पालकमंत्र्यांची बसस्थानकाला ‘फ्लार्इंग व्हिजीट’

By admin | Published: June 13, 2017 12:56 AM2017-06-13T00:56:10+5:302017-06-13T00:56:10+5:30

जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी रविवारी (दि.११) येथील राज्य परिवहन विभागाच्या बसस्थानक व डेपोला आकस्मिक भेट दिली असता,

Guardian Minister's Place 'Flying Whizat' | पालकमंत्र्यांची बसस्थानकाला ‘फ्लार्इंग व्हिजीट’

पालकमंत्र्यांची बसस्थानकाला ‘फ्लार्इंग व्हिजीट’

Next

भेटीत आॅनड्युटी कर्मचारी झोपेत : अधिकारी व कर्मचाऱ्यांची कानउघाडणी
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी रविवारी (दि.११) येथील राज्य परिवहन विभागाच्या बसस्थानक व डेपोला आकस्मिक भेट दिली असता, येथील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. दरम्यान येथील सुरक्षारक्षक आॅन ड्युटी गाढ झोपेत असल्याचे निदर्शनास आले. नामदार बडोले आल्याचे सांगण्यात आल्यावर त्या सुरक्षारक्षकांची झोपच उडाली. तर बसथानकाच्या पाहणीदरम्यान येथे समस्यांचा अंबारच दिसून आल्याने एस.टी.महामंडळाच्या अधिकाऱ्यांची पालकमंत्र्यांनी झाडाझडती घेत त्यांना धारेवर धरले.
लोकवाहिनी म्हणून एस.टी.ची ओळख आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून गोंदिया आगारातून दररोज १० हजार नागरिक प्रवास करतात. मात्र येथील बसस्थानकावर सोई-सुविधांची वाणवा आहे. एवढ्या मोठ्या बसस्थानकात फक्त दोनच कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर सफाईची धुरा असल्याने योग्यरितीने येथे स्वच्छता केली जात नाही. येथे असलेल्या हिरकणी कक्षात सुविधांचा अभाव दिसून आला.
बसस्थानकातील उपहारगृहाचे बांधकाम ३ वर्षापूर्वी झाले. मात्र अद्याप त्याची निविदा काढून कंत्राट कुणालाही देण्यात आले नाही. त्यामुळे प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र दिसून आले.
याबाबत आगारप्रमुखांना विचारणा केली असता, त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर देण्यात आले नाही. तर उपहारगृहाच्या ठिकाणी सुरक्षा कर्मचारी चक्क गाढ झोपेत असल्याचे आढळून आले. एवढेच नाही तर, मराठी भाषा गौरवाचा फलक फाटक्या अवस्थेत पालकमंत्र्याना दिसून आल्याने येथील कर्मचाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. सफाई कर्मचाऱ्यांवर बसस्थानक व परिसराची सफाई करण्याची जबाबदारी असताना ते योग्य पध्दतीने काम करीत नसल्याचे आढळून आले. तर एच.आर.पटले हे आपल्या ड्युटीदरम्यान गाढ झोपेत असल्याचे दिसून आले. त्यात बसस्थानक परिसरात असलेल्या महिला व पुरुष शौचालयांची स्थिती गंभीर आहे. त्यामुळे महिलांची कुचंबना होत आहे.
येथील डेपोमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. प्रवाशांच्या सुविधांसंदर्भात एकही व्यवस्था बसस्थानक परिसरात नसल्याचे पालकमंत्र्यांच्या पाहणीत आढळून आले. दरम्यान पालकमंत्र्यांनी आगारप्रमुखांची कानउघाडणी करीत प्रवाशांच्या सुविधांसाठी व जागेच्या वापराच्या नियमाप्रमाणे व्यावसायिक वापर करण्याचे निर्देश दिले. सोबतच आगाराच्या उत्पन्न वाढीसाठी त्वरीत कारवाई करण्यास सांगितले.
यावेळी पालकमंत्र्यांसोबत उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, भाजप नेते विरेंद्र जायस्वाल, न.प.सदस्य घनश्याम पानतवणे, भरत क्षत्रिय, प्रदीप ठाकूर व इतर उपस्थित होते.

गोंदिया आगारात तब्बल ८० पदे रिक्त
गोंदिया आगारात गेल्या अनेक वर्षापासून तब्बल ८० पदे रिक्त असून त्यात चालक २३, वाहक ३२, यांत्रिक १७, लिपीक ५, वाहतुक निरीक्षक २, शिपाई १ यांचा समावेश आहे. पदे रिक्त असल्यामुळे दुसऱ्यांच्या कामांचा ओझा येथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर पडत आहे. त्यामुळे येथील कर्मचारी प्रचंड तणावाखाली काम करीत असल्याचे चित्र आहे.

परिवहनमंत्र्यांशी चर्चा करुन समस्या सोडवू
गोंदिया एस.टी.बसस्थानक व डेपोला आकस्मिक भेट दिली असता, अनेक समस्यांचा अंबार दिसून आला. स्वच्छतेसोबत प्रवाशांना कोणत्याही प्रकारच्या सोईसुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या नाही. भंडारा जिल्ह्यातून गोंदिया जिल्हा वेगळा होऊन १८ वर्षाचा कालखंड होऊनसुध्दा भंडारातून जिल्हा वाहतूक नियंत्रण कक्ष वेगळे करण्यात आले नाही. सोबतच येथील आगारात ८० पदे रिक्त आहेत. या सर्व समस्यांबाबत आपण राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी चर्चा करून रिक्त पदे व येथे असलेल्या समस्या नक्की सोडवू.
-राजकुमार बडोले,
पालकमंत्री गोंदिया जिल्हा

Web Title: Guardian Minister's Place 'Flying Whizat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.