In South Goa, a total of 29.18 lakhs of narcotics seized during the year | दक्षिण गोव्यात वर्षभरात 29.18 लाखांचे अंमली पदार्थ जप्त

मडगाव : आतापर्यंत उत्तर गोव्यापुरते मर्यादित असलेले अंमली पदार्थाचे लोण आता दक्षिण गोव्यातही पोहोचले आहे हे 2017 च्या आकडेवारीने सिद्ध केले आहे. 2017मध्ये दक्षिण गोव्यात अंमलीपदार्थ विषयक 60 प्रकरणांची नोंद झाली असून, एकूण 29 लाखांचा माल पोलिसांनी पकडला आहे. यातील नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे 2016 साली दक्षिण गोव्यात अंमली पदार्थाचे केवळ 13 गुन्हे नोंद झाले होते.

मागच्या वर्षी दक्षिण गोव्यात सर्वात अधिक गुन्हे गांजा विषयक असून, मागच्या वर्षी दक्षिण गोवा पोलिसांनी 23.50 किलो गांजा पकडला होता, त्याची किंमत एकूण 23,48,000 अशी असून त्यापाठोपाठ 1.44 लाखांचा हशिष (144 ग्रॅम), 1.36 लाखांचे एलएसडी (0.323 ग्रॅम), 1.30 लाखांचा चरस (627.30 ग्रॅम), एक लाखाचा अ‍ॅक्सटसी (05.52 ग्रॅम), तर 60 हजारांचा कोकेन (10.49 ग्रॅम) पकडला असून, एकंदर पकडलेल्या अंमली पदार्थाची किंमत 29.18 लाख एवढी आहे.

दक्षिण गोव्यातून अंमली पदार्थ हद्दपार करण्यासाठी पोलिसांना सतर्क करण्यात आले असून, लवकरात लवकर त्यावर उपाययोजना हाती घेण्याचे आदेश दक्षिण गोव्याचे अधीक्षक अरविंद गावस यांनी दिली आहे. अंमली पदार्थाचे जाळे मोडून टाकण्यासाठी पोलिसांना खब-यांचे जाळे वाढविण्याच्या सूचना केल्या आहेत. जर कुठेही अंमली पदार्थ विकत असल्याची माहिती असल्याचे तेथे ताबडतोब कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले. अमली पदार्थ विरोधी प्रतिबंधात्मक कायद्यांर्तगत मागच्या वर्षी पोलिसांनी एकूण 59 जणांना अटक केली. यातील सर्वात जास्त प्रकरणो मडगाव पोलीस ठाण्यात नोंद झालेली आहेत. या ठाण्यात एकूण 16 प्रकरणे नोंद झाली आहे.2016 साली अंमली पदार्थ प्रकरणी दक्षिण गोव्यात 13 जणांना अटक झाली होती.


चौकट
2017 साली पकडलेला अंमलीपदार्थ
गांजा 23.05 किलो. (रु. 23.48 लाख)
चरस 627.30 ग्रॅम (रु. 1.30 लाख)
कोकेन 10.49 ग्रॅम (रु. 60 हजार)
हशिश 144 ग्रॅम (रु. 1.44 लाख)
एलएसडी 0.323 ग्रॅम (रु. 1.36 लाख
एक्सटसी 05.52 ग्रॅम (रु. 1 लाख)