नवेगावचे बहुप्रतीक्षित गार्डन उघडणार

By Admin | Published: May 24, 2015 01:33 AM2015-05-24T01:33:10+5:302015-05-24T01:33:10+5:30

एक कोटीपेक्षा अधिक रक्कम खर्च होऊनही गेल्या पाच वर्षांपासून ‘कुलूपबंद’ असलेल्या नवेगावबांध येथील बहुप्रतिक्षित गार्डनचे कुलूप अखेर उघडण्याचे दिवस आता जवळ येत आहे.

The much-awaited garden of Navegaon will open | नवेगावचे बहुप्रतीक्षित गार्डन उघडणार

नवेगावचे बहुप्रतीक्षित गार्डन उघडणार

googlenewsNext

डागडुजीच्या कामांना वेग : कामे त्वरित पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
गोंदिया : एक कोटीपेक्षा अधिक रक्कम खर्च होऊनही गेल्या पाच वर्षांपासून ‘कुलूपबंद’ असलेल्या नवेगावबांध येथील बहुप्रतिक्षित गार्डनचे कुलूप अखेर उघडण्याचे दिवस आता जवळ येत आहे. कलात्मक मूर्त्या, म्युझिकल फाऊंटेन, स्टेप गार्डन यासह तलावातील पक्षी निरीक्षणासाठी टॉवर अशा विविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेले हे गार्डन लवकरात लवकर पर्यटकांच्या सेवेत दाखल व्हावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत त्याबाबतचे निर्देश जिल्हा पर्यटन समितीला दिले आहे. एवढेच नाही तर स्वत: या गार्डनच्या कामांची पाहणीही केली.
गोंदिया नैसर्गिकदृष्ट्या संपन्न जिल्हा आहे. जिल्ह्याचा ४७ टक्के भाग वनाच्छादित आहे. येथील नैसर्गिक पर्यटनस्थळांना जास्तीत जास्त पर्यटकांनी भेट देण्यासाटी यावे आणि स्थानिकांना मोठ्या प्रमाणात या माध्यमातून रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी पर्यटनस्थळांची अपूर्ण अवस्थेतील विकासकामे त्वरित पूर्ण करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी दिले.
या गार्डनचे काम गेल्या चार वर्षापासून झाल्याचा दावा कंत्राटदाराने केला आहे. तेव्हापासून हे गार्डन कुलूपबंदच आहे. मात्र त्याचे हस्तांतरण जिल्हा पर्यटन समितीकडे झाले नव्हते. त्यामुळे अनेक साहित्यांची तूटफूट झाली आहे.
जिल्हा पर्यटन समितीची बैठक शुक्रवारी नवेगावबांध येथील वनविभागाच्या सभागृहात घेण्यात आली. तत्पूर्वी जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी व पर्यटन समितीच्या सदस्यांनी रॉक गार्डन, स्टेप गार्डन, म्युझिकल फाऊंटन, हॉलीडे होम्स आणि सभागृहाची पाहणी केली. यावेळी डॉ.सूर्यवंशी यांच्यासह जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक संजय ठवरे, अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.
सभेला समितीचे सदस्य जिल्हा नियोजन अधिकारी बकुल घाटे, वनविकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक, एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी गिरीष सरोदे, मानद वन्यजीव रक्षक डॉ.राजेंद्र जैन, सावन बहेकार, जि.प. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पी.डी. लोखंडे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस.आर. शर्मा, महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता के.ए. चव्हाण, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक एच.के. हेडे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे विशेष कार्य अधिकारी तथा जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, गोंदिया पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता एस.एच. बन्सोड यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. (जिल्हा प्रतिनिधी)
पर्यटकांसाठी सर्व सोयी-सुविधा देणार
जिल्हाधिकारी म्हणाले, पर्यटनस्थळी चांगल्या सुविधा उपलब्ध असल्यास पर्यटक मोठ्या संख्येने येतात. पर्यटनस्थळांचा विकास करताना पर्यटकांसाठी निवासाची, भोजनाची व मनोरंजाची चांगली सुविधा उपलब्ध असली पाहिजे. नवेगावबांध या ठिकाणी अशा प्रकारच्या सुविधा पर्यटकांसाठी भविष्यात लवकरच उपलब्ध करुन देण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.
नवेगावबांध तलावाजवळ असलेल्या रॉक गार्डन, स्टेप गार्डन व म्युझिकल फाऊंटेन दुरुस्तीचे कामे संबंधित कत्रांटदारांकडून तातडीने पूर्ण करुन ते हस्तांतरीत करुन घ्यावे. ही कामे लवकर झाल्यास येथे येणाऱ्या पर्यटकांना पर्यटन स्थळांचा आनंद घेता येईल, असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.
पर्यटकांच्या निवासाच्या दृष्टिने नवेगावबांध येथील हॉलीडे होम्स, कापडी निवास तंबू आणि सभागृह पूर्ण क्षमतेने कार्यरत राहील अशी व्यवस्था करावी, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी म्हणाले, जिल्ह्यातील नवेगावबांध व नागझिरा या पर्यटन स्थळांचे मार्केटिंग करण्यासाठी वनविकास महामंडळाने पुढाकार घ्यावा.
नागपूर हे उपराजधानीचे शहर असल्यामुळे येथील अनेक उद्योगसमूहांना, तसेच ट्रॅव्हल्स कंपनीने व महाविद्यालयांना या पर्यटनस्थळांना भेटीचे निमंत्रण द्यावे व उपलब्ध सुविधांची माहिती द्यावी. त्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक जिल्ह्यात येण्यास मदत होईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सूचविले.

Web Title: The much-awaited garden of Navegaon will open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.