goa congress started jan aakrosh agitation against bjp government | काँग्रेसच्या जन आक्रोश आंदोलनाला पेडण्यातून सुरुवात
काँग्रेसच्या जन आक्रोश आंदोलनाला पेडण्यातून सुरुवात

म्हापसा : राज्यात सरकार आहे की नाही, याची गोवेकरांना माहितीच नाही. लोकशाहीचा खून करू पाहणाऱ्या भाजपा सरकारला आता गोमंतकीयांनी कायमचेच घरी बसवण्याची गरज आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे गोवा प्रभारी डॉ. चेल्लाकुमार यांनी काँग्रेसच्या जन आक्रोश आंदोलनातून पेडणे येथे केले.

खाण घोटाळा गेला कुठे, काळा पैसा देशात आला का, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये आले का, असे प्रश्न चेल्लाकुमार यांनी उपस्थित केले. भाजपाने खोटारडेपणाचा कळस गाठला असून जनतेचा उद्रेक वाढण्यापूर्वी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी राजीनामा द्यावा अन्यथा आजारी सरकार राज्यपालांनी बरखास्त करावे, असे ते म्हणाले. गोवा प्रदेश कॉँग्रेस व पेडणे गट कॉँग्रेस समिती आयोजित जन आक्रोश आंदोलन पेडणेतील टॅक्सी स्टॅन्डवर आयोजित करण्यात आले. त्यावेळी डॉ. चेल्लाकुमार बोलत होते. आंदोलनाला गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर, माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप, माजी शिक्षण मंत्री संगीता परब, उत्तर गोवा अध्यक्ष विजय भिके, उपाध्यक्ष बाबी बागकर, सचिव सुभाष केरकर, पेडणे गट कॉँग्रेस अध्यक्ष उमेश तळवणेकर, दिव्या शेटकर, उत्तर गोवा महिला अध्यक्ष वैशाली शेटगावकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. 

गोवा कॉँग्रेस प्रभारी डॉ. चेल्लाकुमार यांनी यावेळी बोलताना २०१२ च्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाने खोटी आश्वासने देऊन मागच्या दाराने सत्ता मिळवली. राज्याला खास दर्जा देण्याच्या खोट्या आश्वासनाला हरताळ फासले. गोवेकरांना फसवण्याचा हातखंडा मुख्यमंत्री पर्रीकर यांच्याकडे आहे असा दावा करून गोवेकरांना फसवण्यासाठी रथयात्रा, परिवर्तन यात्रा काढली आणि सत्ता मिळवली. सत्ता मिळताच जनहित विसरले. १०० दिवसात काळा पैसा आणण्याची घोषणा करणाऱ्या भाजपाने गोवेकरांना फसवल्याचा दावा चेल्लाकुमार यांनी केला. खनिज व्यवसाय बंद केला. बेरोजगाराना रोजगार नाही. दिलेली १० टक्के आश्वासने भाजपाने पूर्ण केली नाही. लुटारू भाजपाला घरचा रस्ता दाखवा असे आवाहन चेल्लाकुमार यांनी केले. 

पेडणे तालुक्यातून कोणतीही मोहीम किंवा आंदोलन केले तर ते यशस्वी होते आणि सतत पेडणेतील जनता प्रत्येकवेळी वेगळा इतिहास गोवेकरासमोर ठेवत असते, म्हणूनच जन आक्रोश आंदोलनाची सुरुवात पेडणे तालुक्यातून केल्याची जवळ जवळ सर्व वक्त्यांनी आपल्या भाषणात केले. यावेळी सरकार चालवणाऱ्या व्यक्तीचा चेहरा समोर येण्याची तसेच सरकार चालवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची बनावट सही वापरण्यात येत असल्याचा आरोप गिरीष चोडणकर यांनी केला. यावेळी सभेत गोमंतकीय गरीब जनतेला संकटात टाकणाऱ्या सरकार विरोधात हे जन आक्रोश असून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अन्यथा सरकार बरखास्त करावे अशी मागणी करणारा ठराव यावेळी सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
 


Web Title: goa congress started jan aakrosh agitation against bjp government
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.