पाच हजार नवीन कामांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 11:33 PM2018-12-06T23:33:08+5:302018-12-06T23:34:36+5:30

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात नवीन कामे मार्गी लावण्यासाठी जि.प. च्या रोजगार हमी विभागाने अतिरिक्त कामांचा नियोजन आराखडा तयार केला. या आराखड्याला जि.प.च्या सर्वसाधारण सभेत मंजुरी प्रदान करण्यात आली.

Five thousand new work sanctioned | पाच हजार नवीन कामांना मंजुरी

पाच हजार नवीन कामांना मंजुरी

Next
ठळक मुद्देकामाच्या अतिरिक्त नियोजनास मान्यता : रोहयोतून मिळणार मजुरांना रोजगार

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात नवीन कामे मार्गी लावण्यासाठी जि.प. च्या रोजगार हमी विभागाने अतिरिक्त कामांचा नियोजन आराखडा तयार केला. या आराखड्याला जि.प.च्या सर्वसाधारण सभेत मंजुरी प्रदान करण्यात आली. या आराखड्यानुसार जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात ग्राम पंचायत स्तरावर एकूण ५० हजार ८६७ कामांना मंजुरी देण्यात आली. रोहयोच्या या नवीन कामातून हजारो मजुरांना रोजगार मिळणार आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर दरवर्षी शेततळे, मजगी, बोडी, सिंचन विहीर, बोडी खोलीकरण आदीसह विविध कामे केली जातात. सदर कामाचा नियोजन आराखडा तयार केल्या जाते. त्यापूर्वी ग्रामपंचायत स्तरावरून आवश्यक त्या कामाची यादी व प्रस्ताव पंचायत समिती प्रशासनामार्फत जिल्हा परिषदेकडे सादर केल्या जाते. वार्षिक नियोजन आराखड्यानंतरही आवश्यकतेनुसार व मागणी असल्यास अतिरिक्त कामाचे नियोजन केले जाते. त्यानुसार यंदा अतिरिक्त कामाच्या नियोजन आराखडा तयार करण्यात आला. या आराखड्यानुसार बाराही तालुक्यात शोषखड्ड्याचे काम प्राधान्याने घेण्यात आले आहे. सध्या धान बांधणी व मळणीचा हंगाम अंतिम टप्प्यात सुरू आहे. हा हंगाम संपल्यानंतर शेतमजुराच्या हाताला काम राहत नाही. अशा वेळी ग्रामीण भागातील मजुरांकडून रोहयोच्या कामाची मागणी होत असते. या मजुरांना रोजगार देण्यासाठी अतिरिक्त कामाचे नियोजन करून अधिकाधिक मनुष्य दिवस रोजगार उपलब्ध करण्यावर नरेगा विभागाच्या वतीने भर दिला जातो. जि.प.च्या अध्यक्ष योगीता भांडेकर व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या मार्गदर्शनात रोहयोच्या अतिरिक्त कामांना मंजुरी प्रदान करण्यात आली.
सदर कामे मार्गी लावण्यासाठी जिल्हास्तरावरील नरेगा कक्षाच्या अधिकाऱ्यांकडून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. सदर कामे लवकर सुरू करून मजुरांना रोजगार देण्यावर भर दिला जाणार आहे. त्यादृष्टीने पंचायत समिती व ग्रामपंचायतस्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला जात आहे.

आराखड्यात या कामांचा समावेश
अतिरिक्त नियोजन आराखड्यानुसार १० तालुक्यात फळबागांची एकूण ८२२ कामे मंजूर करण्यात आली आहेत. यामध्ये अहेरी तालुक्यात १५०, भामरागड ३६, चामोर्शी १८१, देसाईगंज २०१, धानोरा ५९, गडचिरोली ५४, कोरची ५४, मुलचेरा ४२ व सिरोंचा तालुक्यात ४५ कामांचा समावेश आहे. मंजूर १३३ मजगीच्या कामामध्ये देसाईगंज तालुक्यात २४, कोरची ५६ व सिरोंचा तालुक्यातील ३६ कामांचा समावेश आहे. व्हर्मी कंपोस्टची देसाईगंज या एकमेव तालुक्यात १६० कामे मंजूर करण्यात आली आहे. कोरची तालुक्यात बोडी खोलीकरणाची १० कामे मंजूर करण्यात आली आहे. नाडेप कंपोस्टची देसाईगंज तालुक्यात ११० तर कोरची तालुक्यात २०९ अशा एकूण ३१९ कामांना मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. अतिरिक्त नियोजन आराखड्यात मंजूर दगडी बंधाऱ्यांच्या २० कामांचा समावेश आहे. सिमेंट बंधाºयाची ७ तर गॅबेरीयन बंधाऱ्याची २४८ कामांचा समावेश आहे. या कामाच्या माध्यमातून गावातील व परिसरातील मजुरांना रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यासाठी मजुराची नोंदणी करण्यात येणार आहे.

४९ हजार शोषखड्ड्यांचे नियोजन
२०१८-१९ वर्षाच्या अतिरिक्त नियोजन आराखड्यानुसार शोषखड्ड्याची जिल्हाभरात एकूण ४९ हजार १४८ कामांना मंजुरी प्रदान करण्यात आली. यामध्ये अहेरी तालुक्यात ५७६, आरमोरी ८ हजार २८५, भामरागड ५३२, चामोर्शी ९ हजार ८७७, देसाईगंज १ हजार ४६५, धानोरा २ हजार ८१७, एटापल्ली १ हजार ६५४, गडचिरोली ४ हजार ९६२, कोरची १ हजार २४९, कुरखेडा ७ हजार ५८९, मुलचेरा ३ हजार ८४० व सिरोंचा तालुक्यातील ६ हजार २६२ कामांचा समावेश आहे.

यंत्रणेमार्फत होणार १ हजार ९१८ कामे
रोजगार हमी योजनेंतर्गत आलापल्ली, वडसा, सिरोंचा, भामरागड, गडचिरोली या पाच वन विभागातर्फे विविध कामे करण्यात येणार आहे. याशिवाय सामाजिक वनीकरण जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तर्फेही रोहयोचे कामे करण्यात येणार आहे. या सर्व यंत्रणेनेचे मिळून एकूण १ हजार ९१८ कामांना अतिरिक्त नियोजन आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये मिश्र रोपवनाची ६२, खोदतळ्यांची ५७, दगडी बंधारे ५२१, गाबरिया बंधाऱ्यांची ६८४ रोपवाटिका ४८ आदी कामांचा समावेश आहे.

Web Title: Five thousand new work sanctioned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.