अखेर जात पंचायतीवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 12:21 AM2018-02-08T00:21:44+5:302018-02-08T00:21:59+5:30

Finally, filed a complaint against the Panchayat | अखेर जात पंचायतीवर गुन्हा दाखल

अखेर जात पंचायतीवर गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देबलात्कारातील आरोपीला अभय प्रकरण : दंड व गावजेवणाची शिक्षा देऊन केले होते मोकळे

ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : बलात्काऱ्यावर पोलीस कारवाई न करता दंड व गावजेवणाची शिक्षा देणाऱ्या जात पंचायतीच्या ६ सदस्यांवर अखेर पोलिसांनी जातपंचायत कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. यामुळे कायदा झुगारत आपण म्हणू तो कायदा अशी भूमिका घेणाऱ्या ठिकठिकाणच्या गावपंचायतींना चपराक बसली आहे.
या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या जात पंचायतच्या सदस्यांमध्ये देवदास केशव पदा (६५), रोहीदास इसदू पदा (४२), खुशाल बागु पदा (४८), गजानन देवाजी मडावी (५८), सखाराम गणू हिचामी (७०) आणि यादव जेहाम हुर्रा सर्व रा.मोहली यांचा समावेश आहे. त्यांना मंगळवारी अटक करून गडचिरोली न्यायालयापुढे उभे करण्यात आले. न्यायालयाने त्यांना जामिनावर सोडले.
हे प्रकरण भूमकाल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उघडकीस आणले होते. गेल्या १७ जानेवारी रोजी धानोरा तालुक्यातील मोहली गावात अनिल मडावी या ४० वर्षीय इसमाने जिल्हा परिषद शाळेतील पाचव्या वर्गात शिकणाºया मुलीवर बलात्कार केला. मडावी याने पीडित मुलीच्या आईला बरे नसल्याचे निमित्त शिक्षकांना सांगून मुलीला शाळेतून गावाजवळच्या तलावात नेऊन तिच्यावर अत्याचार केला.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जात पंचायत बोलविण्यात आली. त्यामध्ये सरपंच, उपसरपंच, माजी तंटामुक्त अध्यक्ष व इतरांनी अनिल मडावीला १२ हजार रूपये व गावकऱ्यांना जेवण देण्याचा दंड ठोठावला. मात्र सरपंच, उपसरपंच यासारख्या जबाबदार व्यक्तींनी याबाबतची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये केली नाही. पीडित मुलीची प्रकृती गंभीर असतानाही जात पंचायतीने कोणती मदत केली नसल्याचे भूमकाल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना गावात प्रत्यक्ष जाऊन पाहणी केल्यानंतर आढळले होते. त्यांनी नंतर पोलीस पाटील नलचुलवार यांच्याशी संपर्क साधला व नंतर मुलीच्या आई-वडिलांनी याबाबतची तक्रार २४ जानेवारी पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली. मात्र एफआयआरमध्ये जात पंचायतीने दिलेल्या दंडात्मक शिक्षेचा उल्लेख करण्यात आला नाही.
अशा प्रकरणात पीडित मुलीला न्याय मिळवून देण्याबरोबरच जात पंचायतीच्या अनिष्ट परंपरा नष्ट करण्यासाठी महिला, आदिवासी मानवाधिकार क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी भूमकाल संघटनेच्या डॉ. रश्मी पारसकर व प्रा.दीपाली मेश्राम यांनी गडचिरोलीत पत्रपरिषदेतून केली होती. आरोपीला १२ हजार रूपये दंड व गावकऱ्यांना जेवण अशी शिक्षा ठोठावून जात पंचायतीचे आरोपीला अभय दिले असल्याचा आरोप या पदाधिकाऱ्यांनी केला होता.
आरोपीवर एमपीडीएची कारवाई करा- नीलम गोऱ्हे
मोहलीतील या घटनेची शिवसेना उपनेत्या तथा प्रवक्त्या आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दखल घेत बुधवारी (दि.७) पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्याशी दूरध्वनीवरु न संपर्कसाधून घटनेची माहिती घेतली. आरोपींवर पॉस्को आणि जातपंचायत कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येत असल्याचे एसपींनी सांगितले. मात्र आरोपी अनिल मडवी याने यापूर्वी असे कृत्य तीन वेळा केल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी त्याच्याविरोधात महाराष्ट्र घातक कृत्य प्रतिबंधक कायद्यान्वये ( एमपीडीए) अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच अल्पवयीन मुलीचे समुपदेशन करण्यासंदर्भातही सूचना केली.

Web Title: Finally, filed a complaint against the Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.