Police action on the cultivation of hemp in the confined area like Kalangut | कळंगुटसारख्या गजबजलेल्या परिसरात गांजाच्या शेतीवर पोलिसांची कारवाई

म्हापसा : कळंगुटसारख्या गजबजलेल्या तसेच लोकांची सततची वर्दळ सुरू असलेल्या सुप्रसिद्ध अशा किनारी भागात एका बंगल्याच्या आड गांजा शेतीच्या लागवडीवर कारवाई करून अंदाजीत १० लाख रुपये किमतीचा गांजा ताब्यात घेतला आहे. तसेच गांजाची केलेली शेती सुद्धा नष्ट केली आहे. गजबजलेल्या परिसरात गांजाच्या लागवडीवर केलेली ही या भागातील मागील काही वर्षापासूनची पहिल्याच कारवाई आहे.

कळंगुटजवळ असलेल्या कांदोळी पंचायत क्षेत्रातील आराडी या भागात कळंगुट पोलिसांनी सदर कारवाई केली. निरीक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार कांदोळी येथील आराडी भागात एका बंगल्याच्या आवारात बेकायदेशीरपणे गांजाच्या शेतीची लागवड सुरू असल्याची माहिती त्यांना प्राप्त झाली. माहिती मिळताच पुढील कारवाई करण्यासाठी पोलिसांची पथके तयार करण्यात आली.
तयार केलेल्या पथकाने घटनास्थळाची जाऊन पाहणी केली असता तयार करण्यात आलेल्या या गांजाच्या शेतीची देखभाल करणा-या तसेच त्यात काम करणारे दोन कामगार त्यांना आढळून आले. सुसांता साहू (२६) तसेच प्रवश समाल (२०) या कामगारांना नंतर चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. चौकशी अंती त्यांनी गांजाची शेतीची लागवड करीत असल्याचे मान्य केले. लागलीच त्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.

लागवड सुरू असलेल्या शेतीतील गांजाची झाडे पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांचे लहान लहान तुकडे करून ती नष्ट करण्यात आल्याची माहिती दळवी यांनी दिली. सदर शेतीचा परिसर प्लायवूडने पूर्णपणे झाकून टाकण्यात आला होता. त्यामुळे बाहेरून उघड्या डोळ्यांनी आत काय चालू हे कळणे मुश्कील होते, असेही निरीक्षक म्हणाले. मंगळवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. कारवाईनंतर बंगल्याची झडती घेतली असता त्यातील एका भागात हुक्के पोलिसांना सापडले. त्यावरून लागवड केलेल्या गांजाचा वापरही त्यात परिसरात करण्यात येत असल्याची शक्यता निरीक्षकांनी नाकारली नाही. चौकशी अंती सर्व स्पष्ट होणार असल्याचे ते म्हणाले.

सदर परिसर लॅनी फियेलो यांच्या मालकीचा असून त्यांनीच या शेतीची लागवड केली असल्याची माहिती अटक करण्यात आलेल्या त्या दोन्ही कामगारांनी चौकशी दरम्यान पोलिसांना दिली. अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत फियेलो विरोधात पोलिसांनी तक्रार नोंद केली आहे. त्याला अजूनपर्यंत अटक करण्यात आलेली नाही. नष्ट करण्यात आलेल्या गांजा सुमारे १० किलो वजनाचा असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत सुमारे १० लाख रुपयांची होत असल्याचे दळवी म्हणाले.

अधीक्षक चंदन चौधरी यांच्या देखरेखीखाली तसेच उपअधीक्षक नेल्सन अल्बुकेर्क व निरीक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सीताराम मळीक पुढील तपास करीत आहे. कारवाईत त्यांच्यासोबत हवालदार योगेश बोर्डेकर, गणपत तिळोजी तसेच ब्रह्मानंद पोळजी यांनी भाग घेतला.