आल्याचा चहा ठरतो आरोग्यदायी; 'हे' आहेत फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 12:57 PM2018-12-05T12:57:07+5:302018-12-05T12:58:46+5:30

थंडी सुरू झाली की, गरमागरम चहाचा कप हवाहवासा वाटतो. अशावेळी सर्वांची पसंती असते ती आलं घातलेल्या चहाला. आल्याचा चहा सर्दी-खोकल्यासारख्या इतर आजारांपासून बचाव करण्यासाठी फायदेशीर ठरतो.

health benefits of ginger tea | आल्याचा चहा ठरतो आरोग्यदायी; 'हे' आहेत फायदे!

आल्याचा चहा ठरतो आरोग्यदायी; 'हे' आहेत फायदे!

googlenewsNext

थंडी सुरू झाली की, गरमागरम चहाचा कप हवाहवासा वाटतो. अशावेळी सर्वांची पसंती असते ती आलं घातलेल्या चहाला. आल्याचा चहा सर्दी-खोकल्यासारख्या इतर आजारांपासून बचाव करण्यासाठी फायदेशीर ठरतो. आल्याचा समावेश गरम पदार्थांमध्ये होतो. त्यामुळे आल्याच्या सेवनाने शरीराला उष्णता मिळते, त्याचप्रमाणे आळसही दूर होतो. 

आल्याचे अनेक औषधी फायदे आहेत. व्हिटॅमिन ए, सी, ई आणि बी-कॉम्प्लेक्सचा एक उत्तम स्त्रोत म्हणून आलं ओळखलं जातं. त्याचबरोबर मॅग्नेशिअम, फॉस्फरस, आर्यन, झिंक, कॅल्शिअम आणि बीटा कॅरेटीन मुबलक प्रमाणात असतात. तसेच आल्यात अॅन्टीफंगल, अॅन्टीबॅक्टेरिअल आणि अॅन्टीवायरल गुणधर्म भरपूर असतात. आल्याचा आहारात समावेश करण्यासाठी अनेक वेगवेगळे अपाय करता येतात. पण चहासोबत याचा वापर करणं फायदेशीर ठरतं. जाणून घेऊया आल्याच्या चहाच्या शरीराला होणाऱ्या फायद्यांबाबत... 

असा तयार करा आल्याचा चहा :

आल्याच्या चहाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. पण खऱ्या अर्थाने याचा लाभ घ्यायचा असेल तर थोड्या वेगळ्या पद्धतीने चहा तयार करणं गरजेचं असतं. तुम्ही आपल्या चहामध्ये आलं ठेचून घालू शकता किंवा मग चहा पावडरशिवाय आल्याचा चहा तयार करू शकता. 

- आल्याची साल काढून त्याचे छोटे छोटे तुकडे करा. 

- एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हे आल्याचे तुकडे टाकून उकळून घ्या. 

- पाणी उकळल्यानंतर हे पाणी गाळून घ्या. 

- त्यानंतर त्यामध्ये थोडं लिंबू पिळा.

- गोड करण्यासाठी तुम्ही त्यामध्ये साखर किंवा मधही मिक्स करू शकता. 

- आरोग्यदायी असा आल्याचा चहा पिण्यासाठी तयार आहे. 

आल्याच्या चहाचे शरीराला होणारे फायदे :

1. रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी

आल्याचा चहा शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मदत करतो. ज्यामुळे आपलं सर्दी-खोकल्यासारख्या आजारांपासून रक्षण होण्यास मदत होते. सर्दीमुळे होणाऱ्या डोकेदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी आलं फायदेशीर ठरतं. 

2. ब्लड प्रेशर

आल्याच्या चहाचे सेवन केल्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहण्यास मदत होते. तसेच ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी आलं उपयोगी ठरतं. त्याचबरोबर पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी, तसेच वात, पित्त आणि कफ यांसारख्या समस्या दूर ठेवण्यासाठीही आल्याचा चहा उपयुक्त ठरतो. 

2. मासिक पाळी 

मासिक पाळीदरम्यान महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या दिवसांमध्ये आल्याचा चहा पिणं उपयुक्त ठरतो. रक्तप्रवाह सुरळीत करण्यासोबतच मासिक पाळीदरम्यान शरीरात होणाऱ्या वेदना दूर करण्यासाठी हा चहा परिणामकारक ठरतो. 

3. तणावावर परिणामकारक

आल्याच्या चहाचे सेवन केल्यामुळे तणाव दूर होण्यास मदत होते. कारण आल्याचा गंध आणि इतर औषधी गुणधर्मांमुळे मेंदूचं आरोग्य चांगलं राखण्यास उपयोग होतो. तसेच आल्याचे गुणधर्म मेंदूच्या नसांवरील तणाव दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात. 

4. भूक लागण्यासाठी उपयोगी

जर तुम्हाला भूक लागत नसेल तर आल्याचा चहा पिणं तुमच्यासाठी लाभदायक ठरतं. आल्याचे गुणधर्म भूक वाढविण्यासाठी मदत करतात. दररोज आल्याच्या चहाचे सेवन केल्यामुळे भूक लागणं आणि पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी उपयुक्त ठरतं. 

5. सांधेदुखी दूर करण्यासाठी 

आलं आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. आयुर्वेदातही आल्याच्या औषधी गुणधर्मांबाबत सांगण्यात आले आहे. यातील औषधी गुणधर्म सांधेदुखीसारख्या समस्येवर परिणामकारक ठरतात. 

6. हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी 

आल्याच्या चहामध्ये व्हिटॅमिन, खनिजे आणि अमिनो अॅसिडचे प्रमाण असल्यानं रक्ताभिसरण सुधारण्यास मदत मिळते. यामुळे हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित असलेल्या समस्या कमी होतात. याशिवाय धमण्यांवर चरबी साचू नये, यासाठी आले उत्तम कार्य पार पाडते. यामुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका कमी होतो.

Web Title: health benefits of ginger tea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.