डिसोझा-लोबो यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चा 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2018 04:34 PM2018-11-03T16:34:38+5:302018-11-03T16:50:21+5:30

भाजपाचे जेष्ठ नेते तसेच माजी मंत्री अ‍ॅड. फ्रान्सिस डिसोझा यांना सतत टार्गेट करणारे उपसभापती मायकल लोबो यांनी डिसोझा यांची घेतलेली सदिच्छा भेट राजकीय वर्तुळात सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

BJP Calangute MLA Michael Lobo meeting with Francis D'Souza in goa | डिसोझा-लोबो यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चा 

डिसोझा-लोबो यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चा 

Next

म्हापसा - भाजपाचे जेष्ठ नेते तसेच माजी मंत्री अ‍ॅड. फ्रान्सिस डिसोझा यांना सतत टार्गेट करणारे उपसभापती मायकल लोबो यांनी डिसोझा यांची घेतलेली सदिच्छा भेट राजकीय वर्तुळात सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. या भेटीमुळे दोघात दिलजमाई झाल्याचे बोलले जात असून भविष्यात हे दोन्ही नेते एकत्रित आल्यास त्यांच्या एकत्रिकरणाचे तसेच अल्पसंख्यांक समाजातील मतांचे परिणाम भाजपावर होण्याची संभावना व्यक्त केली जात आहे. 

सव्वादोन महिने अमेरिकेत उपचार घेतल्यानंतर उपचार पूर्ण करुन तीन दिवसापूर्वी डिसोझा गोव्यात दाखल झाले होते. गोव्यात आल्यानंतर लोबो यांनी डिसोझा यांच्या म्हापशातील निवासस्थानी जावून त्यांची भेट घेऊन विचारपूस केली होती. सुमारे पाऊणतास दोघांनी चर्चा सुद्धा केली होती. सदरच्या भेटीनंतर लोबो यांनी ही भेट त्यांच्या आरोग्याची चौकशी करणारी असल्याचे मत व्यक्त केले. बऱ्याच कालावधीनंतर ते गोव्यात दाखल झाले असल्याने त्यांची विचारपूस करणे हे आपले कर्तव्य असल्याचे ते म्हणाले. त्यांना आपण लवकर बरे होऊन पुन्हा लोकसेवेत दाखल होण्याची सुचना सुद्धा केली. दोघांनाही या पुढे एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे मतही व्यक्त केले. 

भेटी संबंधीचे कारण  लोबो यांनी स्पष्ट केले असले तरी राजकीय वर्तुळात त्यांच्या भेटीला बरेच महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे या पुढे दोन्ही नेते एकत्रित येण्याची शक्यता नाकारली जात नाही. त्यांनी एकत्रितपणे काम केल्यास त्याचे परिणाम किमान बार्देस तालुक्या पूरते तरी भाजपावर होण्याची शक्यता आहे. 

हे दोन्ही नेते पक्षावर नाराज असून डिसोझा यांना अमेरिकेत असताना मंत्रिमंडळातून वगळण्यात आल्याने घेतलेल्या निर्णयावर त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. विश्वासात न घेताच आपल्याला वगळण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे होते तर उपसभापतीपदी असलेल्या लोबो यांची मंत्रीमंडळात वर्णी न लागल्याने ते पक्षावर नाराज आहे. त्यांना मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्याने त्यावर उघडपणे नाराजी व्यक्त केली नसली तरी मंत्रीमंडळातील फेरबदलानंतर पक्षावर नोकरभरतीच्या मुद्यावरुन टिका करुन आपली नाराजी दाखवून दिली होती. दोघांच्या भेटीतील महत्त्वाचे म्हणजे डिसोझा यांच्या भेट घेण्यापूर्वी लोबो यांनी राज्यात मुदतपूर्व निवडणुकांचे भाकीत सुद्धा केले होते. त्यांनी केलेल्या भाकीतावरुन राज्यातील सत्ताधारी गटात असलेली अस्वस्थता पुन्हा एकदा स्पष्ट दिसून आली होती.

या दोन्ही नेत्यात अनेकवेळा शाब्दिक चकमकी सुद्धा झालेल्या आहेत. म्हापसा शहरावर दुर्लक्ष केल्याचे आरोप लोबो यांनी डिसोझा यांच्यावर केल्यानंतर हा वाद उफळून आला होता. त्याला त्याच पद्धतीने डिसोझा यांनी प्रत्यूत्तर सुद्धा दिले होते. शेवटी पक्षाने त्यांच्यातील वादात हस्तक्षेप करुन एकमेकांवर टीका न करण्याचा समज देवून वाद मिटवला होता. त्यानंतर दोन्ही नेते क्वचितच एकत्रित आले होते. त्यामुळे डिसोझा यांच्या आरोग्याच्या मुद्यावरुन एकत्रित आलेल्या या नेत्यांच्या एकत्रितपणा हा चर्चेचा विषय बनलेला आहे. अल्पसंख्यांक समाजातील हे दोन्ही नेते एकत्रित आल्याने कदाचीत त्यातून बार्देस तालुक्यातील राजकारणाला वेगळी दिशा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

Web Title: BJP Calangute MLA Michael Lobo meeting with Francis D'Souza in goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.