सट्टा जोमात; ठाणेदार कोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 12:06 AM2018-11-22T00:06:35+5:302018-11-22T00:08:11+5:30

शिस्त, गस्त व बंदोबस्त यांचे तंतोतंत पालन न करणाऱ्या पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाºयाला निलंबनाचा फटका सहन करावा लागत आहे. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी तिरोडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार संदीप कोळी यांच्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक हरिष बैजल यांनी मंगळवारी (दि.२०) रात्री उशीरा निलंबनाची कारवाई केली.

Speculative zodiac; Thanedekar Comat | सट्टा जोमात; ठाणेदार कोमात

सट्टा जोमात; ठाणेदार कोमात

googlenewsNext
ठळक मुद्देसंदीप कोळी निलंबित : पोलीस अधीक्षकांची सलग दुसरी कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शिस्त, गस्त व बंदोबस्त यांचे तंतोतंत पालन न करणाऱ्या पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्याला निलंबनाचा फटका सहन करावा लागत आहे. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी तिरोडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार संदीप कोळी यांच्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक हरिष बैजल यांनी मंगळवारी (दि.२०) रात्री उशीरा निलंबनाची कारवाई केली.
ठाणेदार कोळी यांच्या निलंबनाच्या आदेशामुळे तिरोडा पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आणखी काही कर्मचाऱ्यांचे निलंबन होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तिरोडा तालुक्यात सट्टा व्यवसाय जोमाने सुरू असल्यामुळे याचा दणका ठाणेदारालाच पोलीस अधीक्षकांनी दिला आहे. २० नोव्हेंबरला सायंकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयातून आलेल्या बंद लिफाफ्यात तिरोडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप कोळी यांना निलंबीत केल्याचे आदेश असल्याची चर्चा सुरू होतीे. मात्र, रात्री ८.३० च्या दरम्यान पोलीस निरीक्षक कोळी यांनी आपला कार्यभार सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास गौते यांना सोपवून पोलीस ठाण्यातून निघून गेल्याने त्यांचे निलंबन झाल्याचे निश्चित झाले. याबाबत तिरोडा पोलीस ठाणे परिसरात असलेल्या चर्चेनुसार जिल्हा पोलीस अधीक्षक हरिष बैजल यांनी संपूर्ण जिल्ह्यात अवैध धंद्यांना आळा घालण्याच्या हेतूने सर्व पोलीस अधिकारी,कर्मचाऱ्यांना अवैध धंदे बंद करण्याचे निर्देश दिले.
ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात अवैध धंदे सुरू असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याची सूचना त्यांनी आधीच केली आहे. परंतु तिरोडा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात सुरू असलेले अनेक अवैध दारू, जुगार व सट्टयावर कारवाई करण्यात येत होती. तर मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्र ी, जुगार, सट्टा व अवैधधंदे सुरूच असल्याचे दिसून आल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक हरिष बैजल यांनी ठाणेदार संदीप कोळी यांना निलंबित केले. तिरोडा पोलीस ठाण्यातील आणखी काही कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
गोंदिया जिल्ह्यातील अवैध धंद्याला शह देणाऱ्या पोलीस कर्मचारी किंवा अधिकाºयांची गय केली जाणार नाही असा संदेश बैजल यांनी दिला आहे. दरम्यान या कारवाई संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक हरिष बैजल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याला दुजोरा दिला.
नोटीसकडे दुर्लक्ष करणे भोवले
जिल्हा पोलीस अधीक्षक हरिष बैजल यांनी दोन महिन्यांपूर्वीे कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी आठ पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली होती. तेव्हाच तिरोड्याचे ठाणेदार संदीप कोळी यांना त्यांच्या क्षेत्रातील अवैध धंदे पूर्णपणे बंद करण्याची सूचना करुन नोटीस बजावली होती. मात्र यानंतरही तिरोडा तालुक्यात सट्टा व अवैध दारु विक्री सर्रासपणे सुरु होती. त्यामुळे कोळी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.
तिरोडा तालुक्यात चार कारवाया
जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने तिरोडा तालुक्यात मागील दोन दिवसात सट्टा व अवैध दारु विक्री प्रकरणी दोन कारवाया केल्या तर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुध्दा दोन कारवाया केल्या. यामुळेच बैजल यांनी कोळी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.

Web Title: Speculative zodiac; Thanedekar Comat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.