श्रेय कुणाचे, गौरव कुणाचा ?

By admin | Published: June 9, 2015 05:04 AM2015-06-09T05:04:06+5:302015-06-09T05:04:06+5:30

१९७१ च्या डिसेंबरमध्ये तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे करून बांगला देशची निर्मिती केली.

Who is the credit, the pride of the well? | श्रेय कुणाचे, गौरव कुणाचा ?

श्रेय कुणाचे, गौरव कुणाचा ?

Next

१९७१ च्या डिसेंबरमध्ये तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे करून बांगला देशची निर्मिती केली. त्यासाठी तेव्हाचे लष्करप्रमुख फिल्डमार्शल जनरल माणेकशा यांच्या मदतीने सहा महिने भारतीय सैन्याला त्या युद्धासाठी त्यांनी सज्ज केले. या काळात रशियापासून अमेरिकेपर्यंतच्या देशांचा दौरा करून या युद्धाची गरज त्या देशांच्या प्रमुखांना त्यांनी पटवून दिली. याच काळात पाकिस्तानी सैन्याने बांगलादेशात (तेव्हाचा पूर्व पाकिस्तान) स्त्रीपुरुषांचा जो अमानुष छळ केला त्यात ३० लाख नागरिक मृत्यू पावले व प्रचंड प्रमाणावर स्त्रियांवर अत्याचार झाले. या छळणुकीला कंटाळून व भिऊन सुमारे १ कोटी १० लक्ष बांगलादेशी नागरिकांनी सीमा पार करून भारताचा आश्रय घेतला. इंदिरा गांधींच्या सरकारने या जनतेचे रक्षण तर केलेच शिवाय त्यांना सर्व नागरी सुखसोयी उपलब्ध करून दिल्या. या काळात बांगलादेशचे नेते शेख मुजीबूर रहमान पाकिस्तानच्या कैदेत होते. आंतरराष्ट्रीय वातावरणाची तयारी, लष्कराची सिद्धता व देशाची मानसिक उभारी या साऱ्यांची खात्री करून घेतल्यानंतर इंदिरा गांधींनी प्रत्यक्ष लष्करी कारवाई करून एका आठवड्याच्या आत पाकिस्तानचा पराभव केला व बांगला देश हे स्वतंत्र राष्ट्र निर्माण केले. तेव्हाच्या त्यांच्या लोकप्रियतेने हिमालयाच्या उंचीलाही ठेंगणे केले होते. त्यावेळी विरोधी बाकावर बसणाऱ्या अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांचा गौरव ‘प्रत्यक्ष दुर्गा’ असा केला होता. हा सारा इतिहास आज आठवण्याचे कारण आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगला देशाला भेट देऊन परतताना सोबत आणलेले वाजपेयी यांचे बांगला देश मुक्तीचे सन्मानचिन्ह हे आहे. बांगला देश किंवा त्याचे नेतृत्व यांनी भारतातील कोणाला आपल्या स्वातंत्र्याचे श्रेय द्यायचे हे ठरविणे हा त्यांचा अधिकार आहे. मात्र हे श्रेय नेमके कुणाला जाते हे सांगणे हे भारताच्या नेतृत्वाचे कर्तव्य आहे. बांगलादेशाच्या निर्मितीनंतर तब्बल २८ वर्षांनी म्हणजे १९९९ मध्ये अटल बिहारी वाजपेयी हे भारताचे पंतप्रधान झाले. दरम्यान बांगलादेशच्या राजकारणात जेवढ्या उलथापालथी झाल्या तेवढ्याच त्या भारतातही झाल्या. या सबंध काळात भारताचे त्या देशाशी असलेले संबंध कधी स्नेहाचे तर कधी तणावाचे राहिले. मात्र भारतामुळे आम्ही स्वतंत्र झालो आणि आमच्या स्वातंत्र्यासाठी भारतीय सेनेने आपले रक्त सांडले ही गोष्ट बांगलादेशाला कधी विसरता आली नाही. इंदिरा गांधी यांची प्रतिमा या साऱ्या काळात साऱ्या जगात ‘बांगलादेशच्या निर्मात्या’ अशीच राहिली. त्यामुळे बांगला सरकारने बांगलामुक्तीचा सन्मान वाजपेयींना देण्यासाठी तो नरेंद्र मोदींच्या हाती सुपूर्द केला तेव्हा या सन्मानाचे खरे श्रेय कोणाचे ते बांगलादेशच्या नेतृत्वाला सांगणे नरेंद्र मोदींना जमणारे होते. त्यांना ते सांगणे अवघड झाले असेल तर प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही ते त्यांच्या लक्षात आणून देता आले असते. खुद्द हसीना वाजेब या बांगलादेशच्या पंतप्रधानांनाही हे वास्तव ठाऊक होते. त्यांच्या वडिलांना, शेख मुजीबूर रहमान यांना पाकिस्तानच्या कैदेतून कोणी मुक्त केले याचे चांगले स्मरण असणारच. तरीही त्यांनी असे केले असेल तर तो त्यांच्या सध्याच्या राजकीय गरजेचा भाग मानावा असा आहे. एकूणच सचिन तेंडुलकरच्या यशाचा मुकूट सौरव गांगुली याच्या डोक्यावर चढवावा तसा हा प्रकार आहे. मुळात सध्याच्या सरकारला देशाच्या स्वातंत्र्यलढ्याच्या उज्ज्वल इतिहासासह देशाने गेल्या ६० वर्षात केलेल्या विकासाचा इतिहास पुसूनच काढायचा आहे. त्याचमुळे नरेंद्र मोदींनी ‘मी पंतप्रधान झाल्यापासून या देशातील लोकांना भारतीय म्हणवून घेण्याचा अभिमान वाटू लागला’ असे अनाकलनीय व अतार्किक उद््गार मंगोलियाच्या सभेत बोलताना काढले आहेत. प्रत्यक्षात अटल बिहारी वाजपेयी हे देशाचे एक आदरणीय नेते आहेत आणि त्यांच्याविषयी त्यांच्या पक्षाएवढाच साऱ्या देशातही आदरभाव आहे. इंदिरा गांधींच्या यशाचे श्रेय आपल्या शिरावर चढविले जाण्याचा प्रकार त्यांनाही आवडला नसेल हे त्यांचा स्वभाव व त्यातले हार्द ठाऊक असणाऱ्यांना कळणारे आहे. परंतु राजकीय दडपेगिरी हाच ज्यांच्या वाटचालीचा मार्ग आहे त्यांना यातले सत्य, सौजन्य व परंपरेची मागणी समजायची नाही. आम्ही करू तो कायदा आणि आम्ही सांगू ती संस्कृती असा स्वभाव असणारे असेच वागणार. मग ते गेल्या ६० वर्षांत देशाने केलेल्या प्रगतीवरही आपला हक्क सांगणार आणि बांगलादेशच्या विजयावरही आपल्या पक्षाचा अधिकार सांगणार. या प्रकाराबद्दल या देशातील प्रसिद्धीमाध्यमांचे मुकाटपण त्यांचा बोटचेपेपणा सांगणारे आहे. तर काँग्रेस पक्षाचा गप्पपणा त्याचा या साऱ्या प्रकरणातील हतबुद्धपणा अधोरेखित करणारे आहे. मोदी आणि त्यांच्या पक्षाला इंदिरा गांधी आणि काँग्रेस यांचे श्रेय परस्पर लाटता आले तर ते अर्थातच हवेही आहे. सामाजिक व्यवहारातला हा नेहमीचा अनुभव आहे. मात्र राजकारणाच्या काटेकोर व्यवहारात जेव्हा तो असा प्रगट होतो तेव्हा त्याचे आश्चर्य वाटते आणि त्याचा खेदही होतो. कारण देशाचा चुकीचा इतिहास मांडण्याचा हा प्रकार ठरतो. इंदिरा गांधींचे श्रेय नाकारल्याचे दु:ख त्यांना होण्याचे कारण नाही. मात्र त्याने या देशाच्या विवेकाला एक जोराचा धक्का निश्चित दिला आहे.

Web Title: Who is the credit, the pride of the well?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.