९२ टक्के झाडे जिवंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 10:51 PM2018-11-12T22:51:38+5:302018-11-12T22:52:03+5:30

१३ कोटी वृक्षलागवड योजनेअंतर्गत वनविभागाने सुमारे ३३ लाख १५ हजार ६७३ झाडे लावली. नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणादरम्यान ९२ टक्के झाडे जीवंत असल्याचे दिसून आले आहे.

92 percent of plants live | ९२ टक्के झाडे जिवंत

९२ टक्के झाडे जिवंत

Next
ठळक मुद्देवनविभागामार्फत पाहणी : ३३ लाख वृक्ष लागवड

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : १३ कोटी वृक्षलागवड योजनेअंतर्गत वनविभागाने सुमारे ३३ लाख १५ हजार ६७३ झाडे लावली. नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणादरम्यान ९२ टक्के झाडे जीवंत असल्याचे दिसून आले आहे.
पर्यावरणाचा समतोल कायम राहावा, यासाठी राज्य शासनाने वृक्षलागवड योजना सुरू केली आहे. विद्यमान भाजप शासनाने २०१६ मध्ये दोन कोटी, २०१७ मध्ये चार कोटी व २०१८ मध्ये १३ कोटी वृक्ष लागवडीचे नियोजन केले होते. त्यानुसार राज्यभरात वृक्षांची लागवड सुद्धा करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यात वनविभागा अंतर्गत मोठे क्षेत्र उपलब्ध आहे. त्यामुळे वृक्ष लागवडीचे सर्वाधिक उद्दिष्ट वनविभागालाच दिले जाते. वनविभागाकडे काम करणारी यंत्रणा असल्याने लावलेली बहुतांश वृक्ष जगतात सुद्धा. २०१८ मध्ये गडचिरोली वनवृत्ताने सुमारे ३३ लाख १५ हजार ६७३ वृक्षांची लागवड केली होती. वनविभागाने लावलेले बहुतांश वृक्ष जंगलात आहेत. मागील काही वर्षांपासून वनविभागाने जंगलात गुरे चराईला प्रतिबंध घातले आहे. त्यामुळे गुरांपासून झाडांचे होणारे नुकसान थांबण्यास मदत झाली आहे. त्याचबरोबर पावसाळा राहत असल्याने लावलेली बहुतांश झाडे जगतात. वनविभाग केवळ त्यांची देखरेख करण्याचे काम करतात. यावर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत पाऊस पडत असल्याने लावलेल्या वृक्षांसाठी योग्य वातावरण होते. त्यामुळे बहुतांश झाडे जगली आहेत.
लावलेल्या झाडांची माहिती मिळावी, यासाठी स्वतंत्र वेबसाईट तयार करण्यात आली आहे. या वेबसाईटमध्ये संबंधित विभागाने लावलेली झाडे व आतापर्यंत जीवंत असलेली झाडे टाकली जातात. मात्र इतर यंत्रणा झाडांची माहिती टाकण्याकडे फारसे लक्ष देत नसल्याने केवळ वनविभागाने लावलेल्या झाडांचीच माहिती उपलब्ध आहे. जुलै महिन्यात १३ कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत वनविभागाने सुमारे १६६ ठिकाणी ३३ लाख १५ हजार ६१३ झाडे लावली होती. त्यापैकी ३० लाख ५६ हजार २०५ झाडे जीवंत आहेत.
सामाजिक वनीकरणची ९९ टक्के झाडे जगली
सामाजिक वनीकरण विभागाने १३ कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत २ लाख ७ हजार झाडे लावली होती. त्यापैकी २ लाख ५ हजार ८६ झाडे जीवंत आहेत. टक्केवारीमध्ये हे प्रमाण ९९.०८ टक्के एवढे आहे. उन्हाळा लागल्यानंतर मात्र यातील काही झाडे करपण्याची शक्यता नाकारता येत नाही. सामाजिक वनीकरण विभाग सुद्धा जंगलामध्येच झाडे लावत असल्याने इतर यंत्रणांच्या तुलनेत या विभागाची झाडे अधिक प्रमाणात जगतात.
ग्रामपंचायती रस्त्याच्या बाजूला झाडे लावतात. झाडांना कठडे सुद्धा लावले जात नाही. परिणामी अर्ध्याहून अधिक झाडे जनावरांकडूनच फस्त केली जातात. काही झाडे तर अगदी दुसऱ्याच दिवशी नष्ट केली जातात.

Web Title: 92 percent of plants live

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.