माझा कुणी त्यात नाही ना?

By admin | Published: May 20, 2017 02:31 AM2017-05-20T02:31:13+5:302017-05-20T02:32:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्कसावर्डे : वार - गुरुवार, वेळ - सायंकाळचे सात वाजलेले... सावर्डेत जुवारी नदीवरील जुना पदपूल लोकांसह कोसळला, अशी बातमी अवघ्या

Does anyone have any in it? | माझा कुणी त्यात नाही ना?

माझा कुणी त्यात नाही ना?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सावर्डे : वार - गुरुवार, वेळ - सायंकाळचे सात वाजलेले... सावर्डेत जुवारी नदीवरील जुना पदपूल लोकांसह कोसळला, अशी बातमी अवघ्या काही मिनिटांतच संपूर्ण कुडचडे-सावर्डे परिसरात पसरली आणि लोकांच्या रांगा पुलाकडे सुरू झाल्या. त्या वेळी प्रत्येकाच्या मनात एक धाकधूक होतीच. या दुर्घटनेत आपला आप्त कुणी सापडला तर नसेल ना?
वास्तविक घटनासाखळी सुरू झाली ती सायंकाळी सहाच्या सुमाराला. कुडचडे येथे सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या बसय्या वडाल या २६ वर्षीय युवकाने जुवारी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती कुडचडे पोलिसांना मिळाल्यानंतर अवघ्या २0 मिनिटांत अग्निशमन दलाचे जवान शोधकार्यासाठी घटनास्थळी पोहोचले आणि नेमके हे शोधकार्यच या दुर्घटनेला आमंत्रण देणारे ठरले. हे चालू असलेले शोधकार्य चांगल्याप्रकारे पाहायला मिळावे यासाठी ४0 ते ५0 लोक सावर्डेच्या या कमकुवत पुलावर जमा झाले. त्यापैकी काही जणांनी तर कठड्यावर ठाण मांडलेले. याचा परिणाम म्हणजे अवघ्या १५ मिनिटांत पावणेसातच्या सुमारास लोकांचे वजन पेलू न शकणारा हा पूल कोसळला आणि जुवारीच्या या काठावर एकच हलकल्लोळ माजला.
ही घटना पाहणारे आत्मानंद सावर्डेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले, ‘एवढ्या मोठ्या प्रमाणावर जमलेल्या गर्दीचा ताण हा पूल पेलू शकणार नाही, याची जाणीव मला झाल्याने मी पुलाखालून वरील लोकांना ओरडून पूल खाली करा असे सांगितलेही; पण माझ्या या ओरडण्याकडे कोणीच लक्ष दिले नाही. बघता बघता हा पूल कोसळल्याचे मला पाहावे लागले.’
‘लोकमत’ची टीम साधारण रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी पोचली असता, सगळा परिसर लोकांनी भरून गेला होता. या दुर्घटनेत नेमके कितीजण बुडाले याचे वेगवेगळे अंदाज या वेळी लोक व्यक्त करताना दिसत होते. याच लोकांच्या गर्दीत एक कामगार महिला मात्र पुलाखाली सापडलेल्या मुलाचा पत्ता लागतो का, या विवंचनेत बसली होती. (शेवटी तिचा मुलगा अजितकुमार एक्का याचा मृतदेह उत्तररात्री दोन-अडीच वाजण्याच्या सुमारास सापडला). एकूणच या भागात तणाव होता.
काही बघ्यांच्या तोंडी आणखी एक प्रश्न होता तो म्हणजे, ही दुर्घटना चतुर्थीच्या दिवसांत झाली असती तर? चतुर्थीच्यावेळी याच नदीच्या पात्रात गणेश विसर्जन केले जाते. त्या वेळीही लोक बंद असलेल्या या लोखंडी पदपुलावर अशीच गर्दी करायचे. याबद्दल संजय नाईक यांनी सांगितले की, विसर्जनाच्या वेळी आम्ही ध्वनिक्षेपकावरून सूचना करूनही पुलावरील बघे बाजूला होत नसत. जर चतुर्थीवेळी अशी दुर्घटना घडली असती तर किमान शंभर जणांना तरी जलसमाधी मिळाली असती. सध्याच्या या दुर्घटनेसंदर्भात हळहळ व्यक्त करताना काही लोक चतुर्थीच्या वेळी अशी दुर्घटना झाली नाही, याबद्दल देवाचे आभार मानतानाही दिसले. पूल कोसळण्याची बातमी अवघ्या काही मिनिटांतच संपूर्ण सावर्डे परिसरात पसरल्याने कित्येकांना धक्का बसला. त्यात एका ७0 वर्षीय महिलेचाही समावेश होता. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, पुलावर जमलेल्या बघ्यांमध्ये या वृध्देचाही मुलगा होता. मात्र, पूल कोसळल्यानंतर नदीला भरती असूनही त्याने पोहत किनारा गाठला. मात्र, कुणीतरी त्याच्या आईला तुझा मुलगा पुलावरून पाण्यात कोसळला आणि त्याच्यावर पूल कोसळला अशी बातमी दिल्यामुळे तिने अक्षरश: अंथरुण धरले. शुक्रवारी ही महिला काहीशी भानावर आल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली.
गुरुवारी रात्री उशिरापर्यंत घटनास्थळावरील बघ्यांची गर्दी तशीच होती. रात्री १0.३0 वाजण्याच्या सुमारास दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी स्वप्नील नाईक यांच्या देखरेखीखाली सुरू झालेले शोधकार्य उत्तररात्री २.३0 पर्यंत चालू होते. मध्यंतरी रात्री ९.३0 वाजण्याच्या दरम्यान बसवराज मरेनवार या ट्रक ड्रायव्हरचा मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांना सापडला. रात्री ११.१५ च्या सुमारास भारतीय नौदलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्याचबरोबर दृष्टीचे ३५ जीवरक्षकही घटनास्थळी दाखल झाले. नौदलाच्या जवानांनी लोखंडी पूल क्रेनच्या साहाय्याने उचलून बाजूला काढल्यानंतर उत्तररात्री २.१५ च्या सुमारास अजितकुमार एक्का याचा मृतदेह सापडला. त्यापूर्वी रात्री पावणेबाराच्या सुमारास पोलीस महानिरीक्षक मुक्तेश चंदरही घटनास्थळी दाखल झाले होते.

Web Title: Does anyone have any in it?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.