माना समाजाचे शक्तिप्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 12:06 AM2018-10-25T00:06:21+5:302018-10-25T00:07:22+5:30

माना समाजाच्या अवैध ठरविलेल्या जात प्रमाणपत्राचे आदेश मागे घेऊन जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी बुधवारी (दि.२४) गडचिरोली शहरातून विशाल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात पूर्व विदर्भाच्या पाच ते सहा जिल्ह्यातील २० हजारांपेक्षा जास्त माना समाजबांधव सहभागी झाले होते.

Believing the power of society | माना समाजाचे शक्तिप्रदर्शन

माना समाजाचे शक्तिप्रदर्शन

googlenewsNext
ठळक मुद्देप्रशासन हादरले : अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालयावर विशाल मोर्चा धडकला

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : माना समाजाच्या अवैध ठरविलेल्या जात प्रमाणपत्राचे आदेश मागे घेऊन जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी बुधवारी (दि.२४) गडचिरोली शहरातून विशाल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात पूर्व विदर्भाच्या पाच ते सहा जिल्ह्यातील २० हजारांपेक्षा जास्त माना समाजबांधव सहभागी झाले होते. या मोर्चाचे स्वरूप पाहून जिल्हास्तरावरील प्रशासकीय यंत्रणाही हादरून गेली होती.
विदर्भ आदिवासी माना समाज कृती समिती व आदिवासी माना जमात विद्यार्थी युवक संघटनेच्या वतीने या मोर्चाचे आयोजन केले होते. गडचिरोलीच्या इंदिरा गांधी चौकातून कार्यालयावर निघालेला हा मोर्चा कॉम्प्लेक्स परिसरातील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालयावर धडकला. या विशाल मोर्चातून माना समाजाने शक्तीप्रदर्शन केल्याचे दिसून आले.
माना समाज संघटनेमार्फत केलेल्या आवाहनानुसार, सदर मोर्चासाठी पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, वर्धा, नागपूर आदी जिल्ह्यातील समाजबांधव सकाळी १०.३० वाजतापासून गडचिरोली शहरात दाखल झाले होते. स्थानिक इंदिरा गांधी चौकातील राजीव गांधी सभागृहात एकत्र जमले. एक ते दीड तासात सर्वसमाज बांधव येथे एकत्र आले. त्यानंतर सदर मोर्चेकरी समाजबांधव शिस्तीत कॉम्प्लेक्स परिसरातील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालयाकडे निघाले. या मोर्चात विद्यार्थी, युवक, युवती, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच समाजातील सामाजिक कार्यकर्तेही सहभागी झाले होते. इंदिरा गांधी चौकातून कॉम्प्लेक्समार्गे आयटीआय चौक ते समिती कार्यालय परिसरात हा मोर्चा पोहोचला. दरम्यान पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. सदर मोर्चादरम्यान समाजातीलच युवक स्वयंसेवकाची भूमिका बजावत होते. अत्यंत शिस्तीच्या वातावरणात शांततेत समाजाचा मोर्चा कार्यालयावर धडकला. मोर्चा कार्यालय परिसरात पोहोचल्यानंतर तेथे सभेत रूपांतर झाले. या सभेत समाजातील ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी समाजबांधवांना संबोधित केले.
यावेळी मोर्चाचे संयोजक अ‍ॅड.नारायण जांभुळे, माजी राज्यमंत्री डॉ.रमेशकुमार गजबे, बळीराम गरमळे, देविदास जांभुळे, अरविंद सांधेकर, भगवान नन्नावरे, श्यामराव नन्नावरे, शंकर भरडे, माधवराव जांभुळे, नंदू दडमल, शांतराम चौखे, गोविंदराव चौधरी, गुलाब हनवते, विवेक शेंडे, कुलदीप श्रीरामे, गोपाळराव मगरे, केशव जांभुळे, रमेश राणे, मनीष नारनवरे, बाळू सावसाकडे, बाळकृष्ण राजनहिरे, देवराव नन्नावरे, भाऊराव धारणे, रामराव नन्नावरे, कुलदीप श्रीरामे आदी उपस्थित होते.
मोर्चाला मार्गदर्शन करताना अ‍ॅड.जांभुळे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी पारित केलेल्या आदेशानुसार समिती कार्यालय व प्रशासनाने माना जमातीच्या मागण्या निकाली काढाव्यात, जुने प्रलंबित प्रस्ताव त्वरित निकाली काढावे, माना समाज संघटीत असल्याने आम्ही आमचे अधिकार व हक्क घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. समाज संघटनेच्या वतीने केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर व राज्याचे वित्त नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विविध १७ मागण्यांचे निवेदन यापूर्वीच देण्यात आले आहे. सदर दोन्ही नेत्यांनी यावर विचार करून ३० आॅक्टोबरपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सचिवस्तरावर मागण्यांवर चर्चा होण्यासाठी बैठक लावावी, अशी मागणी करण्यात आली असल्याचे अ‍ॅड.जांभुळे यावेळी म्हणाले. शासनस्तरावर मागण्या निकाली काढण्याबाबत कार्यवाही झाली नाही तर ४ नोव्हेंबर रोजी ना.हंसराज अहीर व ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर येथील घरासमोर समाज संघटनेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येईल. त्यानंतर १८ नोव्हेंबरला चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती अ‍ॅड.जांभुळे यांनी उपस्थित समाजबांधवांना दिली.
याप्रसंगी रमेशकुमार गजबे, बळीराम गरमळे यांनीही मोर्चेकºयांना संबोधित केले. सभा आटोपल्यानंतर समाजाच्या १५ लोकांचे शिष्टमंडळ जात पडताळणी कार्यालयात पोहोचले व तेथे तपासणी समितीचे सहआयुक्त तथा उपाध्यक्ष सुरेश वानखेडे यांना निवेदन सादर केले. त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. यावेळी त्यांनी मागण्या निकाली काढण्याचे सकारात्मक आश्वासन शिष्टमंडळाला दिले. सभेदरम्यान समाजबांधवांनी नारेबाजी केली.
सभेचे संचालन श्रीकांत धोटे यांनी तर प्रास्ताविक भाऊराव धारणे यांनी केले.

मोर्चकऱ्यांच्या वाहनाने व्यापल्या खुल्या जागा
पूर्व विदर्भाच्या चार ते पाच जिल्ह्यातून मोर्चासाठी माना समाज बांधव गडचिरोली शहरात दाखल झाले. चंद्रपूर, चामोर्शी व आरमोरी या तिन्ही मार्गालगतच्या खुल्या परिसरात ठिकठिकाणी चारचाकी व दुचाकी वाहने ठेवली होती. नगरभवनलगत चारचाकी वाहने असे ठेवण्यात आली होती.

या आहेत मागण्या
माना समाजाच्या नागरिकांना जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे. प्रस्ताव खारीज करून परत केलेले आदेश पुनर्संचयीत करण्यात यावे. प्रलंबित असलेले प्रस्ताव निकाली काढून जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे. माना जमातीचे प्रलंबित प्रस्ताव निकाली काढण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात यावी, आदी मागण्यांचा समिती कार्यालयाच्या सहआयुक्त तथा उपाध्यक्ष यांना दिलेल्या निवेदनात समावेश आहे.

क्षणचित्रे
इंदिरा गांधी चौकापासून आयटीआय चौकापर्यंत मोर्चा लांब होता.
युवती व महिलांचीही प्रचंड उपस्थिती होती.
मोर्चकºयांच्या घोषणाबाजीने परिसर दणाणला.
मोर्चा आयटीआय चौकात पोहोचल्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
या मोर्चामुळे चंद्रपूर मार्गावरील वाहतूक बराच वेळ खोळंबली होती.
२० हजारांवर लोक सहभागी असतानाही मोर्चा शिस्तबद्ध व शांततामय वातावरणात होता.

Web Title: Believing the power of society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.