मडगाव : कामराभाट-सां जुझे दि अरियाल येथे गुरुवारी ज्या घरात स्फोट झाला होता, त्या घरातून ५0 गावठी बॉम्ब जप्त करण्यात आले. बॉम्बस्फोटात मृत झालेला पपलू मुलगुंड (३0) हा या भाड्याच्या घरातच बॉम्ब तयार करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान, हरयाणा येथून एनएसजीच्या (राष्ट्रीय सुरक्षा दल) कमांडोंचे पथक शुक्रवारी दुपारी घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने हे बॉम्ब आपल्या ताब्यात घेतले. बॉम्ब तयार करण्यासाठी लागणारी भुकटीही घटनास्थळी सापडली असून ती फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवून देण्यात येणार आहे. गावठी बॉम्ब निकामी केल्यानंतर चिरेखाणीत नष्ट केले जातील, अशी माहिती दक्षिण गोव्याचे प्रभारी पोलीस अधीक्षक कार्तिक कश्यप यांनी दिली. चार वाजता सुरू झालेले हे शोधकार्य जवळपास तासाभरानंतर संपले. या प्रकरणी ज्वालाग्राही पदार्थ कायद्यांतर्गंत गुन्हा नोंदवून घेण्यात आला आहे. पपलू हा घरातच बॉम्ब बनवून त्याचा वापर जंगली श्वापदांची शिकार करण्यासाठी करत होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. तो आणखी कुणाला बॉम्ब विकत होता का, याची माहिती पोलिसांना अजून मिळालेली नाही. आम्ही या प्रकरणी सर्व दृष्टिकोनांतून तपास करत आहोत. मृताचे नातेवाईक, स्फोट घटनेचे प्रथमदर्शी साक्षीदार तसेच मृताचे सहकारी यांचे जबाब नोंदविण्यात आल्याची माहिती अधीक्षक कश्यप यांनी दिली. पपलू हा फोंडा भागातील जंगलात रानटी प्राण्यांची शिकार करून मांस विकत होता. ते मांस विकत घेणार्‍यांचा पोलीस शोध घेत असून त्यांचेही जबाब नोंदविण्यात येणार असल्याची माहिती कश्यप यांनी दिली. मडगावच्या एसजीपीडीए मार्केट संकुलात पपलू मासळी कापण्याचा व्यवसाय करत होता, अशी माहिती मिळाली आहे. दुपारी दिल्लीहून एनएसजीचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी शोधकार्याला सुरुवात केली. लेफ्टनंट कर्नल बालकृष्णन यांच्या नेतृत्वाखाली सात जणांच्या पथकाने घरातून बॉम्ब, भुकटी, एक मोबाईल तसेच नदीच्या काठावरील दगडही जप्त केले. स्फोटात जखमी झालेल्यांपैकी गायत्री मुलगुंड (१८) हिला उपचारासाठी गोमेकॉत दाखल केले आहे, तर नूरजहाँ (२५), समीन (४) साहिल (१८) व उमेश गायकवाड (१२) यांच्यावर मडगावच्या हॉस्पिसियोत उपचार चालू आहेत.