रावपाट गंगाराम घाट जत्रा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 11:45 PM2019-02-23T23:45:49+5:302019-02-23T23:54:48+5:30

तालुक्यातील झेंडेपार ग्रामसभेच्या वतीने खनीमट्टा पहाडीवर रावपाट गंगाराम घाट जत्रा १९ ते २१ फेब्रुवारीदरम्यान पार पडली. या जत्रेला झेंडेपार इलाक्यातील ९० पेक्षा अधिक ग्रामसभांमधील हजारो नागरिक उपस्थित होते.

Ravepath Gangaram Ghat jatra excitement | रावपाट गंगाराम घाट जत्रा उत्साहात

रावपाट गंगाराम घाट जत्रा उत्साहात

googlenewsNext
ठळक मुद्देपेन देवाची पूजाअर्चा : ग्रामसभांच्या वार्षिक उत्सव अधिकार संमेलनाला हजारो नागरिकांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : तालुक्यातील झेंडेपार ग्रामसभेच्या वतीने खनीमट्टा पहाडीवर रावपाट गंगाराम घाट जत्रा १९ ते २१ फेब्रुवारीदरम्यान पार पडली. या जत्रेला झेंडेपार इलाक्यातील ९० पेक्षा अधिक ग्रामसभांमधील हजारो नागरिक उपस्थित होते. या जत्रेदरम्यान पेनदेवाची मनोभावे पूजाअर्चा करून दर्शन घेण्यात आले.
आदिवासी व इतर पारंपरिक वननिवासी हे निसर्गपूजक असून पारंपरिकरित्या निसर्गातील संसाधनाचे जतन करीत आहेत. निसर्गातील झाडे, पाणी, दगड, पक्षी हे त्यांचे टोटेम (प्रतिक) आहे. या टोटेमचे संरक्षण करणे ते आपली जबाबदारी मानतात. या संसाधनाचे संरक्षण व संवर्धन करून निसर्गाशी संबंधित आपली संस्कृती व उपजीविका यांचे रक्षण करणे हे आदिवासी नागरिक आपले कर्तव्य समजतात. झेंडेपार ग्रामसभेचे समारू कल्लो यांनी कार्यक्रमाची सुरुवात करून खाणीला आपला विरोध दर्शविला. बुकायू होळी यांनी झेंडेपार क्षेत्रातील प्रस्तावित खदाणीला जनतेचा विरोध का आहे, याबाबतची भूमिका मांडली. प्रस्तावित खदाण हा केवळ झेंडेपार ग्रामसभेचा मुद्दा नाही तर या क्षेत्रातील सर्वच लोकांचा प्रश्न आहे. त्यामुळे लोकांनी आमच्या संघर्षात साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. झेंडेपार सोबतच सोहले, भर्रीटोला, आगरी, मसेली येथे एकूण १ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर १२ खाण प्रकल्प प्रस्तावित आहेत, या प्रकल्पामुळे कोरची तालुक्यातील बहुतांश गावांचा गौण व वनोपजावर आधारित असलेला रोजगार हिरावल्या जाऊन पर्यावरणाचा ºहास होणार आहे. नांदळीच्या सरपंच बबीता नैताम यांनी खाणीच्या विरोधात संपूर्ण महिलांनी संघटित होण्याचे आवाहन यावेळी केले. डॉ.सतीश गोगुलवार यांनी ग्रामसभांनी वनावर आधारित आपली उपजीविका मजबूत करून पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करावे, असे सांगितले. त्यानंतर याच दिवशी रात्री सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.

महिला सभा व ग्रामसभेत या मागण्यांवर चर्चा
कोरची तालुक्यासह जिल्ह्यातील तसेच जिल्ह्यातील मंजूर व प्रस्तावित असलेले खदाण प्रकल्प बंद करावे. खाणी असलेल्या किंवा प्रस्तावित असलेल्या क्षेत्रातील ग्रामसभांचे सामूहिक वनहक्काचे दावे ग्रामसभांनी मागणी केलेल्या क्षेत्राप्रमाणे मंजूर करावे. कोरची तालुक्यातील वनहक्क प्राप्त ग्रामसभांची जोडपत्र ३ वाटप करावेत. प्रलंबित दावे निकाली काढावेत व उर्वरित दावे सादर न झालेल्या ग्रामसभांचे दावे करण्याची प्रक्रिया सुरु करावी. टिपागड येथील अभयारण्य नामंजूर करावे. वनहक्क कायद्याअंतर्गत व्यक्तिगत वनहक्क धारकाचे ७/१२ वर नोंद करीत असताना त्यावर महिलांचीही मालक म्हणून नोंद करावी. आदिवासी आणि अन्य परंपरागत वननिवासी यांनी वनहक्क कायद्यांतर्गत ते कसत असलेल्या वनजमिनीवर जे दावे केलेत आणि जे दावे नामंजूर झालेत त्या जमिनी खाली करण्याचे जे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले ते रद्द करण्यात यावे. आदी मागण्या महिला सभा व ग्रामसभेमध्ये करण्यात आले. या मागण्यावर विस्तृत चर्चा करण्यात आली.

Web Title: Ravepath Gangaram Ghat jatra excitement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.