करवसुली ५३ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 01:17 AM2018-02-07T01:17:48+5:302018-02-07T01:18:20+5:30

आर्थिक वर्ष संपण्यास दीड महिन्याचा कालावधी शिल्लक असल्याने जास्तीत जास्त कर वसुली व्हावी, या उद्देशाने नगर परिषदेने यंत्रणा कामाला लावली असली तरी ५ फेब्रुवारीपर्यंत मालमत्ता कराची केवळ ५३ टक्के वसुली व पाणीपट्टीची ८१ टक्के वसुली झाली आहे.

Tax collection at 53 percent | करवसुली ५३ टक्क्यांवर

करवसुली ५३ टक्क्यांवर

Next
ठळक मुद्देगडचिरोली नगर परिषद : दोन महिन्यांत ४७ टक्के वसुलीचे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आर्थिक वर्ष संपण्यास दीड महिन्याचा कालावधी शिल्लक असल्याने जास्तीत जास्त कर वसुली व्हावी, या उद्देशाने नगर परिषदेने यंत्रणा कामाला लावली असली तरी ५ फेब्रुवारीपर्यंत मालमत्ता कराची केवळ ५३ टक्के वसुली व पाणीपट्टीची ८१ टक्के वसुली झाली आहे.
मालमत्ता कर व पाणी कराच्या माध्यमातूनच नगर परिषदेला स्वत:चा खर्च भागवावा लागतो. त्यामुळे नगर परिषदेने अधिकाधिक मालमत्ता कराची वसुली करून स्वत:ची आर्थिक स्थिती मजबूत करावी, असे सक्त निर्देश नगर प्रशासन विभागाने राज्यभरातील नगर परिषदांना दिले आहेत.
गडचिरोली शहराअंतर्गत एकूण ६४ हजार ४१५ मालमत्ताधारक आहेत. या मालमत्ताधारकांकडून २०१७-१८ या आर्थिक वर्षात ३ कोटी ३८ लाख ६४ हजार ४१५ रूपयांची एकूण मागणी आहे. मार्चच्या शेवटपर्यंत ९० टक्केच्या वर कर वसुली व्हावी, या उद्देशाने नगर परिषदेने नोव्हेंबर महिन्यापासूनच यंत्रणा कामाला लावली. सद्य:स्थितीत मालमत्ता कर गोळा करण्यासाठी नऊ कर्मचारी तर पाणीपट्टी गोळा करण्यासाठी पाच कर्मचारी नेमण्यात आले आहेत. ज्या मालमत्ताधारकांनी अजूनपर्यंत कराचा भरणा केला नाही, अशा मालमत्ताधारकांना नोटीस दिली जात आहे. नोटीस मिळाल्यानंतर १५ दिवसांच्या आत कराचा भरणा न केल्यास जप्तीची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. ५ फेब्रुवारीपर्यंत १ कोटी ५५ लाख ८९ हजार ७७२ रूपयांची मालमत्ता कर वसुली झाली आहे. हे प्रमाण ५३ टक्के आहे.
शहरात एकूण ६ हजार ८७० नळधारक आहेत. नळधारकांकडून १ कोटी ६७ लाख ५६ हजार ५०५ रूपयांची एकूण मागणी आहे. त्यापैकी १ कोटी ३५ लाख १६ हजार ६४७ रूपये एवढी कर वसुली झाली आहे. अधिकाधिक वसुली व्हावी, यादृष्टीने नगर पालिका प्रयत्नरत आहे. दोन महिन्यात सुमारे ४७ टक्के कर वसुली करण्याचे आव्हान नगर परिषदेला पेलावे लागणार आहे. तेव्हाच वसुली ९० टक्क्यांवर पोहोचेल.
जानेवारीपासून दोन टक्के दंड
चालू आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे मागणी बिल जून, जुलै महिन्यातच दिले जाते. तेव्हापासून मालमत्ताधारकांनी ३१ डिसेंबरपर्यंत मालमत्ता कराचा भरणा करणे अपेक्षित आहे. मात्र अनेक नागरिक मालमत्ता कर भरण्याचा शेवटचा दिनांक ३१ मार्च समजतात व तोपर्यंत कराचा भरणा करत नाही. मात्र नगर परिषद नियमानुसार ३१ डिसेंबरपर्यंतच कर भरण्याची मुदत राहते. त्यानंतर प्रतिमाह दोन टक्के दंड आकारला जातो. सद्य:स्थितीत ज्या नागरिकांनी कराचा भरणा केला नाही. त्यांच्यावर दंड आकारला जात आहे.
शासकीय कार्यालयांकडे अधिक थकबाकी
गडचिरोली हे जिल्हास्तरावरील ठिकाण असल्याने या ठिकाणी अनेक शासकीय कार्यालये आहेत. या कार्यालयांकडे मोठ्या प्रमाणात मालमत्ता कर थकला आहे. सामाजिक न्यायभवन विभागाकडे १४ लाख रूपये, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे १० लाख रूपये, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडे सुमारे पावणे दोन लाख रूपयांचा कर थकला आहे. बऱ्याचवेळा शासनाकडून अनुदान मिळत नाही. त्यामुळे मालमत्ता कर थकतो. इतरही शासकीय कार्यालयांकडे मोठ्या प्रमाणात मालमत्ता कर थकला आहे. काही शासकीय कार्यालयांकडून मात्र नियमितपणे मालमत्ता कराचा भरणा केला जातो.

Web Title: Tax collection at 53 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.