मानवी शरीरात पहिल्यांदाच बसविली डुकराची किडनी, अमेरिकेत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 09:03 AM2024-03-24T09:03:35+5:302024-03-24T09:08:13+5:30

डॉक्टरांच्या टीमने १६ मार्च रोजी वेमाउथ येथे राहणाऱ्या रिचर्ड स्लेमॅन यांच्यावर ही प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पूर्ण केली. त्यांची प्रकृती पूर्णपणे स्वस्थ असून, लवकरच त्यांना घरी सोडले जाईल. 

Pig kidney implanted in human body for the first time, transplant surgery successful in America | मानवी शरीरात पहिल्यांदाच बसविली डुकराची किडनी, अमेरिकेत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

मानवी शरीरात पहिल्यांदाच बसविली डुकराची किडनी, अमेरिकेत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

वॉशिंग्टन : अमेरिकेत बोस्टनमध्ये मॅसेच्युएट्स जनरल हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी पहिल्यांदाच मानवी शरीरात डुकराच्या जनुकीय बदल केलेल्या  किडनीचे प्रत्यारोपण यशस्वीपणे केले आहे. यामुळे किडनीच्या आजारामुळे त्रस्त असलेल्या रुग्णांना मोठा दिलासा मिळू शकणार आहे. १९५४ मध्ये याच हॉस्पिटलमध्ये जगातील पहिली किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. डॉक्टरांच्या टीमने १६ मार्च रोजी वेमाउथ येथे राहणाऱ्या रिचर्ड स्लेमॅन यांच्यावर ही प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पूर्ण केली. त्यांची प्रकृती पूर्णपणे स्वस्थ असून, लवकरच त्यांना घरी सोडले जाईल. 

जेनेट्रान्सप्लांटेशन क्षेत्रात नवा अध्याय 
बाबत लेंगॉन ट्रान्सप्लांट इन्स्टिट्यूटचे डॉ. रॉबर्ट माँटेगोमेरी यांनी सांगितले की, जेनेट्रान्स प्लांटेशनच्या क्षेत्रात यामुळे नवा अध्याय लिहिला गेला आहे. जेव्हा मानवाला बिगर मानवी शरीरापासून म्हणजेच इतर प्राण्यांपासून  काढलेला एखादा अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेद्वारे बसविला जातो, त्या प्रक्रियेला जेनेट्रान्सप्लांटेशन असे म्हणतात. 

शास्त्रज्ञांनी नेमके काय केले? 
स्लेमॅन यांना बसविलेली किडनी मॅसेच्युएट्स जनरल हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या टीमने विकसित केली. शरीरात या किडनीचे प्रत्यारोपण करण्याआधी किडनीत काही जनुकीय बदल केले आहेत. यावर संशोधक गेल्या अनेक वर्षांपासून काम करीत होते. 
शास्त्रज्ञांनी प्रथम डुकराच्या किडनीतील रेट्रोव्हायरसला नष्ट केले. यामुळे मानवी शरीरात संक्रमण होण्याची भीती होती. त्यानंतर डुकराच्या किडनीमध्ये मानवी जनुके जोडण्यात आली. 

रुग्णांना मोठा दिलासा 
स्लेमॅन यांना गेल्या ११ वर्षांपासून किडनीचा आजार होता. २०१८ मध्ये त्यांना मानवी किडनी प्रत्यारोपणाद्वारे बसविली होती; परंतु पाच वर्षांत किडनी खराब झाली. त्यामुळे २०२३ पासून स्लेमॅन डायलिसिसवर होते. या आजारपणातून त्यांना सुटका मिळावी यासाठी अखेर डॉक्टरांनी त्यांना डुकराची किडनी बसवण्याचा निर्णय घेतला. जगभरात लाखो जण किडनीच्या आजाराने त्रस्त आहेत. असंख्य जणांना जिवाला मुकावे लागले आहे. हे उपचार खूप महागडे  असतात. अशा आजारांवर करण्यात येणारी शस्त्रक्रिया जटिलही असते. 

Web Title: Pig kidney implanted in human body for the first time, transplant surgery successful in America

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य