गोव्यात आचारसंहिताभंगाच्या काँग्रेसकडून तक्रारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 05:56 PM2019-03-31T17:56:31+5:302019-03-31T17:56:45+5:30

निवडणूक आचारसंहितेचा भंग करुन सरकारने शिरोडा येथील जमीन व्यवहारात सुभाष शिरोडकर यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले आहेत, असा आरोप प्रदेश काँग्रेसने केला

Complaint from Congress of Code of Conduct in Goa | गोव्यात आचारसंहिताभंगाच्या काँग्रेसकडून तक्रारी

गोव्यात आचारसंहिताभंगाच्या काँग्रेसकडून तक्रारी

Next

पणजी : निवडणूक आचारसंहितेचा भंग करुन सरकारने शिरोडा येथील जमीन व्यवहारात सुभाष शिरोडकर यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले आहेत, असा आरोप प्रदेश काँग्रेसने केला असून १0 मार्चनंतर या खात्यात जमा केली गेलेली रक्कम जप्त केली जावी, अशी मागणी केली आहे. वेगवेगळ्या चार प्रकरणांत मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांच्याकडे रितसर तक्रारही केलेली आहे. 

पत्रकार परिषदेत प्रदेश काँग्रेसचे संवाद विभागाचे प्रमुख ट्रोजन डिमेलो यांनी आयोगाच्या कारभाराचा समाचार घेतला. ते म्हणाले की, ‘शिरोडकर यांच्या खात्यात जमा केल्या गेलेल्या पैशांच्या प्रकरणाची लोकायुक्तांनीही दखल घ्यावी. सरकारात दोन उपमुख्यमंत्र्यांची नियुक्ती केल्याबद्दल याआधी २१ मार्चला काँग्रेसने तक्रार केली त्याची साधी पोचही आयोगाने दिली नाही.’ तक्रारी आल्यास ४८ तासांच्या आत त्या निकालात काढण्याची हमी मुख्य निवडणूक अधिका-यांनी दिली होती त्याचे काय झाले, असा संतप्त सवाल त्यांनी केला. डिमेलो म्हणाले की,‘ आचारसंहिता भंगाचे प्रकार सत्ताधा-यांकडून घडण्याची शक्यता  ९0 टक्के असते. कारण त्यांच्या हाताशी सरकारी यंत्रणा असते. या यंत्रणेचा गैरवापर केला जाऊ शकतो. 

डिमेलो पुढे म्हणाले की,‘मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी खाण अवलंबितांना आपल्या शासकीय कार्यालयात बोलावून आश्वासने दिली. सार्वजनिक बांधकाम खात्याचे नवे मंत्री दिपक पाऊसकर यांनी अभियंते, कंत्राटदार यांना  आपल्या शासकीय कार्यालयात बोलावून निविदा पुढील तारखेने काढू, तुम्ही कामे चालू करा असा आदेश दिलेला आहे. असा कोणताही प्रकार काँग्रेस खपवून घेणार नाही. मुख्य सचिवांकडे आम्ही तक्रार केलेली आहे.

भाजपचे दक्षिण आणि उत्तर गोवा लोकसभा उमेदवार अर्ज भरतेवेळी मंत्र्यांनी शासकीय मोटारींचा वापर केल्याचा आरोपही त्यांनी केला. सरकारात उपमुख्यमंत्रीपदे आचारसंहिता लागू झाल्यानंतरच नव्याने निर्माण केली गेली आहेत. ही पदे आधी नव्हती, त्यामुळे आक्षेप घेण्यास वाव आहे, असा दावा करताना या तक्रारीवर आयोगाने अजून कोणतीही कारवाई केलेली नाही याकडे डिमेलो यांनी लक्ष वेधले.

Web Title: Complaint from Congress of Code of Conduct in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.