दोन ट्रकची समोरासमोर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 10:32 PM2019-05-06T22:32:47+5:302019-05-06T22:33:08+5:30

वडसा-कोहमारा राज्यमार्गावरील कुंभीटोला-येरंडी दरम्यान राज्य महामार्ग क्रमांक २७५ वरील साई ढाब्यानजीक विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. ही दुर्घटना सोमवारी (दि.६) सकाळी ८.१५ वाजतादरम्यान घडली. हा अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही ट्रकच्या दर्शनी भागाचा चुराडा झाला. यात एका चालकाचा मृत्यू झाल्याचे समजते.

The two trucks face in front of one another | दोन ट्रकची समोरासमोर धडक

दोन ट्रकची समोरासमोर धडक

Next
ठळक मुद्देचालकाचा मृत्यू : कुंभीटोला-येरंडी दरम्यान भीषण अपघात

लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : वडसा-कोहमारा राज्यमार्गावरील कुंभीटोला-येरंडी दरम्यान राज्य महामार्ग क्रमांक २७५ वरील साई ढाब्यानजीक विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. ही दुर्घटना सोमवारी (दि.६) सकाळी ८.१५ वाजतादरम्यान घडली. हा अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही ट्रकच्या दर्शनी भागाचा चुराडा झाला. यात एका चालकाचा मृत्यू झाल्याचे समजते. दोन्ही चालकांना क्रेन व जेसीबीच्या मदतीने बाहेर काढण्यात आल्याचे सांगण्यात येते.
ट्रक क्रमांक सीजे ०७-एझेड ८९९५ हा ट्रक रायपूरच्या दिशेने जात होता. तर ट्रक क्रमांक एमएच ३४-एव्ही ८८६७ हा वडसाकडे जात होता. याचा ट्रकचालक ही दुर्घटना घडण्याचा पाच मिनिटांपूर्वी कुंभीटोला येथील रेस्टारेंटमध्ये चहापानासाठी थांबला होता. अगदी दीड किमी अंतरावर गेल्यानंतर या दोन्ही ट्रकची अगदी समोरासमोर जबर धडक झाली. दोन्ही ट्रकच्या दर्शनी भागाचा चेंदामेंदा झाला. दोन्ही ट्रकमध्ये केवळ चालकच असल्याचे सांगण्यात येते. दोन्ही चालक कॅबिनमध्ये फसलेले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी जेसीबीचा वापर करण्यात आला. त्यांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांची चांगलीच दमछाक झाली.
तब्बल दोन तासानंतर त्यांना बाहेर काढण्यात आले. ट्रका चालक शुभम देवतादीन पाल (२६,रा. डोमीपूर कुटेलीया, उत्तरप्रदेश) व गोपी अंजूदीया यादव (२७,रा.बगमा, बिहार) जबर जखमी झाल्याने त्यांना नवेगावबांधच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र गोपी यादव याचा सुमारे १२ वाजता मृत्यू झाला तर शुभम पाल याला नागपूर येथे हलविण्यात आले आहे. आरोपी मृत गोपी यादव याच्यावर कलम २७९, ३०४ (अ), ३३८ भादंवि सहकलम १८४ मोवा का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार साईनाथ नाकाडे हे तपास करीत आहेत.
उत्तरीय तपासणीसाठी विलंब
गोपी यादव याच्या मृत्यूनंतर उत्तरीय तपासणीसाठी नवेगावबांध पोलिसांनी दस्तावेज तयार करुन नवेगावबांध ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे सादर केले. त्यांनी सायंकाळी ५ वाजता उत्तरीय तपासणी करु असे सांगितले. मात्र ६ वाजतापर्यंत उत्तरीय तपासणी झाली नव्हती. यामुळे संताप व्यक्त केला जात होता. याची चौकशी करुन आरोग्य यंत्रणेवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Web Title: The two trucks face in front of one another

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.