मार्चपासून नाली सफाईचा कंत्राटदार बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 01:33 AM2019-02-13T01:33:00+5:302019-02-13T01:33:32+5:30

स्थानिक नगर पालिका प्रशासनाच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन तथा नाली सफाई कामाच्या कंत्राटाची मुदत संपत येत असल्याने नव्याने ई-निविदा प्रक्रिया राबवून हे काम नव्या कंत्राटदाराच्या हातात सोपविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

Drain cleaner contractor will change from March | मार्चपासून नाली सफाईचा कंत्राटदार बदलणार

मार्चपासून नाली सफाईचा कंत्राटदार बदलणार

Next
ठळक मुद्देई-निविदा प्रक्रिया राबविणार : खर्चाच्या प्रशासकीय मान्यतेसाठी पालिकेकडून जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव सादर

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : स्थानिक नगर पालिका प्रशासनाच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन तथा नाली सफाई कामाच्या कंत्राटाची मुदत संपत येत असल्याने नव्याने ई-निविदा प्रक्रिया राबवून हे काम नव्या कंत्राटदाराच्या हातात सोपविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या मार्च महिन्यापासून नगर पालिकेला नाली सफाई कामासाठी नवा कंत्राटदार मिळणार आहे.
गडचिरोली नगर पालिकेच्या घनकचरा व्यवस्था नाली सफाई कामाच्या कंत्राटाची मुदत ३१ डिसेंबर २०१८ रोजी संपली. त्यानंतर नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करून जुन्या कंत्राटदाराच्या या कामाच्या कंत्राटाला दोन महिन्याची मुदतवाढ देण्यात आली. जानेवारी व फेब्रुवारी २०१९ अशी दोन महिने ही मुदतवाढ आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत ई-निविदा प्रक्रिया राबवून सदर कामासाठी नवीन कंत्राटदार शोधणे आवश्यक आहे, त्या अनुषंगाने पालिका प्रशासनाच्या वतीने कार्यवाही हाती घेण्यात आली आहे.
घनकचरा व्यवस्थापन व नाली सफाईचे काम १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून करण्यात यावे, असे राज्य शासनाचे निर्देश आहेत. कारण नाली सफाईच्या कामावरील कोट्यवधी रूपयांचा खर्च पालिकेच्या निधीतून भागविणे शक्य नाही. त्यामुळे १४ व्या वित्त आयोगातून नाली सफाईच्या कामासाठी खर्च करण्याबाबत प्रशासकीय मान्यता देण्यात यावी, असा प्रस्ताव गडचिरोली पालिकेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा प्रस्ताव १५ दिवसांपूर्वीच सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला जिल्हाधिकाऱ्यांकडून मान्यता मिळाल्यानंतर न.प.च्या वतीने घनकचरा व्यवस्थापन व नाली सफाई कामाची ई-निविदा प्रक्रिया हाती घेण्यात येणार आहे. त्यानंतर ज्या कंत्राटदाराचे दर कमी राहतील, ती निविदा मंजूर करून संबंधित नव्या कंत्राटदाराला नाली सफाईच्या कामाचे आदेश देण्यात येणार आहे.
यापूर्वी नाली सफाईच्या कामासाठी तांत्रिक मान्यता घ्यावी लागत नव्हती. मात्र आता शासनाच्या नव्या मार्गदर्शक तत्त्वानुसार या कामासाठी तांत्रिक मान्यता घ्यावी लागते. न.प.ने महाराष्टÑ जीवन प्राधिकरण चंद्रपूरकडून या कामासाठीची तांत्रिक मान्यता घेतली आहे. याबाबतचा प्रस्ताव व प्रक्रिया पूर्ण करण्यात वेळ गेल्याने न.प.च्या जुन्या कंत्राटदाराला नाली सफाईच्या कामाची मुदतवाढ देण्यात आली.

ई-निविदेत मजुराच्या वयाची अट नोंदविणार
गडचिरोली पालिकेच्या सध्याच्या नाली सफाई कामाच्या कंत्राटदाराकडे ५५ वर्षांहून अधिक वय असलेल्या मजूराची नोंदणी आहे. वयोवृद्ध मजुरांचा ईपीएफ काढता येत नाही. त्यामुळे १०८ मजुरांपैकी केवळ ९० मजुरांच्या ईपीएफची रक्कम संबंधित कंत्राटदाराने भरली असल्याची माहिती आहे. आता न.प.च्या नवीन ई-निविदा प्रक्रियेत मजुराच्या वयाची अट नोंदविण्यात येणार आहे. वयोवृद्ध मजूर कामावर घेण्यास मुभा राहणार नाही.

ईपीएफ न भरल्याने मजुरांचे आर्थिक शोषण- सतीश विधाते
घनकचरा व्यवस्थापन व नाली सफाईचे काम असलेल्या पालिकेच्या कंत्राटदाराकडून नाली सफाईच्या कामावर पुरेशा प्रमाणात मजूर लावले जात नाही. त्यामुळे नाली सफाईचे काम प्रभावित होते. संबंधित कंत्राटदाराने या कामावरील सर्व मजुरांच्या ईपीएफची रक्कम भरली नाही. त्यामुळे शहरातील मजुरांचे आर्थिक शोषण होत आहे, असा आरोप काँग्रेसचे नगरसेवक सतीश विधाते यांनी केला आहे. यापूर्वीच आपण मुख्याधिकाºयांकडे तक्रार करून नाली सफाईच्या कामाची चौकशी करण्याची मागणी केली होती. न.प.कडून नवीन कंत्राटदार नेमण्यासाठी दिरंगाई होत आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी कंत्राटदार नेमावा.

Web Title: Drain cleaner contractor will change from March

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.