसानेही बाळापूरचा संपर्क तुटणारे गाव आहे.

As the road was closed, the old man died on the way while taking the old man to treatment in a mud bag | रस्ता बंद असल्याने चिखल तुडवत झोळीतून वृद्धाला उपचारासाठी नेताना वाटेतच मृत्यू 

रस्ता बंद असल्याने चिखल तुडवत झोळीतून वृद्धाला उपचारासाठी नेताना वाटेतच मृत्यू 

googlenewsNext

आखाडा बाळापूर ( हिंगोली) :  रात्रीपासून पाऊस सुरू झाल्याने पुन्हा धांडे पिंपरी (खुर्द) रस्त्यावरील ओढ्याला पूर आला आणि बाळापूर -कान्हेगाव रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला. गावातील वृद्ध संभाजीराव धांडे यांना दवाखान्यात नेण्यासाठी चिखलाचा मार्ग निवडावा लागला. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना झोळीत टाकून चिखल तुडवत बाळापुरच्या दवाखान्यात नेण्यात आले. परंतु रस्त्यातच त्यांनी प्राण सोडला. ही घटना दिनांक 18 जुलै रोजी सकाळी बाराच्या सुमारास घडली. 

कळमनुरी तालुक्यातील पिंपरी खुर्द हे गाव नेहमीच  थोड्याशा पावसानेही बाळापूरचा संपर्क तुटणारे गाव आहे. चिखली, पिंपरी , कान्हेगाव हा मार्ग असलेल्या रस्त्यावर कयाधू नदी लगत असलेल्या नाल्यावर छोटा पूल बांधण्यात आला आहे. या पुलावरून थोड्याशा पावसानेही पाणी वाहत असते.  गेल्या तीन दिवसांपासून हा मार्ग ठप्प होता. काल रात्री पाऊस सुरू झाल्यानंतर पुन्हा हा मार्ग बंद पडला. आज दिनांक 18 जुलै रोजी धांडे पिंपरी येथील ज्येष्ठ नागरिक तथा माजी सरपंच संभाजीराव धांडे (वय 75 वर्ष) यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे बाळापुरला दवाखान्यात घेऊन जात होते. गावातून चालत निघालेल्या संभाजीराव धांडे यांना दम्याचा त्रास होता. मध्येच तो त्रास वाढल्याने त्यांना उचलून न्यावे लागले. परंतु चिखलाचा रस्ता असल्यामुळे मुख्य मार्ग बंद असल्यामुळे कॅनॉलच्या मार्गाने जावे लागत होते. जवळपास अर्धा किलोमीटर हा मार्ग चिखलातून जातो. 

चिखलातून त्यांना उचलून नेणे अवघड होत असल्याने कपड्याची झोळी तयार करून त्यांना त्यात टाकून गावातील तरुण गोविंद धांडे, सुरेश धांडे, केशव धांडे, बबन धांडे, संदीप धांडे, पोलीस पाटील रमेश धांडे, अतन धांडे यांनी लाकडाला बांधून पांघरुणाच्या कपड्याची झोळी तयार केली आणि त्यात संभाजीराव धांडे यांना बसवून तब्बल अर्धा किलोमीटरचे अंतर चिखल तुडवत कॅनल रोड पर्यंत आणले. त्यानंतर तिथून दुचाकीवर बसवून आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. ते मयत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. त्यांना वैद्यकीय उपचार मिळण्यास उशीर झाला. त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. 

पुन्हा त्यांचा मृतदेह चिखलाचा रस्ता तुडवत न्यावा लागला. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर  गावालगतच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.नेहमीच रस्ता बंद होत असल्याने कान्हेगाव, पिंपरी आणि चिखली या गावातील ग्रामस्थांना खूप त्रास सहन करावा लागतो. आता नागरिकांवर जीव गमावण्याचीही वेळ आली आहे. येथील पुलाची आणि रस्त्याची उंची वाढवल्याशिवाय हा प्रश्न कायमचा निकाली निघणार नसल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले. 

दर पावसाळ्यात मरणयातना भोगतो - पोलीस पाटील रमेश धांडे 
बाळापुरपासून जाणारा हा मार्ग चिखली , कान्हेगाव आणि पिंपरी या तीन गावांसाठीचा एकमेव मार्ग आहे. राष्ट्रीय महामार्गापासून केवळ एक किलोमीटरच्या अंतरावर हा रस्ता आहे. परंतु ओढ्यावरील पुलाची उंची कमी असल्याने थोडासाही पाऊस झाला की कायम हा मार्ग रहदारीसाठी बंद होतो. याबाबत दरवर्षी प्रशासन पाहणीसाठी येते. परंतु या रस्त्याची आणि पुलाची उंची वाढवण्यासाठी काहीच करत नाही. दरवर्षी या भागातील नागरिकांना मरण यातना भोगाव्या लागतात. आता तरी प्रशासनाने दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी पोलीस पाटील रमेश धांडे यांनी केली आहे.

Web Title: As the road was closed, the old man died on the way while taking the old man to treatment in a mud bag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.