‘...मेरे बाबा यहीं कहीं है, वो कहीं नही गये!’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 09:01 AM2024-03-30T09:01:48+5:302024-03-30T09:01:56+5:30

‘सुर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत’ पुरस्काराचा सन्मान प्राप्त करणारा तरुण गायक अरमान खान

Young singer Armaan Khan who has won the 'Sur Jyotsna National Music Award' | ‘...मेरे बाबा यहीं कहीं है, वो कहीं नही गये!’

‘...मेरे बाबा यहीं कहीं है, वो कहीं नही गये!’

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील एका उभरत्या प्रतिभेशी संवाद!

‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत’ पुरस्कार मिळाल्यानंतर मनात काय आलं? 
मला शशी व्यास काकांनी ही बातमी सांगितली, मी आमच्या गावी बदायूॅं येथे होतो. आनंदाने माझे डोळे भरून आले. २३ मार्चला हा पुरस्कार जेव्हा प्रत्यक्ष माझ्या हातात आला तेव्हा झालेला आनंद शब्दात व्यक्त करू शकत नाही.  ‘सूर ज्योत्स्ना’ हा माझ्या आयुष्यातला पहिला पुरस्कार  माझ्यासाठी आशीर्वादासारखा आहे. विजय दर्डाजी के साथ मेरे बाबाका रिश्ता बहोत पुराना था! ‘लोकमत’च्या पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात मी बाबांसोबत गायलोही होतो. 

राशिदभाईंचा मुलगा, त्यांचा शागिर्द यापेक्षाही अरमान म्हणजे राशिदभाईंची ‘परछाई’ अशी तुमची ओळख आहे. या अपेक्षांचं ओझं वाटतं का? 
‘अरमान तुझ्या गाण्यात राशिदभाई दिसतात, तू राशिदभाईंची सावली आहेस’, असं लोक म्हणतात ही माझ्यासाठी मोठी सन्मानाची गोष्ट आहे. राशिद खान हे नाव पेलण्याची माझी खरंच ‘हैसियत’ आहे असं लोकांना माझं गाणं ऐकून वाटतं, तेव्हा खूप आनंद होतो. आणखी चांगलं गाण्याची प्रेरणा मिळते.

राशिदभाईंनी खूप लवकर जगाचा निरोप घेतला, त्याची हुरहुर कधीही न संपणारी. त्यांचा शागिर्द म्हणून त्यांचं राहिलेलं काम कसं पुढे नेणार ? 
बाबा निघून गेले आहेत, त्यांची जागा रिकामी झाली आहे. आपण त्यांना पाहू शकत नाही, त्यांना स्पर्श करू शकत नाही, त्यांच्याशी बोलू शकत नाही; हे वास्तव मला खूप त्रास देतं. पण, ते जिथे कुठे असतील तिथून ते मला पाहात आहेत, माझं गाणं ऐकत आहेत!  बाबा माझ्यासाठी ‘बिता हुआ कल’ नाहीत. माझ्यासाठी ते इथे वर्तमानात माझ्यासोबत, माझ्यासमोर, माझ्या आजूबाजूलाच असतात.. मेरे बाबा यहीं कहीं है, कहीं नही गये!  

स्वत: राशिदभाईंचे ‘अरमान’ काय होते?  त्यांच्या काय अपेक्षा होत्या? 
- ‘अच्छा गाओ’... बाबा मला फक्त एवढंच सांगायचे.  स्वत: बाबांवर एक दडपण कायम असायचं. निस्सार हुसेन खाॅंसाहेबांचे शिष्य, नातू अशी त्यांची ओळख होती. त्यांचा वारसा राशिदभाई चालवतात असंच लोक त्यांच्याकडे बघायचे. त्यामुळे ‘तुझ्यावरही तू राशिदभाईंचा मुलगा आहेस’ हे दडपण कायम असणार’ याची जाणीव मला बाबांनी आधीच करून दिली होती. बाबांनी कधीही ‘तू असंच गायला हवं’, असा आग्रह केला नाही. ‘खाली अच्छा गाओ’ एवढंच त्यांचं सांगणं असायचं. 

वारसा म्हणून राशिदभाईंकडून काय मिळालं? 
मी त्यांच्याकडून मेहनतीचं बी घेतलंय. ते स्वत: गाण्यासाठी खूप मेहनत करायचे. मी बघायचो सर्व. एकवेळ खाणं-पिणं विसर पण रियाझ आणि तोही सकाळचा  अजिबात चुकता कामा नये असा त्यांचा नियम असायचा. त्यांनी स्वत:ही तो कायम पाळला आणि मीही तो पाळतो. माझा जन्म झाल्यापासून मी सुरांसोबतच राहिलोय. लहानपणी मी तानपुरा घेऊन बसायचो तेव्हा बाबा म्हणायचे, तानपुरा वाजवतोयस ना, तर फक्त तोच वाजव. बाकी काहीच करू नकोस!...  त्या तानपुऱ्याचा स्वर कानातून शरीरात असा काही जात राहिला की दुसरीकडे कुठे मन भरकटलंच नाही. संगीत माझ्यासाठी सुकून आहे.

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात पुढच्या वाटचालीबद्दल काय स्वप्नं आहेत?
मला भविष्यात माझी स्वत:ची गायकी तयार करायची आहे. बाबांनी जेव्हा सादरीकरण करायला सुरुवात केली तेव्हा लोक म्हणायचे, ‘राशिद खान म्हणजे हुबहू अमीरखाॅं साहेबांची काॅपी आहे!’ आणि होतंही तसंच. पण, बाबांना ती गोष्ट सलत असे, त्यातूनच त्यांनी स्वत:ची  गायकी तयार केली. माझ्या बाबतीतही ते आता होऊ लागलंय. माझ्या गाण्यात लोकांना राशिदभाई दिसतात.. मी बाबांचा मुलगा आहे, त्यांचा काही अंश तर माझ्या गायकीत राहणारच, पण अरमान म्हणून मी काहीतरी वेगळं करून दाखवावं असं माझं स्वप्न आहे. त्यासाठी मला रसिकांचा ‘दुवा’ हवा आहे.
 मुलाखत : माधुरी पेठकर 

Web Title: Young singer Armaan Khan who has won the 'Sur Jyotsna National Music Award'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.