वाऱ्याला वेग येत आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 02:32 AM2019-02-14T02:32:34+5:302019-02-14T02:32:46+5:30

केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र आणि तेलंगण या दक्षिणेकडील राज्यात भाजपाला फारसे स्थान नाही. जे स्थान त्या पक्षाला कर्नाटकात मध्यंतरी ...

 The wind is coming up | वाऱ्याला वेग येत आहे

वाऱ्याला वेग येत आहे

Next

केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र आणि तेलंगण या दक्षिणेकडील राज्यात भाजपाला फारसे स्थान नाही. जे स्थान त्या पक्षाला कर्नाटकात मध्यंतरी मिळाले, ते त्याने तेथील खाण घोटाळ्यात व येदीयुरप्पांच्या दुटप्पी राजकारणात घालविले. या सर्व राज्यात काँग्रेस आहे. कर्नाटकात ती सत्तेवर आहे. केरळात बरोबरीने आहे. तामिळनाडूत काँग्रेसचा स्टॅलिनशी समझोता आहे. मोदी-शहांचे गुजरात भाजपाच्या ताब्यात असले, तरी तेथे काँग्रेसने दिलेले आव्हान या नेत्यांच्या जिव्हारी लागल्याचे नंतरच्या घडामोडींतून दिसून आले. आंध्र प्रदेशात नायडू अनुकूल आहेत आणि एकटे तेलंगणचे चंद्रशेखर रावच विरोधात आहेत. मध्य भारत काँग्रेसने जिंकला आणि भाजपाने गमावला आहे. राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगडकडील भाजपाची सत्ता काँग्रेसने हिसकावली आहे. बिहारमध्ये काँग्रेस आणि लालूप्रसादांचा राजद हा पक्ष भाजपा व जदयुला बरोबरीचे आव्हान देत आहेत आणि ओडिशात नवीन पटनायक कुणाही सोबत नसले, तरी त्यांचा चेहरा सेक्युलर आहे. काँग्रेसवर त्यांचा राग असला, तरी पूर्वीच्या तुलनेत तो मावळला आहे. उत्तर प्रदेशात मायावती व अखिलेश यांनी ८० पैकी ७८ जागा आपसात वाटून, काँग्रेसला फक्त दोन जागा देण्याचा आगाऊपणा केला, तो आता त्यांच्या अंगलट आला आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाने घेतलेली झेप, त्यांना मिळालेली प्रियंकांची साथ आणि वरुण व मेनका गांधींविषयीचे संशयाचे वातावरण, यामुळे त्या आघाडीला पूर्वी वाटलेला उत्साह मावळला आहे, तर भाजपामध्ये तो आल्याचे दिसलेही नाही. उत्तरेला पंजाब काँग्रेसकडे; तर हरियाणा, उत्तरांचल व झारखंड भाजपाकडे आहेत, पण भाजपाची लोकप्रियता उतरली आहे आणि काँग्रेसला त्याने मिळविलेल्या यशामुळे आक्रमक बनविले आहे. काश्मिरात सरकार नाही, पण येणारे सरकार भाजपाला अनुकूल असणार नाही. बंगालमध्ये ममता ठाम आहेत आणि त्यांचा काँग्रेस, भाजपा व कम्युनिस्ट यांना सारखाच विरोध आहे. शिवाय त्यांचे पारडे त्या राज्यात अजून जड आहे. आसामसह पूर्वेकडील सात राज्यांत भाजपाने मध्यंतरी मोठी आघाडी घेतली, परंतु तेथील बांगलादेशी व अन्य लोकांना घालविण्याचा त्याचा घिसाडघाईचा निर्णय त्याला चांगलाच महागात पडलेला दिसत आहे. नागालँड, मणिपूर या राज्यांनी त्याला सरळ विरोध केला, तर आसामचे राज्यही त्याबाबत पूर्वीएवढे उत्साही राहिले नाही. अरुणाचल व मेघालय ही राज्ये कुणासोबतही गेली, तरी देशाच्या राजकारणावर त्याचा फारसा परिणाम व्हायचा नाही. तेच गोव्याबाबतही खरे आहे. मात्र, गोव्यात भाजपाने लोकप्रियता व प्रतिष्ठा या दोन्ही गोष्टी घालविल्या आहेत. महाराष्टÑात भाजपा-शिवसेना युती सत्तेवर आहे. आपले उमेदवार वाढवून घेण्यासाठी शिवसेना येथे दंडबैठका मारीत असली, तरी तिचे खरे बळ साºयांना ठाऊक आहे. परिणामी, त्यांच्यात मैत्री होणार हे उघड आहे. दरम्यान, याही राज्यात काँग्रेसने बळ एकवटले आहे आणि त्याच्या प्रचाराला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. साºयात महत्त्वाची बाब आहे, ती म्हणजे पंतप्रधानांच्या लोकप्रियतेची. लोकसभेची निवडणूक ही प्रत्यक्षात पंतप्रधानांचीच निवडणूक झाली आहे. या घटकेला मोदी लोकप्रियतेत पहिल्या क्रमांकावर आहेत. मात्र, त्यांच्या व राहुल गांधींच्या लोकप्रियतेतील अंतर दिवसेंदिवस कमी होत आहे. मोदींची आभाळभर आश्वासने पूर्ण व्हायची आहेत आणि राफेल घोटाळ्यात त्यांचा पाय दिवसेंदिवस खोलात जात आहे. महत्त्वाची गोष्ट ही की, ज्या काळात राहुल गांधींना मित्र मिळत आहेत, त्या काळात मोदींचे मित्र त्यांच्यापासून एकतर दूर जात आहेत किंवा त्यांच्यावर रुसलेले दिसत आहेत. या साºया राजकीय पार्श्वभूमीवर ही निवडणूक निकाली असेल, असे सामान्यपणे आज बोलले जात नाही. ती ‘हंग’ असेल, म्हणजे तीत कुणालाही स्पष्ट बहुमत नसेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. ज्या पद्धतीने विरोधक एकत्र येत आहेत, ते पाहता राजकारणाचा पोत बराच बदलला आहे किंवा तो बदलतो आहे, हे स्पष्ट दिसते आहे. मात्र, भारताचे राजकारण हे हवेचे वा लाटेचेही आहे. येत्या काळात वारे कसे वाहतील, यावर या निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे. एखाद्या नव्या मुद्द्याची लाट येऊ शकते, परंतु वेगवेगळे प्रवाह नव्या दिशा धरून वाहू लागले आहेत आणि त्याचा वेग वाढतो आहे, हा अन्वयार्थ ध्यानी घ्यायला हवा.

Web Title:  The wind is coming up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.