‘स्मार्ट सिटी’त सापडली प्राचिन मूर्ती, पुरातत्व खात्याने घेतला ताबा

By समीर नाईक | Published: April 30, 2024 09:24 PM2024-04-30T21:24:18+5:302024-04-30T21:24:31+5:30

मूर्तीचे युरोपियन संस्कृतीशी नाते : प्रा. राजेंद्र केरकर

Ancient idol found in 'Smart City', Archeology Department took possession | ‘स्मार्ट सिटी’त सापडली प्राचिन मूर्ती, पुरातत्व खात्याने घेतला ताबा

‘स्मार्ट सिटी’त सापडली प्राचिन मूर्ती, पुरातत्व खात्याने घेतला ताबा

पणजी : स्मार्ट सिटी योजनेंतर्गत फूटपाथसाठी खोदकाम सुरू असताना चर्च स्केअर येथील पालिका उद्यानासमोर मंगळवारी कामगारांना प्राचिन मूर्ती आढळली. मूर्ती आढळल्याची माहिती मिळताच मोठी गर्दी झाली. शिल्पकलेचा आविष्कार दर्शविणारी ही मूर्ती मिळाल्याचे समजताच पुरातत्व खात्याच्या खास पथकाने घटनास्थळी दाखल होत पोलिस बंदोबस्तात मूर्ती ताब्यात घेतली. मूर्तीच्या परीक्षणानंतर याचे गुढ उलगडेल असे पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

जुन्या रिट्स हॉटेलजवळील हरी रघु बोरकर यांच्या मालकिच्या बार्बरिया इंडियन या सलून दुकानाच्या उबंरठ्याखाली जमिनीत ही मूर्ती होती. मूर्ती केवळ एक फूट खोलवर पालथी असल्याने ती कोणाच्याही लक्षात आली नाही. पण, फूटपाथ दुरुस्तीसाठी खोदकाम करताना मूर्तीवर वार झाला, तेव्हा दगडाचा तुकडा बाहेर काढला गेला. तेव्हा हा केवळ दगड नसून प्राचिन मूर्ती असल्याचे लक्षात आले. नंतर जेसीबीच्या सहाय्याने मूर्ती सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आली.

मूर्ती जवळपास अडीच मिटर लांब आहे. मूर्तीतील व्यक्ती तरुण असावी. या तरुणास दाढी, मिश्या आणि लांब केस आहेत. युवक काेणते तरी वाद्य वाजवित आहे, असे प्रथमदर्शी दिसते. मूर्तीच्या पायाजवळ एक सिंहसदृश प्राणी रेखाटलेला आहे. मात्र हा नेमका सिंह आहे की आणखी कुठला प्राणी, याबाबत साशंकता आहे. मूर्ती घडवताना सिमेंटचा वापर झाला असल्याचे दिसून येते. मात्र मूर्ती वजनाने जड आहे. पुरातत्त्व खात्याकडून पुढील काही दिवसांत याचे गुढ उलगडू शकेल.

लोकांनी केली गर्दी 
ज्या ठिकाणी मूर्ती मिळाली, तेथील दुकाने ५० वर्षांपेक्षा जुनी आहे. गेल्या पाच दशकात येथे फारसे नूतनीकरण वा इतर काम झालेले नाही. आश्चर्य म्हणजे फूटपाथदेखील झाले नव्हते. आता जेव्हा स्मार्ट सिटी योजनेची कामे सुरू आहे, त्या कामातील खोदकामात मूर्ती सापडली आहे. मूर्ती सापडल्याचे समजताच लोकांनी प्रचंड गर्दी केली. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली. मूर्ती साधारणत: ४०० वर्षे जुनी असावी, ती कदंब काळातील असू शकते, असाही तर्क आहे.

मूर्तीचे युरोपियन संस्कृतीशी नाते : प्रा. राजेंद्र केरकर
जलमार्गाशी निगडित, मांडवी नदीकाठी वसलेली पणजी ही वेगवेगळ्या संस्कृतीशी संबंधित होती. पणजीत सापडलेली मूर्ती या शहरातील सांस्कृतिक संचिताची खूण असून, इथल्या समृद्ध इतिहासाची प्रचिती यातून मिळते. सिंहासमवेत असलेली ही मूर्ती युरोपियन संस्कृतीशी नाते सांगणारी आहे,’ अशी माहिती पर्यावरण तज्ज्ञ प्रा. राजेंद्र केरकर यांनी दिली.

Web Title: Ancient idol found in 'Smart City', Archeology Department took possession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा