सक्षम नेतृत्वाविषयी भाजपामध्ये चिंतेची स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 12:27 PM2018-09-12T12:27:11+5:302018-09-12T12:27:14+5:30

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे येत्या लोकसभा निवडणुकीवेळी प्रचारासाठी पूर्वीप्रमाणे गोवाभर फिरू शकणार नाहीत. मुख्यमंत्र्यांचा आजार वारंवार डोके वर काढत आहे व त्यामुळे त्यांच्या काम करण्याच्या क्षमतेवर व पद्धतीवर खूप मर्यादा आल्या आहेत.

Goa : The situation of concern in the BJP about capable leadership | सक्षम नेतृत्वाविषयी भाजपामध्ये चिंतेची स्थिती

सक्षम नेतृत्वाविषयी भाजपामध्ये चिंतेची स्थिती

Next

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे येत्या लोकसभा निवडणुकीवेळी प्रचारासाठी पूर्वीप्रमाणे गोवाभर फिरू शकणार नाहीत. मुख्यमंत्र्यांचा आजार वारंवार डोके वर काढत आहे व त्यामुळे त्यांच्या काम करण्याच्या क्षमतेवर व पद्धतीवर खूप मर्यादा आल्या आहेत. त्यांना वारंवार विश्रांतीची गरज असते. या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये पर्रीकर यांच्या तोडीचा दुसरा नेता नसल्याने पक्षात चिंतेची स्थिती आहे. हळूहळू दिल्लीतील भाजपा नेत्यांकडे गोव्यातील स्थिती पोहचू लागली आहे.

गोव्यातील भाजपामध्ये गेली 24 वर्षे पर्रीकर यांची सत्ता आहे. पर्रीकर जे सांगतील तेच मान्य करायचे अशी भूमिका गेली 24 वर्षे गोवा भाजपा घेत आला आहे. मात्र आता पर्रीकर थकलेले असल्याने व त्यांच्या आरोग्याविषयीच्या तक्रारी वाढू लागल्याने भाजपामध्ये नेतृत्वाविषयी पर्यायी सूर व्यक्त होत आहे. भाजपाची कोअर टीम ही पूर्णपणे पर्रीकर यांच्या विश्वासातील असली तरी, देखील कोअर टीममध्ये दोन गट पडलेले आहेत. एक गट पक्षाला वाचविण्यासाठी आता दुसरे सक्षम नेतृत्व तयार करावे लागेल असा आग्रह धरत आहे.

भाजपाचे बहुतेक आमदारही याच मताचे बनू लागले आहेत. पर्रीकर यांच्या नेतृत्वावरच गेली वीस वर्षे तरी भाजपाने पूर्ण मदार ठेवली. पर्रीकर यांनी निश्चितच आतापर्यंत मोठे योगदान देत पक्षाला सत्तेवर नेले. श्रीपाद नाईक यांनीही पक्षासाठी 90 च्या दशकात मोठे योगदान दिले. मात्र नंतर पर्रीकर यांची पक्षावर पूर्ण पकड राहिली. आता पर्रीकर यांच्या लोकसंपर्कावर पूर्ण मर्यादा आल्याने व गोवा सरकारविषयी लोकभावना कडवट बनल्याने भाजपामध्ये चिंता व्यक्त होत आहे. आपले आणखी दोन मंत्री आजारी आहेत व ते इस्पितळातच आहेत आणि दुसरे मंत्री, आमदार हे एकदम तरूण आहेत, त्यामुळे पर्रीकर यांच्या तोडीचा दुसरा नेता आणावा कोठून चिंताजनक प्रश्न भाजपाच्या अनेक पदाधिका-यांना पडला आहे.

लोकसभा निवडणुकीवेळी पर्रीकर जर पूर्णपणे प्रचार कामात उतरू शकले नाही तर भाजपाच्या प्रचार कामाला जास्त वेग येऊ शकणार नाही अशा प्रकारची चर्चा सुरू आहे. पर्रीकर हे स्वत:च्या आजाराविषयी किंवा अन्य बाबतीत पक्षाला कोणतीच कल्पना देत नसल्यानेही पक्षाची चिंता वाढत आहे. भाजपाचे दिल्लीतील काही नेते गोव्यात सद्यस्थिती काय आहे व लोक सरकारविषयी काय बोलतात आणि गोव्यातील भाजपामध्ये दुसरा कोण योग्य असा नेता आहे याची माहिती वारंवार अलिकडे गोव्यातील भाजपाकडे विचारू लागले आहेत. पर्रीकर यांना पक्षाचे दिल्लीतील नेते दुखवू पाहत नाहीत पण पक्षाच्या गोव्यातील भवितव्याविषयी विचारमंथन दिल्लीतही सुरू झालेले आहे. काँग्रेसमधून जे भाजपामध्ये आले त्यांच्याकडे नेतृत्व सोपविण्यास पक्ष तयार नाही. पर्रीकर यांच्या नेतृत्वासमोर पक्षाने दुसरे नेतृत्व कधी तयारच केले नाही व यामुळे आता पोकळी निर्माण होत आहे अशी चर्चा भाजपाच्या गोटात सुरू आहे.

Web Title: Goa : The situation of concern in the BJP about capable leadership

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.