वाजत-गाजत बाप्पाचे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 11:53 PM2018-09-13T23:53:00+5:302018-09-13T23:53:19+5:30

मागील अनेक दिवसांपासून ज्याची प्रतीक्षा केली जात होती, त्या गणपती बाप्पाचे आगमन गुरूवारी झाले. सार्वजनिक गणेश मंडळे तसेच सामान्य नागरिकांनीही वाजत गाजत बाप्पाला घरी आणले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर घरी बाप्पा आल्याचा आनंद ओसंडून वाहात होता.

Vajat-Gajat Bappa's arrival | वाजत-गाजत बाप्पाचे आगमन

वाजत-गाजत बाप्पाचे आगमन

Next
ठळक मुद्दे१० दिवस राहणार जल्लोष : सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मागील अनेक दिवसांपासून ज्याची प्रतीक्षा केली जात होती, त्या गणपती बाप्पाचे आगमन गुरूवारी झाले. सार्वजनिक गणेश मंडळे तसेच सामान्य नागरिकांनीही वाजत गाजत बाप्पाला घरी आणले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर घरी बाप्पा आल्याचा आनंद ओसंडून वाहात होता.
श्रावण मासाला सुरूवात झाल्यापासून गणेश भक्तांना गणरायाच्या आगमनाचे वेध लागले होते. गुरूवारी घरची कामे तत्काळ आटोपून गणेशभक्त गणरायाची मूर्ती खरेदी करण्यासाठी कुंभार मोहल्ल्यात पोहोचले. आपल्या आर्थिक क्षमतेनुसार गणेशभक्त गणरायाच्या मूर्तीची निवड करताना दिसून येत होता. नगर परिषद व अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्लास्टर आॅफ पॅरीसच्या मूर्ती तयार करू नये, असे आवाहन केल्यानंतर स्थानिक कारागिरांनी प्लास्टर आॅफ पॅरीसचा वापर केला नाही. मात्र ऐन वेळेवर गुरूवारी विक्रीसाठी गडचिरोली शहरात आलेल्या काही मूर्ती मात्र प्लास्टर आॅफ पॅरीसच्या असल्याचे दिसून आले. मात्र माती व प्लास्टर आॅफ पॅरीस यातील फरक न कळल्याने काही गणेशभक्त चांगली व स्वस्त दिसेल, अशा मूर्तीला प्राधान्य देत मूर्ती खरेदी करीत होते.
मागील वर्षी दुष्काळी परिस्थिती होती. त्यामुळे शेतकरी चिंतातूर होता. यावर्षी मात्र पावसाने शेतकऱ्याला साथ दिली आहे. शेतातील हिरवेगार पीक डोलतांना बघून शेतकरी आनंदी आहे. त्याचा हा आनंद गणेशाच्या आगमनामुळे आणखी द्विगुणीत होणार आहे.
गडचिरोली शहरात खासगी तसेच सार्वजनिक मंडळांच्या वतीने गणरायाची प्रतिष्ठापना केली जाते. त्यामुळे कुंभार मोहल्ल्यात गर्दी उसळते. या परिसरात पोलीस व गृहरक्षक दलाच्या जवानांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दिवसभरात कोणतीही अनुचित घटना घडली नाही.
गणरायाच्या नैवेद्यासाठी स्वतंत्र भाज्यांची विक्री
गणपतीबाप्पाला २१ प्रकारच्या भाज्यांचा नैवेद्य पहिल्या दिवशी दाखविला जातो. २१ भाज्या गोळा करणे प्रत्येक व्यक्तीला शक्य होत नाही. त्यामुळे २१ भाज्यांचे मिश्रण करून ते विक्रीस ठेवण्यात आले होते. या माध्यमातून स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध झाला. आजपर्यंत दुर्लक्षित झालेल्या पत्रावळींनाही सुगीचे दिवस आले. घटस्थापना करण्यासाठी तसेच नैवेद्य दाखविण्यासाठी पत्रावळीचा वापर केला जात असल्याने पत्रावळीची मागणी वाढली होती. गणरायाचा आवडता पदार्थ असलेले मादक हॉटेलमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. कामाचा व्याप अधिक असलेल्या महिला हॉटेलमधील मोदक खरेदी करण्यास पसंती दर्शवित होत्या.
शांतता कमिटीच्या बैठकांना खो
गणेशोत्सव शांततेत पार पडावा, यासाठी गणेशोत्सवापूर्वी शांतता कमिटीची पोलीस स्टेशन स्तरावर बैठक आयोजित केली जाते. या बैठकीला प्रामुख्याने गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित राहतात. त्यांना शासनाचे नियम समजावून सांगितल्या जातात. सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन सुध्दा केले जाते. त्यामुळे शांतता कमिटीच्या सभेचे विशेष महत्त्व आहे. मात्र यावर्षी बहुतांश पोलीस स्टेशनमध्ये शांतता कमिटीची बैठकच झाली नाही.
मोठ्या आवाजाचे अनेक दुष्परिणाम आहेत. त्यामुळ डीजे, संदल, बॅन्ड यांच्या आवाजावर नियंत्रण असणे आवश्यक आहे. मागील वर्षी नियम तोडणाºया गडचिरोलीतील काही मंडळांवर कारवाई करण्यात आली होती. याही वर्षी याची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.

Web Title: Vajat-Gajat Bappa's arrival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.