चोरट्यांच्या निशाण्यावर विद्यालये; तीन दिवसात दोन विद्यालयात केले हात साफ

By पंकज शेट्ये | Published: March 7, 2024 05:06 PM2024-03-07T17:06:02+5:302024-03-07T17:06:51+5:30

गेल्या तीन दिवसात मुरगाव तालुक्यातील दुसऱ्या विद्यालयात अज्ञात चोरट्यांनी घुसून रोख रक्कमीसहीत सी सी टीव्ही कॅमेराचा डीव्हीआर लंपास केला.

schools targeted by thieves two schools were robbed in three days in goa | चोरट्यांच्या निशाण्यावर विद्यालये; तीन दिवसात दोन विद्यालयात केले हात साफ

चोरट्यांच्या निशाण्यावर विद्यालये; तीन दिवसात दोन विद्यालयात केले हात साफ

पंकज शेट्ये,वास्को: गेल्या तीन दिवसात मुरगाव तालुक्यातील दुसऱ्या विद्यालयात अज्ञात चोरट्यांनी घुसून रोख रक्कमीसहीत सी सी टीव्ही कॅमेराचा डीव्हीआर लंपास केल्याचा प्रकार गुरूवारी (दि.७) सकाळी उघडकीस आला. वेळसांव येथील इन्फन्ट जीझस अकादमी विद्यालयाच्या मुख्य गॅटचे टाळे फोडून अज्ञात चोरट्यांनी विद्यालयात प्रवेश करून ६५ हजाराची मालमत्ता लंपास केली.

वेर्णा पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार गुरूवारी सकाळी ७.३० वाजता चोरीचा प्रकार उघडकीस आला. सकाळी इन्फन्ट जीझस अकादमी विद्यालय उघडण्यासाठी शाळेचा कर्मचारी पावला असता त्याला प्रमुख गॅटचे टाळे अज्ञातांनी फोडल्याचे आढळून आले. त्यानंतर तो आत गेला असता विद्यालय कार्यालयाच्या दरवाजाची दोन टाळे अज्ञातांनी फोडून दरवाजा उघडल्याचे त्याला आढळून आले. विद्यालयात अज्ञात चोरट्यांनी घसून चोरी केल्याचे त्याच्या लक्षात येताच त्यांनी मुख्याध्यापक सेबेस्तांव ब्रागांझा यांना घटनेची माहीती दिली. 

विद्यालयात चोरी झाल्याचे समजल्यानंतर मुख्याध्यापक ब्रागांझा यांनी पोलीसांना माहीती दिली. पोलीसांनी तपासणीला सुरवात केली असता चोरट्यांनी विद्यालयाच्या कार्यालयात घुसून कार्यालयातील सर्व सामान अस्थाव्यस्त टाकल्याचे आढळून आले. तसेच कार्यालयात ठेवलेले विद्यालयाची ३५ हजाराची रोख रक्कम आणि सीसी टीव्ही कॅमेराचा एक डीव्हीआर चोरट्यांनी लंपास केल्याचे आढळून आले. वेर्णा पोलीस त्या चोरी प्रकरणात अधिक तपास करीत आहेत.

तीन दिवसापूर्वीच मुरगाव तालुक्यातील मांगोरहील, वास्को भागातील सेंट तेरेसा विद्यालयात अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. ४ मार्चला चोरट्यांनी सेंट तेरेसा विद्यालयात घुसून १ लाखाची रोख रक्कम आणि ३० हजार कींमतीचे ४ सीसी टीव्ही कॅमेराचे डीव्हीआर लंपास केल्याचे आढळून आले होते. तीन दिवसात अज्ञात चोरट्यांनी मुरगाव तालुक्यातील दुसऱ्या विद्यालयात हात साफ केल्याने विद्यालयांच्या सुरक्षेबाबत अनेकांना चिंता निर्माण झाली आहे.

विद्यालयाच्या सुरक्षेसाठी शिक्षण विभागाने सुरक्षा रक्षक द्यावा: मुख्याध्यापक सेबेस्तांव ब्रागांझा यांची मागणी -  गेल्या काही महिन्यांत गोव्यातील विविध विद्यालयात चोरीच्या घटना घडलेल्या आहेत. भविष्यात गोव्यातील विद्यालयांच्या सुरक्षेसाठी गोवा शिक्षण विभागाने प्रत्येक विद्यालयात सुरक्षा रक्षक नियुक्त करावा अशी मागणी इन्फन्ट जीझस अकादमी विद्यालयाचे मुख्याध्यापक सेबेस्तांव ब्रागांझा यांनी केली. आज आमच्या विद्यालयात चोरी झाली असून तीन दिवसापूर्वी वास्कोतील सेंट तेरेसा विद्यालयात चोरी झाली होती. जानेवारी महीन्यात आमच्या शेजाऱ्यालाच असलेल्या सेंट थोमस विद्यालयात चोरी झाली होती अशी माहीती सेबेस्तांव ब्रागांझा यांनी दिली. त्यापूर्वी काही महीन्यापूर्वी वेळ्ळी आणि धारबांदोडा येथील विद्यालयात सुद्धा चोरी झाल्याचे त्यांनी सांगितले. वेगवेगळ्या विद्यालयात झालेल्या चोरी प्रकरणात अज्ञात चोरट्यांनी इतर मालमत्तेसहीत सीसी टीव्ही कॅमेराचा डीव्हीआर लंपास केल्याचे आढळून आले आहे. चोरटे आपली ओळख पटूनये म्हणून डीव्हीआर लंपास करत असावे असा संशय मुख्याध्यापक सेबेस्तांव ब्रगांझा यांनी व्यक्त केला.

Web Title: schools targeted by thieves two schools were robbed in three days in goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.