विद्यार्थिनींवर तिकिटांचा भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 11:55 PM2018-07-12T23:55:20+5:302018-07-12T23:56:41+5:30

शाळा सुरू होऊन आता जवळपास १५ दिवसांचा कालावधी उलटत आला तरी बहुतांश विद्यार्थिनींच्या बस पासेस निघाल्या नाहीत. त्यामुळे तिकीटाचे पैसे देऊन त्यांना शाळेत यावे लागत आहे.

Ticket Bills on Students | विद्यार्थिनींवर तिकिटांचा भुर्दंड

विद्यार्थिनींवर तिकिटांचा भुर्दंड

Next
ठळक मुद्देमोफत प्रवासाची सवलत कुचकामी : शाळा प्रशासनाचा लेटलतीफपणा मुळावर

दिगांबर जवादे।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शाळा सुरू होऊन आता जवळपास १५ दिवसांचा कालावधी उलटत आला तरी बहुतांश विद्यार्थिनींच्या बस पासेस निघाल्या नाहीत. त्यामुळे तिकीटाचे पैसे देऊन त्यांना शाळेत यावे लागत आहे. काही गरीब विद्यार्थिनींकडे तिकीटाचे पैसे नसल्याने त्या शाळेत न येता घरीच राहत असल्याची गंभीर स्थिती आहे.
विद्यार्थिनींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढावे, यासाठी राज्य शासनाच्या वतीने पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थिनींसाठी अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास सवलत योजना राबविली जाते. गडचिरोली जिल्ह्यात मानव विकास मिशन अंतर्गत गडचिरोली आगाराला ४९, अहेरी आगाराला ४२ व ब्रह्मपुरी आगाराला १४ बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. आठवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनींना मानव विकास मिशन अंतर्गत मोफत पास दिले जातात. एवढेच नव्हे तर शिक्षण विभागाने ठरवून दिलेल्या मार्गाने मानव विकास मिशनच्या बसफेऱ्या चालवून विद्यार्थिनींची शाळा ते गावापर्यंत वाहतूक केली जाते. एकंदरीत गडचिरोली जिल्ह्यातील पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाºया विद्यार्थिनींना मोफत प्रवास सवलतीचा लाभ घेता येतो. मात्र शाळेच्या लेटलतीफ धोरणाचा फटका विद्यार्थिनींना बसत आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील शाळा २६ जूनपासून सुरू होतात. पहिल्याच दिवसी विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके यांचे वितरण केले जाते. त्यांच्या स्वागताच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्यामुळे विद्यार्थी पहिल्या दिवसापासून शाळेत यायला सुरुवात करतात. त्यामुळे संबंधित शाळा प्रशासनाने शाळा सुरू होण्याच्या काही दिवसाअगोदरच पासेस काढून ठेवणे आवश्यक आहे. जेणेकरून पहिल्या दिवसापासूनच विद्यार्थिनींना मोफत प्रवास सवलतीचा लाभ घेता येईल. यासाठी एसटी महामंडळ तयार असले तरी संबंधित शाळा प्रशासन शाळा सुरू झाल्याशिवाय पासेस काढण्याची तयारी सुरू करत नाही. शाळा सुरू झाल्यानंतर ८ ते १५ दिवसानंतर पासेस काढण्यासाठी अर्ज केले जातात. यावर्षी सुद्धा अनेक शाळांनी अजूनपर्यंत अर्जच केले नाहीत. त्यामुळे मागील १५ दिवसांपासून काही विद्यार्थिनी तिकीट काढून प्रवास करीत आहेत. सवलत असतानाही संबंधित शाळेच्या लेटलतिफ धोरणाचा फटका विद्यार्थिनींना बसत आहे. गरीब विद्यार्थिनी दरदिवशी प्रवासासाठी ४० ते ५० रूपये खर्च करू शकत नसल्याने त्या शाळेतच येत नसल्याचे दिसून येते.
सहा महिन्यांची मिळणार पास
मानव विकास मिशन व अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना मोफत प्रवास सवलतीचा लाभ संपूर्ण शैक्षणिक सत्र संपेपर्यंत द्यावाच लागतो. मागील वर्षीपर्यंत तीन महिन्यांची पास दिली जात होती. दर तीन महिन्याने पास देण्याऐवजी सहा महिने ते दहा महिन्यांपर्यंतची पास देण्याचे निर्देश एसटीच्या केंद्रीय कार्यालयाने दिले आहेत. त्यानुसार गडचिरोली विभागात सहा महिन्यांची पास दिली जाणार आहे. यामुळे एसटी प्रशासन व शाळा प्रशासनाचेही वेळ व श्रम वाचण्यास मदत होईल. पण हे काम लवकर सुरू करणे गरजेचे आहे.
पहिल्याच दिवशी पुस्तकांसोबत पासही देणे शक्य
शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध व्हावी, यासाठी शाळा सुरू होण्यापूर्वीच शाळांपर्यंत पुस्तके उपलब्ध करून दिली जातात. त्याचप्रमाणे निश्चित विद्यार्थिनींची शाळा सुरू होण्याच्या दोन-चार दिवसांपूर्वी पास काढून शाळेच्या पहिल्या दिवशी पुस्तकांसोबतच पासही दिल्यास विद्यार्थिनींचा आनंद द्विगुणीत होईल. विद्यार्थिनी पहिल्या दिवसापासूनच शाळेत हजर राहील. एसटी विभाग शाळा सुरू होण्यापूर्वी पास देण्यास तयार आहे. हा प्रयोग किमान पुढील वर्षी एखाद्या शाळेने करून बघावा, अशी मागणी पालकांकडून होत आहे.

Web Title: Ticket Bills on Students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.