गोव्यात कार्निव्हलची तयारी सुरू, समिती स्थापन करायला सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2017 12:01 PM2017-12-26T12:01:42+5:302017-12-26T12:11:49+5:30

नववर्ष साजरे झाले की, लगेच फेब्रुवारी महिन्यात गोव्यात कार्निव्हल हा मोठा उत्सव पार पडतो. विदेशी पर्यटकांसाठी कार्निव्हल म्हणजे पर्वणीच असते.

Prepare for Carnival in Goa, committees begin | गोव्यात कार्निव्हलची तयारी सुरू, समिती स्थापन करायला सुरूवात

गोव्यात कार्निव्हलची तयारी सुरू, समिती स्थापन करायला सुरूवात

Next

पणजी- नववर्ष साजरे झाले की, लगेच फेब्रुवारी महिन्यात गोव्यात कार्निव्हल हा मोठा उत्सव पार पडतो. विदेशी पर्यटकांसाठी कार्निव्हल म्हणजे पर्वणीच असते. पर्यटन खाते व गोव्यातील विविध नगरपालिकांच्या स्तरावरून गोव्यात कार्निव्हलची तयारी सुरू झाली असून कार्निव्हलचे आयोजन विविध शहरांमध्ये व्यवस्थितरित्या पार पडावे म्हणून समित्या स्थापन करण्यास सुरूवात झाली आहे.

गोव्यात पोर्तुगीजांची राजवट होती, त्यावेळपासून कार्निव्हल हा उत्सव गोव्यात आयोजित करण्यास आरंभ झाला. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात हा उत्सव पार पडतो व त्यात हजारो विदेशी पर्यटकही भाग घेतात. पणजी, वास्को, फोंडा, म्हापसा, मडगाव अशा काही शहरांमध्ये कार्निव्हल उत्सव पार पडतो. कार्निव्हलनिमित्त चित्ररथ मिरवणुका पार पडतात. कार्निव्हल हा फक्त ख्रिस्ती धर्मियांचा उत्सव अशा प्रकारे प्रारंभी या उत्सवाकडे पाहिले जात होते. हळूहळू तो समज पातळ झाला पण अजुनही कट्टर हिंदूधर्मियांकडून कार्निव्हल हा आपला उत्सव नव्हे असे मानले जात आहे.

पेडणो ह्या हिंदूबहुल तालुक्यामध्ये यावेळी प्रथमच कार्निव्हल आयोजित करावा असा विचार सरकारने केला. तथापि, हिंदू जनजागृती समितीने नुकतीच पेडणो येथे सभा घेतली व पेडणो येथे कार्निव्हल आयोजित करण्याचा सरकारचा डाव हाणून पाडा, असे आवाहन केले आहे. गोवा मुक्त झाल्यानंतर कार्निव्हलला काही घटकांनी विरोध केला होता. कारण त्यावेळी कार्निव्हलच्या चित्ररथ मिरवणुकांमध्ये अश्लिलता असायची. कार्निव्हलचा व आपला काहीच संबंध नाही, असे गोव्यातील चर्चसंस्थेने एकदा जाहीर करून बरेच गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला होता. नंतरच्या काळात कार्निव्हलमधील अश्लीलता थांबली. आता चांगल्या प्रकारे चित्ररथ मिरवणूक पार पडते.
गोव्याच्या काही भागांत लॅटीन संस्कृतीची छाप दिसून येते व त्याचे प्रतिबिंब काही प्रमाणात कार्निव्हल मिरवणुकीमध्ये पहायला मिळते. हजारो गोमंतकीय व पर्यटक कार्निव्हलची मिरवणूक पाहण्याचा आनंद दरवर्षी लुटतात. कार्निव्हलमध्ये एक किंग मोमो असतो. खा, प्या आणि मजा करा असा संदेश देत गोव्यात किंग मोमोची राजवट सुरू झाली असे कार्निव्हल उत्सव काळात गोव्यात मानले जाते. गोव्याचे माजी मुख्यमंत्री फ्रान्सिस सार्दिन यांनीही एकदा स्वत: किंग मोमोची भूमिका पार पाडली होती. पर्यटन खाते कार्निव्हलवेळी हजारो रुपयांची बक्षिसे पुरस्कृत करत असते.

पर्यटन खाते व पालिका यांच्या सहयोजाने कार्निव्हलच्या मिरवणुका आयोजित केल्या जातात. यावेळी विविध पालिकांनी बैठका घेण्यास आरंभ केला आहे. वास्कोमध्ये बैठक झाली व कार्निव्हल आयोजन समितीच्या अध्यक्षपदी कालरुस आल्मेदा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अन्य शहरांमध्येही आता अशाच प्रकारे समित्या निवडल्या जाणार आहेत.

Web Title: Prepare for Carnival in Goa, committees begin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.