गोमंतकीयांना लागले येशू ख्रिस्ताच्या आगमनाचे वेध

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2017 05:32 PM2017-12-05T17:32:33+5:302017-12-05T18:38:55+5:30

म्हापसा : जुने गोव्यातील गोंयच्या सायबाच्या फेस्तानंतर आता ख्रिस्ती बांधवाना नाताळ सणाचे वेध लागले आहेत. अवघ्या दिवसांवर येऊन ठेपलेल्या नाताळ सणाची, येशू ख्रिस्ताच्या आगमनाची, एकात्मतेचा, सद्भावनेचा संदेश घेऊन येणा-या व संदेशासोबत आनंद साजरा करण्यासाठी गोड पदार्थांचे वाटप करणा-या सांताक्लॉजची प्रतrक्षा ख्रिस्ती बांधवांना लागून राहिली आहे.

Gomantakyas started looking at the arrival of Jesus Christ | गोमंतकीयांना लागले येशू ख्रिस्ताच्या आगमनाचे वेध

गोमंतकीयांना लागले येशू ख्रिस्ताच्या आगमनाचे वेध

googlenewsNext

- प्रसाद म्हांबरे
म्हापसा : जुने गोव्यातील गोंयच्या सायबाच्या फेस्तानंतर आता ख्रिस्ती बांधवाना नाताळ सणाचे वेध लागले आहेत. अवघ्या दिवसांवर येऊन ठेपलेल्या नाताळ सणाची, येशू ख्रिस्ताच्या आगमनाची, एकात्मतेचा, सद्भावनेचा संदेश घेऊन येणा-या व संदेशासोबत आनंद साजरा करण्यासाठी गोड पदार्थांचे वाटप करणा-या सांताक्लॉजची प्रतrक्षा ख्रिस्ती बांधवांना लागून राहिली आहे. कॅरल संगीताच्या धुनी सर्वत्र वाजू लागल्या आहेत. त्यातून नाताळ सणाची, सणाच्या वातावरणाची हळूहळू निर्मिती होऊ लागली आहे.

डिसेंबर महिना म्हटले की ख्रिस्ती बांधवांच्या सणाचा महिना मानला जातो. वर्षभर लोक या सणाची प्रतीक्षा मोठ्या आतुरतेने करीत असतात. त्यांच्या उत्साहावर उधाण आणणा-या डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला जुने गोंयच्या सायबाचे फेस्त साजरे केल्यानंतर लोकांना नाताळाचे वेध लागू लागतात. फेस्त संपले की नाताळाच्या तयारीला जोर येऊ लागतो. प्रत्येक जण आपआपल्या परीने तयारीला सुरुवात करु लागतो. यात घरातील रंगरंगोटीच्या कामापासून परिसरातील स्वच्छतेवर जोर येऊ लागतो. घरात नाताळानिमित्त बनवण्यात येणा-या विविध पदार्थांची तयारी सुद्धा सुरू केली जाते. बाजारपेठा सुद्धा नाताळाच्या सामानाने सजू लागल्या आहेत. सजावटीला लागणारे सामान दाखल व्हायला सुरुवात झाली आहे.

नाताळ सणाच्या दिवशी येशू ख्रिस्ताचा जन्म गोठ्यात झाल्याने गोठे बनवणे हे या सणाचे प्रमुख आकर्षण मानले जाते. त्यासाठी गोठ्याचे देखावे तयार करण्याची तयारी सुद्धा आतापासून सुरू झाली आहे. ब-याच ठिकाणी लहान आकारापासून ते मोठ्या आकाराचे गोठे तयार केले जातात. ही तयारी रात्री जागवून सुद्धा केली जाते. गोठा तयार केलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणावर सजावट केली जाते. गोठ्यातील मंद प्रकाशामुळे परिसर उजळून निघतो. विविध ठिकाणी गोठ्यांच्या सजावटीच्या स्पर्धा सुद्धा भरवल्या जातात. त्यामुळे आपला गोठा सर्वात जास्त कशा प्रकारे आकर्षित होईल यावर भर दिला जातो. फादर डॉ. वॉल्टर डिसा यांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्व तयारी किमान चार आठवडे अगोदर सुरू होत असते.

बहुतांशी वेळेला परिसरात असलेल्या चर्चेसमध्ये तयार केलेला गोठा सर्वात सुंदर आकर्षित असा बनवला जातो. बहुतेक गोठे चर्चेसच्या आवारात बनवले जातात. गावातील प्रत्येक जण चर्चमध्ये जाऊन आपल्या परीने गोठे बनवण्यासाठी सहकार्य करीत असतात. गोठे तयार करण्याची पूर्वतयारी किमान २० दिवस अगोदरपासून सुरू होत असते. त्यासाठी व्यवस्थित नियोजन करून नंतर ते बनवले जातात. गोठ्या बरोबर विविध आकर्षक आकाराचे तयार केलेली नक्षत्रे (स्टार्स) तयार करण्याचे कामही सुरू झाले आहे. काही जण रेडिमेडसुद्धा आणून लावतात.

पूर्व तयारीचा एक भाग म्हणून अनेक चर्चेसमध्ये प्रार्थनांचे आयोजन केले जात असल्याचे फादर डॉ. वॉल्टर डिसा म्हणाले. काही लोक घरातच प्रार्थना करण्यावर भर देतात. बरेच लोक या काळात अनाथालयात जाऊन दानधर्म करण्यावर भर देत असतात. काही ठिकाणी धार्मिक स्थळांना भेटी देण्याच्या कार्यक्रमांचे आयोजनसुद्धा केले जाते. हा धार्मिक सोहळा एकंदरीत सर्वांना आनंद देणारा असतो, असेही त्यांनी सांगितले.

गोव्यातील बहुतेक ख्रिस्ती बांधव विदेशात स्थायिक झालेले अनिवासीय गोवेकर तसेच विदेशात नोकरी निमित्त वास्तव्य करून असलेले गोवेकर नाताळनिमित्त सुट्ट्या घेऊन गोव्यात सण साजरा करण्यासाठी कुटुंबासहित नित्यनेमाने येत असतात. नाताळनंतर नवीन वर्ष साजरे होईपर्यंत थांबून पुन्हा माघारी विदेशात निघून जातात. बहुतेकांची सुट्टी अल्प दिवसांची असते. या सुट्टीतील आनंद ते पुरेपूरपणे लुटत असतात. सुट्टीतल्या काळाचे नियोजनही येण्यापूर्वीच केले जाते.

नाताळनिमित्त घरात लागणारे विविध पदार्थ मागील काही वर्षांपासून विकत आणण्याची प्रथा राज्यात रुजू झाली असली तरी ब-याच लोकांच्या घरी आजही पारंपरिक पद्धतीने पदार्थ बनवण्याची प्रथा कायम आहे. नाताळ सणाच्या संस्कृतीचे प्रतीक मानले जाणारे पदार्थ धोधोल, बिबिंका, कल-कल, डोस तसेच नेव-या (करंज्या) सारखे गोड पदार्थ नाताळ सणातील पारंपरिक पदार्थ मानले जातात. सणासाठी हे पदार्थ वैशिष्ट मानले जातात. यातील बहुतांश पदार्थ नारळाचा तसेच नारळापासून बनवलेल्या गुळाचा व साखरेचा वापर करून बनवले जातात. नाताळ सणातील संस्कृती जपण्यासाठी आम्ही आजही हे पदार्थ पारंपरिक पद्धतीने बनवतो, अशी प्रतिक्रिया बरेच ख्रिस्ती बांधव देतात. फादर डॉ. वॉल्टर डिसा यांनी व्यक्त केलेल्या मतानुसार निसर्गाच्या सानिध्यात जन्मला येणा-या येशू ख्रिस्ताच्या जन्माचा हा सोहळा समाजातील सर्वांना सुखदायी तसेच आनंददायी ठरत असतो.

Web Title: Gomantakyas started looking at the arrival of Jesus Christ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.