कौतुकास्पद! गडचिरोलीच्या तरुणाने भंगारातील दुचाकीपासून बनवली इलेक्ट्रिक बाईक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 05:36 PM2022-12-14T17:36:19+5:302022-12-14T17:40:30+5:30

यू-ट्युबमधील व्हिडिओतून प्रेरणा; २५ हजार रुपये खर्च

young man from Gadchiroli made an electric bike from scrap vehicle watching youtube videos | कौतुकास्पद! गडचिरोलीच्या तरुणाने भंगारातील दुचाकीपासून बनवली इलेक्ट्रिक बाईक

कौतुकास्पद! गडचिरोलीच्या तरुणाने भंगारातील दुचाकीपासून बनवली इलेक्ट्रिक बाईक

Next

विष्णू दुनेदार

तुळशी (गडचिरोली) : आज भ्रमणध्वनी प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. प्रत्येकाच्या हातात आज ॲन्ड्राॅईड मोबाईल आला आहे. तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच मोबाईलचे आकर्षण व व्यसन जडले आहे. मोबाईलचे काही दुष्परिणाम तरुणांमध्ये पाहायला मिळत असले, तरी काही तरुणांसाठी मोबाईल वरदान ठरला आहे. देसाईगंज तालुक्यातील तुळशी येथील तरुणाने केवळ मोबाईलवरील यू-ट्युबमधील व्हिडिओ बघून चक्क भंगारात पडलेल्या बाईकपासून इलेक्ट्रिक बाईक बनविल्याने सध्या परिसरात कौतुकाचा विषय बनला आहे.

देवदत्त नामदेव बावणे असे या तरुणाचे नाव आहे. बारावी व आयटीआयचे (ट्रॅक्टर मेकॅनिक) शिक्षण पूर्ण केलेला देवदत्त आंध्रप्रदेश राज्यात रोजगारानिमित्त गेले हाेता. तिथे त्याने इलेक्ट्रिक बाईक बघितली. तेव्हापासून आपणही अशी बाईक बनवायची, असे स्वप्न तो मनात रंगवू लागला. स्वप्नांना कृतीची जोड देत यू-ट्युब ॲपवरील व्हिडिओ बघून देवदत्तने इलेक्ट्रिक बाईक बनविली व आपले स्वप्न पूर्ण केले.

२५ हजारांत बनली दुचाकी

 इलेक्ट्रिक बाईक बनविण्यासाठी देवदत्तने भंगारातील तीन हजार रुपयांची बंद अवस्थेतील बाईक खरेदी केली. १२ होल्ट, २८ एम्पीअरच्या ४ बॅटऱ्या, ४८ व्होल्ट ८०० वॅटची डीसी मोटर, ८०० वॅटचा कंट्रोलर, हार्ननेट व वायरिंग खरेदी केली. त्यांची जुळवाजुळव करून इलेक्ट्रिक बाईक तयार केली. यासाठी साहित्य खरेदी, वेल्डिंग खर्च, भंगारातील गाडी खरेदीसाठी लागलेला खर्च व इतर खर्च असा एकूण २५ हजार ५०० रुपये खर्च बाईक बनविण्यासाठी आला आहे

स्पीड ४० चा

या दुचाकीची गती ४० किमी प्रतितास अशी आहे. ६० किमी इतके मायलेज देते. लोड क्षमता ३०० किलाेग्रॅम एवढी आहे. चार्जिंग टाईम १० तास आहे. १० तास चार्जिंग केल्यानंतर दुचाकी ६० किलोमीटरपर्यंत धावते. इलेक्ट्रिक बाईकमुळे हवा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण होत नाही. पेट्रोलची बचत होत असल्याने गरिबांना परवडणारी आहे, असे देवदत्तने सांगितले.

बहुउपयाेगी इलेक्ट्रिक बाईक

बाजारात अशाप्रकारच्या तयार इलेक्ट्रिक बाईकची किंमत लाख रुपयापर्यंत आहे. उपलब्ध साधनांचा व असलेल्या स्वतःच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज घेऊन कमीत-कमी खर्चात ही इलेक्ट्रिक बाईक देवदत्तने तयार केली आहे. भविष्यात याच इलेक्ट्रिक बाईकमध्ये सुधारणा करून बाईकवर मोबाईल चार्जिंग करणे, सोलर पॅनल ऑपरेट करणे, पाणी उपसा करण्यासाठी व घरीच लाईटची सोय करणे अशी बहुउपयोगी इलेक्ट्रिक बाईक बनविण्याचा देवदत्तचा मानस आहे. देवदत्तने बनविलेली इलेक्ट्रिक बाईक सध्या परिसरात कौतुकाचा विषय झाला आहे.

Web Title: young man from Gadchiroli made an electric bike from scrap vehicle watching youtube videos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.